For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अलारवाड-बसवान कुडचीच्या गावठाणात वाढ करा

06:38 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
अलारवाड बसवान कुडचीच्या गावठाणात वाढ करा
Advertisement

नगरसेवक बसवराज मोदगेकर यांची मागणी : मनपा सर्वसाधारण सभा

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

अलारवाड आणि बसवानकुडची गावचा समावेश महानगरपालिकेत होऊन अनेक वर्षे उलटली आहेत. अनेक जणांनी सर्व्हे नंबरमध्ये विविध ठिकाणी घरे बांधली आहेत. कर्ज व इतर सुविधा हव्या असल्यास गावठाण म्हणून पत्र मिळत नसल्याने  नागरिक त्रस्त बनले आहेत. त्यामुळे बसवान कुडची व अलारवाडच्या गावठाणमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी केली. त्यावर अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी, असा ठराव महापौर प्रीती कामकर यांनी संमत केला.

Advertisement

गेल्या 40 वर्षांपूर्वी अलारवाड आणि बसवान कुडची गावचा समावेश महानगरपालिकेत करण्यात आला आहे. गावठाणमध्ये घरे असलेल्यांनाही केवळ महापालिकेकडून ए-खाता दिला जात आहे. सर्व्हे नंबरमध्ये घरे बांधलेल्यांना गावठाण प्रमाणपत्र मिळत नसल्याने संबंधितांना बी-खाता दिला जात आहे. अशी समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांना सरकारी सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे ही बाब महापालिकेने गांभीर्याने घेत गावठाण क्षेत्र वाढवून द्यावे, अशी मागणीही केली.

देवराज अरस कॉलनी परिसरात अनेक लेआऊटस् आहेत. त्यामुळे महापालिकेने अलारवाड आणि बसवानकुडची या दोन्ही गावांच्या गावठाणमध्ये वाढ केल्यास नागरिकांच्या समस्या मार्गी लागतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर महापौर प्रीती कामकर यांनी सदर विषयाला मंजुरी दिली.

महानगरपालिकेत अनेक ठराव संमत केले जात आहेत. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने विरोधी गटातील नगरसेवक शाहिदखान पठाण यांनी सर्वसाधारण सभेत नाराजी व्यक्त केली. मागच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय बैठक घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात बैठक घेण्यात आली नाही याबाबत जाब विचारला. त्यावेळी महापौर प्रीती कामकर व उपमहापौर हणमंत कोंगाली यांनी दसरा व अभ्यासदौऱ्यावर जावे लागल्याने बैठक घेता आली नाही. पुढीलवेळी बैठक घेऊन चर्चा करू, असे आश्वासन दिले. मागच्यावेळी असे सांगण्यात आले होते त्यामुळे आताच तारीख जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली. त्याबाबत आमदार व महापौरांशी चर्चा करून तारीख निश्चित केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

मागण्या सर्वसाधारण सभेवेळी प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी नगरसेवकांविरोधात घोषणाबाजी करण्यास सांगून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी धमकी दिली होती असा आरोप नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी सर्वसाधारण सभेत केला. एखादा प्रश्न किंवा विकासकामांसंदर्भात विचारणा केल्यास आंदोलन केले जाते हा चुकीचा पायंडा आहे, असे त्यांनी म्हटल्यानंतर आमदार आसिफ सेठ यांनी सदर विषय येथेच संपून टाका, सर्वजण मिळून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्ट केले. त्यामुळे प्रकरणावर तूर्तास पडदा पडला.

Advertisement
Tags :

.