For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुरक्षा परिषदेचा विस्तार आवश्यक

07:00 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुरक्षा परिषदेचा विस्तार आवश्यक
Advertisement

ब्रिक्स प्लस परिषदेत विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

वेगाने परिवर्तीत होणाऱ्या जगातिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारताचे विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. ते गुरुवारी ब्रिक्स प्लस परिषदेत भाषण करीत होते. त्यांनी दहशतवादाविरोधातही वैश्विक एकजुटीचे आवाहन केले असून इतर जागतिक मुद्द्यांचा या भाषणात परामर्श घेतला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या विस्तारासह सध्याच्या स्वरुपात सुधारणा होणे आवश्यक आहे. सुरक्षा परिषदेची स्थायी सदस्य यंत्रणा आणि अस्थायी सदस्य यंत्रणा या दोन्ही यंत्रणांच्या कार्यपद्धतीत सुधारणा व्हावयास हवी. त्याप्रमाणे, बहुउद्देशीय जागतिक बँकांच्या कार्यपद्धतीत सुधारणा अनिवार्य असून सध्या अशा बँकांची कार्यपद्धती संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यपद्धतीइतकीच कालबाह्या झालेली आहे, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी त्यांच्या भाषणात केली आहे.

Advertisement

समताधारित जागतिक व्यवस्था

समताधारित जागतिक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र आणि नि:पक्षपाती व्यासपीठांना आणि विचारमंचांना बळ देण्यात आले पाहिजे. जागतिक संस्थांमध्ये बहुविविधता वाढली पाहिजे. मोठ्या शक्तींवरचे अवलंबित्व कमी होण्याची आवश्यकता आहे. तसेच, यासाठी जागतिक संस्थांचा विस्तार होऊन त्यांच्यात जगाच्या सर्व भागांमधील देशांना प्रतिनिधित्व दिले गेले पाहिजे. या दिशेने भारताने आपल्या जी-20 परिषद अध्यक्षपदाच्या काळात अनेक प्रयत्न केले होते. आता हेच प्रयत्न ब्राझिलकडून त्याच्या अध्यक्षपदाच्या काळात केले जात आहेत, ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे, अशा अनेक सूचना त्यांनी केल्या.

वसाहतवादाची छाया दूर व्हावी

जागतिक पायाभूत संरचनेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. यासाठी वसाहतवादाच्या काळात निर्माण झालेली पक्षपाती किंवा एकतर्फी जागतिक व्यवस्था आता आपण सोडावयास हवी. विविध देशांमध्ये अधिकाधिक उत्पादन केंद्रे निर्माण करुन वैश्विक अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्याची प्रक्रिया वेगवान झाली पाहिजे, अशाही मागण्या जयशंकर यांनी भाषणात केल्या.

दहशतवादाला क्षमा नाही

सध्याचे युग हे युद्धाचे नसून शांततेचे आहे. शांततेच्या मार्गानेच जागतिक समस्या सुटू शकतात. मात्र, शांततेचा पुरस्कार करीत असताना दहशतवादाचा कठोर उपायांच्या मध्यमातून नायनाट झाला पाहिजे. कोणत्याही देशाने कोणत्याही कारणास्तव दहशतवादाला समर्थन देण्याचे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार घडता कामा नयेत, असा इशाराही जयशंकर यांच्याकडून देण्यात आला.

द्विराष्ट्राचा तोडगा

सध्या इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात मध्यपूर्वेत भीषण संघर्ष होत आहे. या संघर्षावरही जयशंकर यांनी अप्रत्यक्षरित्या भाष्य केले. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा प्रश्न द्विराष्ट्रनिर्मितीचा तोडगा काढून संपविण्यात यावा. मध्यपूर्वेतील संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून संघर्ष थांबविण्याच्या दिशेने हालचालींचा प्रारंभ केला जावा, या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

ब्रिक्स प्लस काय आहे ?

ब्रिक्स प्लस हे ब्रिक्स परिषदेचे विस्तारीत स्वरुप आहे. सध्या ब्रिक्स संघटनेत भारत, दक्षिण आफ्रिका, चीन, रशिया आणि ब्राझील अशा पाच देशांचा समावेश आहे. मात्र, यापुढच्या काळात परिषदेचा विस्तार करण्याची योजना असून आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही देशांचा समावेश करण्याची योजना आहे.

Advertisement
Tags :

.