अमेरिकेशी सन्मानजनक कराराची अपेक्षा
व्यापार शुल्क घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका चर्चेसंबंधी भारताकडून वक्तव्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत लवकरच अमेरिकेशी एक सन्मानजनक द्विपक्षीय व्यापारी करार करण्यात यशस्वी होईल, असा आशावाद भारताने व्यक्त केला आहे. मंगळवारी दोन्ही देशांनी या प्रस्तावित व्यापार कराराच्या प्रथम टप्प्याच्या आशयपत्रावर (टर्म्स् ऑफ रेफरन्स) स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यानंतर भारताच्या व्यापार विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांने ही सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
फेब्रुवारीत दोन्ही देशांनी असा करार करण्याचे निर्धारित केले होते. हा प्रस्तावित या वर्षाच्या अखेरपर्यंत करण्यात येईल, असे फेब्रुवारीत ठरले होते. दोन्ही देशांमधील व्यापार 2030 पर्यंत, म्हणजेच आणखी पाच वर्षांमध्ये वार्षिक 500 अब्ज डॉलर्स, अर्थात, साधारणत: 43 लाख कोटी डॉलर्सपर्यंत नेण्याचे ध्येयही त्यावेळी निर्धारित करण्यात आले होते. दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा वेगाने आणि समाधानकारकरित्या पुढे जात आहे, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
नव्वद दिवसांची स्थगिती
2 एप्रिलला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जगातल्या सर्व देशांवर अमेरिका लावणाऱ्या असलेल्या व्यापार शुल्काची सूची प्रसिद्ध केली होती. 9 एप्रिलपासून हे नवे शुल्क लागू केले होते. तथापि, त्यांनी विविध देशांची चर्चा करण्यास कालावधी उपलब्ध व्हावा, यासाठी आपल्या निर्णयावर स्वत:च 90 दिवसांची स्थगिती दिली होती. आता या 90 दिवसांमध्ये भारत अमेरिकेशी एक व्यापक व्यापार करार करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारतात येणार ?
भारत आणि अमेरिका यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे भारतात येणार आहेत, असे वृत्त देण्यात आले आहे. त्यांच्या आगमनामुळे दोन्ही देशांमधील व्यापार चर्चेला आणखी बळ मिळून अधिक वेग प्राप्त होईल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
चीनवर कर 145 टक्के
जे देश अमेरिकेशी व्यापार करार करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांच्यावरील व्यापार शुल्काला ट्रंप यांनी स्थगिती दिली असली, तरी चीनला त्यांनी या स्थगितीतून वगळले आहे. चीनवर त्यांनी एकंदर तब्बल 145 टक्के कर आकारण्याची घोषणा केली आहे. चीननेही अमेरिकेवर 125 टक्के कर लागू केला आहे. त्यामुळे सध्या या दोन देशांमध्ये जोरदार व्यापार युद्ध भडकले आहे. हे व्यापार युद्ध भविष्यकाळात कोणती वळणे घेणार यावर बरेच काही अवलंबून आहे.
चीनकडून बोईंग खरेदी स्थगित
अमेरिकेशी सध्या चीनचे व्यापारयुद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून केली जाणारी बोईंग प्रवासी विमानांची खरेदी चीनने तात्पुरती थांबविली आहे. चीनच्या प्रशासनाने तसा आदेश आपल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना दिला आहे. तसेच, चीनी विमान कंपन्यांनी अमेरिकेकडून विमानांशी संबंधित साधनसामग्री किंवा प्रवासी विमानांचे सुटे भागही खरेदी करुन नयेत, असा आदेश चीनी प्रशासनाने काढला आहे. जगभरात होणाऱ्या प्रवासी विमान खरेदीत चीनचा वाटा पुढील 20 वर्षांपर्यंत 20 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. चीन हा अमेरिकेच्या बोईंग कंपनीचा सर्वात मोठा ग्राहक आहे. चीनने आता बोईंगकडून विमाने स्वीकारणे थांबविल्यामुळे या कंपनीच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे वृत्त आहे. 2019 मध्ये बोईंग विमानांमध्ये दोष आढळल्याने चीननेच 737 मॅक्स विमानांची सर्व उ•ाणे बंद केली होती. बोईंग कंपनीला इतरही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यात आता व्यापार युद्धाची भर पडली आहे.