तालुक्यातील धारकऱ्यांना दुर्गामाता दौडीचे वेध
दौडसंदर्भात जनजागृतीसाठी गावागावंमध्ये बैठका-चर्चा : गावांतील धारकऱ्यांमध्ये आतापासूनच उत्साह : नियोजनाबाबत मान्यवरांकडून मार्गदर्शन
वार्ताहर/किणये
येत्या 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या नवरात्रोत्सवात गावागावातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचबरोबर तालुक्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते. तालुक्यातील धारकरी व तरुणांना या दौडीचे वेध लागले असून यंदाच्या या दौडीसंदर्भात गावागावांमध्ये तरुण कार्यकर्ते बैठका घेऊन दौडीचे नियोजन करताना दिसत आहेत.
संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव शहरात दौडला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर तालुक्याच्या विविध गावांमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखांच्या मार्फत दौडला सुरुवात करण्यात आलेली आहे. गेल्या तीन-चार वर्षात या दुर्गामाता दौडमध्ये युवक मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले आहेत.
नवरात्रोत्सवात गावागावांमधून निघणारी दुर्गामाता दौड सर्वांसाठी स्फूर्ती निर्माण करणारी आहे. सध्याच्या आधुनिक युगात तरुणाई मोबाईल, व्हॉट्स अप, फेसबुक आदींशी अधिक जवळीक झालेला आहे. तसेच धावपळीच्या या युगात व्यायामाकडे दुर्लक्ष झालेले आहे. अशा परिस्थितीत पहाटेच्या वेळी निघणाऱ्या दुर्गामाता दौडच्या माध्यमातून समाजप्रबोधन होते. त्याचबरोबर शारीरिक व्यायाम आणि व संस्कृतीचे जतन करण्यासाठी मदत होते. त्यामुळेच ही दौड ग्रामीण भागातील महत्त्वाची ठरली आहे.
मच्छे मरगाईदेवी मंदिरात कार्यकर्त्यांची बैठक
मच्छे गावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने मरगाई देवी मंदिरात नुकतीच कार्यकर्त्यांनी बैठक घेतली व नवरात्र उत्सवात होणाऱ्या दुर्गामाता दौडसंदर्भात सविस्तर चर्चा केली. सावगाव, हंगरगा, मंडोळी, बेनकनहळ्ळी या विभागाच्या वतीने दुर्गामाता दौड करण्यात येणार असून या दौडसंदर्भात धारकऱ्यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले आहे.
बोकनूर गावात जनजागृती
बोकनूर गावात सुरेश पाटील यांच्या हस्ते दौडच्या जनजागृती मोहिमेचे पूजन करून गावात दौडसंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर किणये विभाग, पिरनवाडी, हुंचेनहट्टी, बाळगट्टी, नावगे विभाग, कर्ले विभाग, बेळगुंदी विभाग, देसूर विभाग आदी परिसरात दौडसंदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.