गोकुळचे संकलनात सीमोल्लंघन
परजिल्हा राज्यातून प्रतिदिन साडे पाच लाख लिटर दूध संकलन : सांगली, सातारा, सोलापूर, कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य : महिन्याकाठी 21 कोटी रुपये बिल अदा
कोल्हापूर/ धीरज बरगे
महाराष्ट्राच्या ब्रँड बनण्याच्या दृष्टीने गोकुळने आता कोल्हापूर जिल्ह्याबाहेरही विस्तार करायला सुरुवात केली आहे. सध्यस्थितीत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गोकुळने पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली आहे. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यालगत असलेल्या कोकण पट्ट्यातून गोकुळ प्रतिदिन सुमारे साडेपाच लाख लिटरहून अधिक गाय व म्हैस दुधाचे संकलन करत आहे. येथील शेतकऱ्यांना दहा दिवसाला दूध बिल आदा करत आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न गोकुळचा आहे. या शेतकऱ्यांना महिन्याकाठी दूध बिलापोटी साधारणत: 210 कोटी रुपये अदा केले जात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचा ब्रँड असणारा गोकुळ दूध संघ आता महाराष्ट्राचा ब्रँड बनण्याच्या दृष्टीकोनातून पाऊले ऊचलू लागला आहे. यासाठी गोकुळने आता कोल्हापूर जिल्ह्याबाहेरही विस्तारण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे परजिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही दूग्धव्यवसाय वाढीसाठी आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यास गोकुळने सुरुवात केली आहे. त्यामुळेच गोकुळने काही कालावधीतच परजिल्हा व राज्यातून साडेपाच लाख लिटरहून अधिक दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केला आहे. गोकुळचा होणारा विस्तार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहता गोकुळ लवकरच वीस लाख लिटरचा टप्पा पूर्ण करेल असा विश्वास गोकुळ प्रशासनाला आहे.
गाय दूधाला सुमारे पाच रुपये ज्यादा
गाय दूधाला 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफला किमान 27 रुपये दर देण्याचा आदेश राज्य सरकारचा आहे. पण गोकुळकडुन या फॅट व एसएनएफला 33 रुपये दिला जात आहे. तर परजिल्हा व राज्यातील दूध संघाकडुन या फॅट व एसएनएफला 27 रुपयांच्या आसपास दर दिला जात आहे. त्यामुळे परजिल्हा व राज्यातील गाय दूध उत्पादकांची पाऊले गोकुळकडे वळू लागली आहेत.
म्हैस खरेदीसाठीही प्रोत्साहन
परजिल्हा व राज्यातील ज्या दूध संस्था गोकुळकडे नोंदणीकृत झाल्या आहेत. अशा दूध संस्थांच्या सभासदांनाही गोकुळकडुन जातीवंत म्हैस खरेदीसाठी 40 हजार अनुदान दिले जात आहे. त्यामुळे गोकुळकडून कोल्हापूर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैस खरेदीसाठी व दुग्धव्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
दहा दिवसाला बिल, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रमाणे गोकुळकडून परजिल्हा व राज्यातील शेतकऱ्यांनाही दर दहा दिवसाला दूध बिल आदा केले जाते. दर दहा दिवसाला सुमारे 7 कोटी दूध बिल सांगली, सातारा, सोलापूर व कोकणातील शेतकऱ्यांना आदा केले जाते. त्यानुसार महिन्याकाठी सुमारे 21 कोटीहून अधिक रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना दिली जात असून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम गोकुळ करत आहे.
जिल्ह्यातील दूध संकलनातही वाढ
गोकुळने जिल्ह्यातली दूध संकलन वाढीसाठी विविध योजना राबविल्या. गाय व म्हैस खरेदीसाठी अनुदान देत शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. या योजनांचा फायदा गोकुळला झाला असून गतवर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत गोकुळच्या गाय व म्हैस दूध मिळून दैनंदिन संकलनात सुमारे 2 लाख लिटरची वाढ झाली आहे.
वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दीष्ट पार करण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे परजिल्हा व राज्यातील दूध उत्पादकांनाही दूध उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. येथील शेतकऱ्यांमधूनही प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गोकुळ लवकरच दूध संकलनाचे ध्येय पूर्ण करेल. त्याचबरोबर गोकुळला महाराष्ट्राचा ब्रँड बनविण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.
- अरुण डोंगळे, अध्यक्ष गोकुळ दूध संघ
गोकुळ दूध संघाची कोल्हापूरसह परजिल्हा व राज्यातील प्रतिदिन दूध संकलनाची आकडेवारी अशी : (माहे डिसेंबर 2023 ची आकडेवारी लिटरमध्ये)
कोल्हापूर जिल्हा परजिल्हा परराज्यातील संकलन
गाय दूध 5,73,098 1,63,887 70,777
म्हैस दूध 6,27,440 86,474 1,79,879
एकूण 12,00,538 2,50,361 2,50,656