For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक्सलन्स इन प्रॅक्टिकल पॉलिटिक्स!

06:24 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
एक्सलन्स इन प्रॅक्टिकल पॉलिटिक्स
Advertisement

बारामतीच्या एआय सेंटरच्या उद्घाटनाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन अध्याय सुरू झाला आहे. 28 डिसेंबर रोजी उद्योजक गौतम अदानी यांच्या हस्ते शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे उद्घाटन झाले. मंचावर शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, पवार कुटुंबातील सर्व प्रमुख चेहरे एकत्र होते! जणू 2023 ची फूट ही फक्त एक राजकीय नाटक होती आणि आता

Advertisement

फॅमिली रियुनियनचा हंगाम सुरू झाला आहे. शरद पवार हे प्रॅक्टिकल पॉलिटिक्सचे जिवंत शाळामास्तर आहेत ते यासाठीच. त्यांची भूमिका कधीही एकाच दिशेने राहिलेली नाही. आज इंडिया आघाडीत राहून ते राहुल गांधींसोबत मोदींवर टीका आणि अदानींना देशाचा उद्यमी म्हणतात. बारामतीत अदानींच्या 25 कोटींच्या देणगीवर एआय सेंटर उभारतात आणि त्याच अदानींच्या हस्ते उद्घाटन करवतात. हा यू-टर्न नव्हे, तर मास्टरस्ट्रोक आहे! 2023-24 मध्ये हिंडनबर्ग रिपोर्ट आला तेव्हा काँग्रेस आणि इंडिया आघाडी अदानींच्या विरोधात आक्रमक झाली. राहुल गांधी ‘क्रोनी कॅपिटलिझम’ चा नारा देत होते. पण पवारांनी नेहमीच सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, “संयुक्त संसदीय समिती ऐवजी सुप्रीम कोर्ट कमिटीने तपास करावा.” काँग्रेसला हा धक्का होता, पण पवार

प्रॅक्टिकल पॉलिटिक्स करत राहिले. 2024 च्या निवडणुकीतही ते अदानी मुद्यावर फारसे बोलले नाहीत. उलट, त्यांच्या बर्थडे डिनरमध्ये राहुल गांधी आणि गौतम अदानी एकत्र दिसले, हात मिळवले (फोटो मात्र सुप्रिया सुळेनी रोखले!) आणि आता 2025 च्या शेवटी हे बारामतीतील दृश्य अदानी म्हणतात, “शरद पवार माझे मेंटॉर आहेत. तीन दशकांपासून त्यांच्याकडून शिकतो आहे!” पवार उत्तर देतात, “अदानींची जीवनयात्रा मेहनती युवकांसाठी प्रेरणा आहे. गुजरातच्या दुष्काळग्रस्त भागातून मुंबईत आलेला मुलगा आज 23 राज्यांत लाखोंना रोजगार देतोय.” सुप्रिया सुळे म्हणतात, “गौतमभाई माझे मोठे भाऊ आहेत. चांगली-वाईट बातमी त्यांना सांगते.” हे सगळे एकाच दिवशी! धक्के सोडायचे तरी किती? पण, सवय लावून घ्या! काँग्रेस अदानींच्या विरोधात पार्लमेंट ठप्प करत असताना अदानी पवारांना मेंटॉर म्हणतात. हा यू-टर्न नाही, तर

Advertisement

प्रॅक्टिकल पॉलिटिक्सचाच क्लास आहे. यातून शिकायचे काय? आणि विकायचे काय? हे पुढच्या पिढीला सहज समजावे असा हा धडा आहे. शरद पवार हे जाणतात की सत्ता बदलते, व्यवहार बदलत नाहीत. 1990 पासून ते अनेक सरकारांमध्ये होते काँग्रेस, भाजप, शिवसेना, अगदी महायुतीमध्येही दृश्य अदृश्य रूपाने सामील आहेत. 2023 मध्ये अजित पवारांनी त्यांच्या पक्षात फूट पाडली. स्वत: अजित पवार एनडीएमध्ये गेले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री झाले. तिथे त्यांनी या प्रॅक्टिकल

पॉलिटिक्सचे अनेक धडे आपण कसे गिरवले आहेत हे दाखवून दिले. परिणामी मित्र पक्षांना निधीसाठी ठणाणा करावा लागला. पण दादांचे तत्व म्हणजे तत्व होते. इतरांना पिळून काढण्यासाठी त्यांच्याकडे नियमांचे पुस्तक होते. पूर्वीच्या सरकारचा निधी आणि विकासकामे रोखली असा आरोप होतो. पण नंतर त्यांनी तोच निधी आपल्या आवडत्या आणि नावडत्यांमध्ये बरोबर वाटून दाखवला हे सुद्धा प्रॅक्टिकल पॉलिटिक्सच. त्यावेळी अनेक ठिकाणी पवारांचे समर्थक अजित पवारांना वाकुल्या दाखवत होते. आता हे चित्र बघून ते निष्ठावान समर्थक मातीत मान घालायचे तेवढे राहिले आहेत. आपण कशासाठी आणि कोणासाठी भांडलो? असा त्यांना पडलेला प्रश्नच मिथ्या आहे. हे जग धावते आहे आणि त्याच्या बदलानुसार बदलले पाहिजे. लोक काय विसरून जातील, ते विसरण्यासाठीच जन्माला आले आहेत हे प्रॅक्टिकली कायमचे मान्य केले पाहिजे. कारण, महाराष्ट्रात उभी फूट पडून लोक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. घसा कोरडा पडेपर्यंत ओरडत राहिले आणि कोसळत्या पावसातही ऐकत राहिले. त्यांनी आपली फसवणूक झाली असे समजू नये तर त्यांना एक नवा धडा शिकायला मिळाला म्हणून थोर गुरुचे पाद्यपूजन करत राहिले पाहिजे. कारण, 2025 मध्ये पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताहेत. “परिवार पुन्हा एकत्र” असं अजितदादा म्हणतात. बारामतीतल्या या कार्यक्रमाने हे स्पष्ट झालं. शरद पवारांची भूमिका बदलणं ही स्ट्रॅटेजी आहे. इतरांनी बदलली की ती गद्दारी असते... त्यामुळेच पवार एकाच वेळी  विरोधक आणि मित्र दोघांनाही हाताळतात. आज इंडियामध्ये, उद्या एनडीएच्या जवळ, परवा अदानींच्या मंचावर असतात. विशेष म्हणजे या सगळ्या ठिकाणच्या तत्वनिष्ठ नेत्यांना सुद्धा ते हवे असतात. त्यांचं सुद्धा ते प्रॅक्टिकल पॉलिटिक्सचं एखादं मॉडेलच असावं. असे प्रयोग करत राहून या देशाचा विकास होतो आणि राजकारणातील एक्सलन्स साधता येतो. अर्थात त्यामध्ये काहींचा अॅक्सीडेंट होतो. पण तेवढी किंमत तर चुकवावी लागणारच? शेवटी प्रॅक्टिकल विचार महत्त्वाचा! 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पवारांनी अदानी मुद्दा टाळला, 2025 मध्ये मात्र अदानींना युवकांची प्रेरणा म्हणून सादर केलं. हा बदल व्यवहारसाठी, बारामतीच्या विकासासाठी, आणि पवार कुटुंबच्या एकजुटीसाठी. आपण त्यावेळी प्रॅक्टिकल व्हायचं. हिंडनबर्गचा रिपोर्ट आणि लवासा सिटीच्या प्रकरणातून सुटका या अध्यायांना इतिहासाच्या पानातील ‘आग्dरयाहून सुटका’ मानायचे! प्रॅक्टिकल होताना टॅक्टिकल ही असलेच पाहिजे ना! तरुण राजकारण्यांनो, शरद पवारांकडून शिका: टीका करा, पण दरवाजा बंद करू नका. फूट पाडा, पण रियुनियनची तयारी ठेवा. मेंटॉर बना किंवा बनवा, ज्यांच्याकडून फंडिंग आणि मेंटॉरशिप दोन्ही मिळेल असे शोधा. आणि सर्वांत महत्त्वाचं भूमिका बदलणे ही कमजोरी नाही, तर ताकद आहे... हे बाळकडू पचवायची तयारी ठेवा. बारामतीतल्या या एआय सेंटरने एक गोष्ट सिद्ध केली शरद पवार अजूनही गेम चेंजर आहेत. ते राजकारण खेळतात, पण व्यवहार जिंकतात. म्हणूनच प्रॅक्टिकल पॉलिटिक्सची शरद पवारांसारखी सवय ठेवा. कारण महाराष्ट्रात अजूनही पवार हेच राजा आहेत आणि प्रजा ही राजा सारखीच असली पाहिजे!

Advertisement
Tags :

.