बांधकाम पूर्ण झालेल्या घरांना भोगवटा प्रमाणपत्रातून सूट
राज्य सरकारचा नवा अध्यादेश : पुढील पंधरा दिवसांची मुदत
बेळगाव : घराचे बांधकाम केलेल्या ग्राहकांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मधून सूट देण्यात आली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात काढलेल्या अध्यादेशामध्ये त्रुटी असल्याचे सरकारच्या लक्षात येताच सोमवार दि. 22 रोजी नवा अध्यादेश प्रसिद्ध करून नागरिकांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यामुळे विद्युत मीटर मिळविणे सोयीचे होणार आहे. 31 मे 2026 पूर्वी घरांचे बांधकाम पूर्ण झालेल्या व कायमस्वरूपी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना संधी मिळणार आहे. यापूर्वी काढलेल्या अध्यादेशाचा कोणताच उपयोग नागरिकांना झाला नव्हता. त्यामुळे नवा आदेश काढून नागरिकांना अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अनेक ग्राहक अधिकृत भूखंडधारक असतानाही ओसी प्रमाणपत्र नसल्याने विद्युत मीटर मिळाला नव्हता.
सोमवारी बजावलेल्या आदेशानुसार 31 मेपूर्वी अधिकृत बांधकाम केलेल्या घरांना ओसी प्रमाणपत्रातून सवलत दिली जाणार आहे. वन टाईम सेटलमेंट प्रमाणे केवळ एकदाच या योजनेचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. यासाठी वीज जोडणी देण्यापूर्वी घर पूर्ण झाल्याचे छायाचित्र हेस्कॉम अधिकाऱ्यासह मालकाला जीपीएस करावे लागणार आहे. 1200 स्क्वेअर फूट ते 2880 स्क्वेअर फुटापर्यंत बांधकाम असलेल्या अधिकृत भूखंडांना ही सूट दिली आहे. ग्राऊंड अधिक तीन किंवा पार्किंग (स्टील्ट) अधिक चार अशा घरांसाठी ही सवलत असणार आहे. व्यावसायिक व घरगुती असे एकत्रित बांधकाम असेल तर त्याला ही सवलत मिळणार नाही. याबाबतची अधिक माहिती हेस्कॉमच्या कार्यालयांवर उपलब्ध असणार आहे. बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वसाहतींमध्ये घरांचे बांधकाम केलेले ग्राहक आहेत. परंतु सध्या तरी त्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे दिसून येत आहे.