अबकारी खात्याला अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न
पहिल्या दोन तिमाहीत 16,358 कोटी रु. महसूल संकलन : मंत्री आर. बी. तिम्मापूर यांची माहिती
बेंगळूर : अबकारी खात्याच्या इतिहासात प्रथमच अनेक सुधारणात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अबकारी खात्याला पहिल्या दोन तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. 16,290 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु, 16,358 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. ही रक्कम अपेक्षेपेक्षा 68.78 कोटी रु. अधिक आहे, अशी माहिती अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी दिली. मंगळवारी विधानसौध येथे त्यांनी अबकारी खात्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, अबकारी खात्यात बरेच बदल करण्यात आले आहेत. प्रथमच कर संकलन विभागात कौन्सिलिंगद्वारे कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल. अबकारी खात्यात डिजिटल प्रणाली लागू केली जात असून ऑनलाईनद्वारे परवाना नूतनीकरणाची संधी देण्यात आली आहे.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी सीएल 7 परवाने देण्याचे टप्पे कमी करण्यात आले आहेत, असे मंत्री तिम्मापूर यांनी सांगितले. अबकारी खात्यात कार्यक्षम प्रशासन राबविणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे. तथापि, काही अधिकारी निष्काळजीपणा दाखवत असल्याचे आढळून आले. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अ श्रेणीतील 31, ब श्रेणीतील 20 आणि 43 अबकारी उपनिरीक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे ते म्हणाले. प्रशासकीय सुधारणा आयोगाने दिलेल्या शिफारशींची पुरेशी अंमलबजावणी केली जात आहे. एकूण 62 शिफारशींवर अर्थ खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसोबत बैठक झाली. त्यापैकी 95 टक्के शिफारशींना मान्यता देण्यात आली असून त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 13 शिफारशी आधीच लागू करण्यात आल्या आहेत. 49 शिफारशी अंमलबजावणीच्या प्रक्रियेत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
तपासणी नाक्यावरील कर्मचारी 15 दिवसातून एकदा बदला
महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमधून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश मंत्र्यांनी अबकारी आयुक्तांना दिले. दर 15 दिवसांनी सीमा तपासणी नाक्यांवरील कर्मचारी बदलण्याचे निर्देश मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी आयुक्तांना दिले आहेत. खात्यातील अधिकाऱ्यांनी सीएच पावडर आणि ड्रग्ज नियंत्रित करण्यासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात. लहान पाकिटांमधून जे सीएच पावडर आणून शेकडो लिटर मद्य बनविली जाते. अशा व्यक्तींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी. तरुणांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी ड्रग्जवर अंकुश लावला पाहिजे. एनडीपीएस कायद्याची पुरेशी आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी सूचना मंत्र्यांनी केली.