बेकायदा दारूविक्री-साठ्याविरोधात अबकारी विभागाने उघडली मोहीम
महिन्यात नऊ ठिकाणी छापे
बेळगाव : अबकारी विभागाने गावठी व बेकायदा दारू वाहतूक व विक्रीविरुद्ध मोहीम उघडली आहे. गेल्या एक महिन्यात नऊहून अधिक छापे टाकण्यात आले असून या कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी व गोवा बनावटीचा दारूसाठा, हुर्राक, बियर जप्त करण्यात आली आहे. 12 मार्च रोजी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास उद्यमबाग येथे होंडा अॅक्टिव्हामधून बेकायदा दारू वाहतूक करताना कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपये किमतीची 142 लिटर 670 मिली गोवा बनावटीची दारू जप्त केली. 13 मार्च रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास येडियुराप्पा मार्गावर जीए 08 ए 7803 मारुती व्हॅनमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना कारवाई करून 86 लिटर 400 मिली दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
14 मार्च रोजी मध्यरात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास फुलबाग गल्ली येथील सुभाष सुधीर डे याने एका भाड्याच्या घरात साठवून ठेवलेली 215 लिटर गोवा बनावटीची दारू व 36 लिटर बियर जप्त करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे दीड लाख रुपये इतकी आहे. 27 मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कणकुंबी तपासनाक्याजवळ टाटा इंट्रा पिकअप (क्र. केए 53 एबी 9517) मधून 36 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 2 एप्रिल रोजी दुपारी बहाद्दरवाडी येथे लक्ष्मण सातेरी पाटील याच्या घरावर छापा टाकून 108 लिटर गोवा बनावटीची दारू, 10 लिटर हुर्राक, 6 लिटर बियर जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 96 हजार इतकी आहे.
3 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता महाद्वार रोड येथील सुभाष सुधीर डे याच्या घरावर छापा टाकून 46 लिटर गोवा बनावटीची दारू, 35 लिटर हुर्राक असा एकूण 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 4 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास होनग्याहून देवगिरीला जाणाऱ्या रस्त्यावर टीव्हीएस सुझुकी मोटारसायकलवरून दोन ट्यूबमधून गावठी दारूची वाहतूक करताना दुचाकी व 40 लिटर गावठी दारू असा 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता बहाद्दरवाडी ब्रह्मलिंग गल्ली येथील एका सिमेंटच्या शेडमध्ये साठवून ठेवण्यात आलेली साडेसात लिटर गोवा बनावटीची दारू, 20 लिटर हुर्राक असा 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
9 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता बिजगर्णी जंगल परिसरात छापा टाकून प्लास्टिकच्या बॅरलमध्ये साठवून ठेवण्यात आलेला 600 लिटर काजूचा रस, 400 लिटर गुळाचे रसायन असा सुमारे 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, सहआयुक्त एफ. एच. चलवादी, उपायुक्त वनजाक्षी एम. यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी उपअधीक्षक रवी एम. मुरगोड यांच्या नेतृत्वाखाली या कारवाया करण्यात आल्या आहेत. अबकारी निरीक्षक दुंडाप्पा हक्की, मंजुनाथ मळ्ळीगेरी, रुपा शिरोळ, सुनीलकुमार डी., चिदानंद मोदगेकर, उपनिरीक्षक एस. एच. शिंगाडी, पुष्पा गडादे, अनिल रेनके, सुनील पाटील, परसाप्पा तिगडी, संतोष दोडमनी, उळवाप्पा तुळजी, चंद्रकांत क्षीरसागर, प्रवीण हुली, के. बी. कुरट्टी आदींनी या कारवाईत भाग घेतला आहे.