पोटनिवडणूक फोंड्यात उत्कंठा राज्यभरात
फोंडा मतदारसंघात येत्या 9 एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. ही निवडणूक केवळ एकाच मतदारसंघात होत असली तरी संपूर्ण गोव्याचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. येत्या वर्षभरात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहे. आम आदमी पक्षानेही उमेदवार उभा केल्याने लढत तिरंगी होत असली तरी खरी चुरस भाजप-काँग्रेसमध्येच दिसते.
फोंड्याचे दिवंगत भाजप आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. सहानुभूतीच्या लाटेवर पुन्हा ही जागा राखण्यासाठी भाजपने रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी देऊन मतदारांना भावनिक आवाहन केले आहे तर मागील निवडणुकीत अवघ्या 70 मतांनी पराभूत झालेले फोंड्यातील तऊण समाजकार्यकर्ते डॉ. केतन भाटीकर यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने वेगळी रणनीती आखली आहे. प्रचाराचे मुद्दे तसे जुनेच आहेत पण समाजमाध्यमे आणि ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाचा कुशलतेने दुऊपयोग करीत प्रचारापेक्षा विरोधकाचा अपप्रचार कशाप्रकारे केला जाऊ शकतो, याची सुऊवात या पोटनिवडणुकीतून झाली आहे.
भाजप सरकारला सत्तेवर येऊन पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. 2012 साली माध्यम प्रश्नाच्या आंदोलनावर स्वार होत भाजपचे पर्रीकर सरकार बहुमताने सत्तेवर आले व मागील चौदा वर्षे सत्ता राखून आहे. सध्या राज्यभरात विविध मुद्द्यांवरून पेटलेली आंदोलने सरकारविरोधात जनमत तयार करण्यासाठी काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांना नामी संधी वाटते. हीच संधी साधून फोंड्याच्या पोटनिवडणुकीतून 2027च्या विजयाचा ‘श्रीगणेशा’ करण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे जोमाने कामाला लागली आहे. राज्यात भाजपचे भूमिपूजन ज्या फोंड्यातून झाले, तो मतदारसंघ जिंकणे, गेली चाळीस वर्षे शक्य झाले नाही. मागील 2022च्या निवडणुकीत रवी नाईक यांना पक्षात प्रवेश देऊन अखेर भाजपने फोंड्यावर झेंडा रोवला. भाजपला हातची ही जागा तर राखायची आहेच शिवाय पोटनिवडणूक जिंकून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या विजयश्रीची नांदी फोंड्यातून करायची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह भाजपची संपूर्ण यंत्रणा फोंड्यात तळ ठोकून आहे.
फोंड्यातील या पोटनिवडणुकीला सामाजिकदृष्ट्याही वेगळे महत्त्व आहे. फोंडा मतदारसंघासाठी एका नवीन नेतृत्वाच्या उदयाला संधी देणारी निवडणूक म्हणून त्याकडे पाहिले जाते. गेली 40 वर्षे येथील राजकारण आणि समाजकारण रवी नाईक यांच्याभोवती फिरत आले आहे. त्यांच्या पश्चात रिक्त झालेली ही मोठी आणि तेवढीच महत्त्वाची जागा भरून काढण्यासाठी मतदार कुणाला संधी देतील, हे पाहणे तेवढेच उत्कंठावर्धक ठरणार आहे. राज्यातील भंडारी व बहुजन समाजाचे बुलंद नेते म्हणून रवी नाईक यांचा गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर प्रभाव होता. त्यामुळे जातीय समीकरणे तर अपरिहार्य ठरतील. एकंदरीत परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपसाठी हे समीकरण अनिवार्य ठरणार आहे.
जातीय मतांबरोबरच ख्रिस्ती आणि मुस्लिम ही धार्मिक अल्पसंख्याक मते फोंडा मतदारसंघात नेहमीच बहुसंख्यांक ठरत आली आहेत. आजवरच्या निवडणुकांचा निकाल पाहिल्यास काँग्रेसला ही मते उजवी ठरली असून दक्षिण गोवा लोकसभा आणि जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालातून हे स्पष्ट झाले आहे. भाजपला हा धोका पत्करायचा नसल्याने मतदारांच्या मतपरिवर्तनावर त्यांनी जोर दिला. पक्षांतर्गत नाराजी मतदानावर परिणाम करणारा मुद्दा. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मुख्य प्रतिस्पर्ध्यांना त्याचा परिणाम जाणवणार आहे. शिवाय काँग्रेसला मित्रपक्ष गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोवन्स यांची तर भाजपला मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांची कितपत साथ मिळणार, हाही निकालावर परिणाम करणारा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही.
सदानंद सतरकर