मद्यविक्रीतून अबकारी खात्याला भरघोस उत्पन्न
31 डिसेंबरला केवळ अर्ध्या दिवसात 308 कोटींची मद्यविक्री
प्रतिनिधी/ बेंगळूर
नव्या वर्षाच्या आनंदोत्सव साजरा होत असताना इकडे अबकारी खात्याला नववर्षाच्या पूर्वसंध्येला विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. 31 डिसेंबर रोजी अर्ध्या दिवसात कर्नाटक स्टेट ब्रेवरीज कार्पोरेशन लिमिटेडकडून (केएसबीसीएल) 308 कोटी रुपयांची मद्यविक्री झाली आहे.
नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अबकारी खात्याला कोट्यावधींचे उत्पन्न मिळाले आहे. 31 डिसेंबर रोजी मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत म्हणजेच अर्ध्या दिवसात केएसबीसीएलकडून 308 कोटी रुपयांची मद्यविक्री झाली आहे. अबकारी खात्याने थर्टी फर्स्टनिमित्ताने 250 कोटी रुपयांची मद्यविक्री करण्याचे उद्दिष्ट बाळगले होते. मात्र, खात्याला अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी म्हणजेज 31 डिसेंबर 2023 रोजी 193 कोटी रुपयांची मद्यविक्री झाली होती. यंदा 31 डिसेंबर 2024 रोजी मद्यविक्रेत्यांनी केएसबीसीएलकडून मद्यखरेदी केली आहे.
भारतीय बनावटीची 4,83,715 बॉक्स मद्यविक्री झाली असून यातून 250.25 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर 2,92,339 बियर बॉक्सविक्री झाली असून यातून 57.75 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. 27 डिसेंबर 2024 रोजी देखील 408.58 कोटी रुपयांची मद्यविक्री झाली होती. त्या दिवशी 6,22,062 बॉक्स मद्यविक्रीतून 327.50 कोटी रुपये तर 4,04,998 बॉक्स बियर विक्रीतून 80.58 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.
बेंगळूरमधील एम. जी. रोड, ब्रिगेड रोडसह विविध भागात लाखो लोक सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी एकत्र आले होते. अनेक ठिकाणी पार्ट्या, बार-रेस्टॉरंट, पबमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. यावेळी देखील मोठ्या प्रमाणात मद्यविक्री झाली आहे.