महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मान्सूनची एक्झिट

06:26 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मागील चार महिन्यांच्या दमदार पर्जन्यवृष्टीनंतर नैत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर देशातून निरोप घेतला आहे. त्यामुळे पावसाळा संपला, असे म्हणायला आता हरकत नसावी. मोसमी पाऊस हे भारतासारख्या देशाला लाभलेले वरदान आहे. येथील 60 ते 65 टक्के लोकसंख्या ही आजही शेती वा शेतीपूरक उद्योगांवर अवलंबून असल्याचे सांगण्यात येते. स्वाभाविकच कृषी अर्थव्यवस्था हा भारतीय अर्थकारणाचा महत्त्वाचा गाभा आहे. साधारणपणे जून ते सप्टेंबर हा पावसाचा हंगाम मानला जातो. अंदमान वा केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पावसाला सुऊवात झाल्याचे मानले जाते. यंदाच्या पावसाचा एकूणच प्रवास पाहिला, तर तो नक्कीच समाधानकारक म्हणता येईल. या हंगामात पावसाने देश तसेच राज्याला भरभरून दान दिल्याचे पहायला मिळते. 1 जून ते 30 सप्टेंबरच्या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीच्या 26 टक्के, गोव्यात 46 टक्के, तर संपूर्ण देशभरात सरासरीच्या 108 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती, उद्योगांची चिंता मिटल्याचे दिसून येते. यंदा पूर्वोत्तर भाग वगळता देशभर चांगला पाऊस झाला. गेल्या वर्षी एल निनोमुळे पावसाची सरासरी गाठताना दमछाक झाली होती. या वर्षी मात्र एल निनोचा तितकासा प्रभाव जाणवला नाही. परिणामी मोसमी पाऊसही चांगला झाला. यामध्ये राजस्थान 56, गुजरात 48, तेलंगण 29, लक्षद्वीप 27, महाराष्ट्रात 26, गोवा 46, कर्नाटक 11, तर आंध्र प्रदेश, दिल्ली, सिक्कीमच्या भागात अतिरिक्त पाऊस नोंदविण्यात आला आहे. याशिवाय उत्तरेतील राज्यांमध्येही कमी अधिक प्रमाणात चांगला पाऊस झाल्याचे आकडेवारी सांगते. हे चित्र सुखावह होय. महाराष्ट्राचा विचार केला, तर दोन ते तीन जिल्हे वगळले, तर सर्वदूर आनंदसरींची बरसात झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह सर्वत्र चांगले पीक येईल, सुगीचे दिवस येतील, अशी आशा निश्चितपणे करता येईल. पूर्व मोसमी पावसापासून ते परतीच्या पावसापर्यंत पावसाचे वेगवेगळे मूड्स दरवर्षी अनुभवायला मिळत असतात. कधी हा पाऊस झोडपून काढतो, कधी रिमझिमतो, रिपरिपतो, तर कधी कधी दिवसरात्र एका लयीत बरसत राहतो. परतीच्या पावसाचा धसमुसळेपणा हा तर अभ्यासाचा विषय म्हणता येईल. दिवा विझताना जसा फडफडतो, तशी या पावसाची तऱ्हा असते. तो लांबला की मात्र पंचाईत होते. मागच्या काही वर्षांत परतीचा पाऊस लांबल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात हंगाम संपल्यानंतरही पडत राहणारा अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांसह सगळ्यांसाठीच डोकेदुखी ठरतो. लक्ष्मीपूजन, दिवाळी असो की गुढीपाडवा. कुठल्या शुभमुहूर्तावर हा पडेल त्याला नेम नसतो. आता दिवाळसण तोंडावर आहे. पुढच्या दहा ते पंधरा दिवसांत दिवाळीची लगबग सुरू होईल. तेव्हा हे पावसाचे मळभ नसावे, हीच सर्वांची अपेक्षा राहील. दुसरीकडे ऑक्टोबर हीटलाही सुऊवात झाल्याचे दिसून येते. मागच्या काही दिवसांमध्ये सर्वच शहरांमधील उकाडा प्रचंड वाढला आहे. उन्हाच्या झळांनी अक्षरश: उन्हाळाच सुरू असल्याचा फिल जाणवत आहे. देशाच्या बहुतांश भागांत पुढच्या काही दिवसांत कमाल तसेच किमान तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्र तसेच देशाच्या काही भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, हे सत्र कायम राहणार आहे. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात कमाल तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मागच्या काही वर्षांमध्ये ऋतूबदलाला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. हे बघता ऑक्टोबर हीट लांबणार का, याकडेही पहावे लागेल. यंदा पाऊस चांगला झाला. हे बघता थंडीचा कडाका व उन्हाचा तडाखा कसा राहणार, याबाबत देशवासियांमध्ये उत्सुकता आहे.    नैत्य मोसमी पावसासोबत ईशान्य मोसमी पाऊसही महत्त्वाचा मानला जातो. विशेषत: दक्षिणेतील राज्यांमध्ये हा पाऊस आपले उपद्रवमूल्य दाखवून देतो. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान दक्षिणेकडील राज्यात बरसणारा हा ईशान्य मोसमी पाऊस यंदा सरासरीच्या 112 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत दक्षिणेतील राज्यांना अॅलर्ट रहावे लागेल. चेन्नईचा पूर, त्याने झालेली हानी हा इतिहास फार जुना नाही. वाढत्या नागरिकरणामुळे शे, सव्वाशे मिमी पाऊसही मोठ्या जलप्रलयास आमंत्रण देणारा ठरत आहे. हे लक्षात घेऊन दक्षिणेतील राज्यांना व तेथील नेतृत्वाला सर्व शक्याशक्यता लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते. खरे तर पाऊस हे समृद्धीचे, भरभराटीचे प्रतीक मानले जाते. गेल्या काही वर्षांचा पावसाचा ट्रेंड पाहिला, तर त्यात चढ उतार नक्कीच दिसतील. पण, अवर्षणग्रस्त स्थिती उद्भवेल, इतपत माया पावसाने पातळ केलेली नाही, हे शुभचिन्ह म्हणावे लागेल. असे असले, तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते. यंदा बहुतांश जलाशय काठोकाठ भरले आहेत. अनेक भागामध्ये मुबलक पाणी असल्याचे पहायला मिळते. परंतु, या पाण्याचा अपव्यय करता कामा नये. पाण्याची गळती असेल, तर ती तातडीने कशा पद्धतीने रोखता येईल, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. आजही दुर्गम भागातील अनेक नागरिकांना पावसाळ्यानंतर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशा अभावग्रस्त जनतेला पाणी कसे पोहोचविता येईल, त्यांचे जगणे सुसह्या कसे करता येईल, यासाठीही प्रयत्न करायला हवेत. भूजलाचा प्रचंड उपसा हाही अलीकडे एक प्रश्न बनला आहे. यंदाच्या पावसाने भूजल पातळी बऱ्यापैकी वाढेलही. पण, उन्हाळ्यात पुन्हा पाणी आटणार, हे वेगळे सांगायला नको. हे बघता भविष्यात पाणी जिरवणे व मुरवणे, यावर अधिकचे काम करावे लागणार आहे. दोन, पाच वर्षांतील एखादे वर्ष यंदासारखे पाणीदार असते. पण, बरेचशे पाणी वाहून जाते. त्याऐवजी हे पाणी जिरवले, साठवले, तर ते उपयुक्त ठरू शकते. काँक्रिटीकरणामुळे शहरांमध्ये पाणी मुरण्याच्या प्रक्रियेलाच खीळ बसत आहे. हे बघता या स्तरावर भविष्यात मुळापासून काम करावे लागेल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article