अबकारी खात्याकडून बेकायदा दारूसाठा नष्ट
142 प्रकरणांत जप्त करण्यात आली होती दारू
बेळगाव : जिल्हा अबकारी खात्याकडून जप्त करण्यात आलेला लाखो रुपयांचा मद्यसाठा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार नष्ट करण्यात आला आहे. अबकारी खात्याच्या जिल्हा दक्षिण विभागासह पोलीस खात्याकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणावरून जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्याचा यामध्ये समावेश आहे. बेकायदेशीर मद्यसाठा प्रकरणी 142 प्रकरणांची नोंद अबकारी खात्याकडे झाली आहे. बेळगाव विभाग एकमध्ये 29 प्रकरणांची नोंद झाली आहे. बेळगाव विभाग दोनमध्ये 19, बेळगाव विभाग तीनमध्ये 7, खानापूर विभाग 46, रामदुर्ग विभाग 4, बैलहोंगल विभाग 22, सौंदत्ती विभाग 15 अशा प्रकारे एकूण 142 प्रकरणांची अबकारी खात्याकडे नोंद झाली होती. त्यानुसार 1574.04 लिटर मद्य, 902.800 लिटर हातभट्टी दारू, 265.990 लिटर बियर, 141.260 लिटर गोवा बनावटीचे मद्य, 750 मिलीलिटर काजू फेनी, 10 लिटर काजू मद्य, 6 हुराक इतका मद्यसाठा जप्त केला होता. हा मद्यसाठा अॅल्युमिनियम फॅक्टरीजवळ मोकळ्या जागेत जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनाखाली अबकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला आहे.