शैक्षणिक वर्षाला उत्साहात प्रारंभ
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : 90 टक्के उपस्थितीचा दावा
पणजी : सहावी ते दहावी आणि बारावी या इयत्तांसाठी नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 काल सोमवारपासून सुरू झाले असून त्यास 90 टक्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर आणि शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी केला आहे. सदर इयत्तांचे वर्ग सकाळी 11.30 वा. सोडण्यात आले. आता पूर्ण एप्रिल महिना वरील इयत्तांचे वर्ग नवीन शैक्षणिक धोरणानुसार चालू रहाणार आहेत. लोलयेकर आणि झिंगडे या दोघांनी तिसवाडीतील काही शाळांना भेटी देऊन तेथील विद्यार्थी उपस्थितीचा आढावा घेतला. मुले, शिक्षक, शाळेत खुश असून पालकांनी देखील नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत केले, अशी माहिती त्यांनी दिली. शाळेत संबंधित इयत्तांची पाठ्यापुस्तके लवकर पोहोचती करण्यात आली असून मुलांना ती लवकर मिळतील असे ते म्हणाले. एप्रिल महिन्यात प्रात्यक्षिक, कलात्मक शिक्षणावर अधिक भर देण्यात येणार असून मुलांना इतर विषयात गोडी लागावी म्हणून प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही शाळांमधून किरकोळ तक्रारी होत्या परंतु एकंदरीत एप्रिलमध्ये प्रथमच शाळा सुरू करण्यास मुले, पालक, शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे त्यांनी नमूद केले. एप्रिलमध्ये मुलांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल असेही ते म्हणाले. काही किरकोळ पालकांनी एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्यास विरोध दर्शवला होता परंतु बहुतेकांनी निर्णयास पाठिंबा दिला असे त्यांनी सांगितले. शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकरांनी एप्रिलमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यापूर्वी सर्व संबंधितांची बैठक बोलावतो असे आश्वासन दिले होते परंतु ते पाळले नाही असा दावा करून काही पालकांनी सिसिल रॉड्रीग्स यांच्या नेतृत्त्वाखाली पर्वरी येथील शिक्षण खाते इमारतीसमोर निषेध आंदोलन केले. त्यातील काहीजणांनी झिंगडे यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. सदर आंदोलन बेकायदेशीर असल्याचे झिंगडे यांनी सांगितले. शिक्षण खात्याची इमारत हे आंदोलन करण्याचे ठिकाण नव्हे. त्यासाठी आझाद मैदान पणजी ही जागा देण्यात आली असून निवेदन देणे, घेणे, चर्चेसाठी आम्ही खुले आहोत असेही ते म्हणाले.