कपिलेश्वर तलाव परिसरातील गटारीसाठी खोदकाम सुरू
बेळगाव : कपिलेश्वर जुन्या तलावात सांडपाणी शिरत असल्याबाबत तरुण भारतमधून सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या महापालिकेकडून परिसरातील गटारीचे काम हाती घेण्यात आले आहे. जेसीबीद्वारे खोदकाम केले जात असून अतिक्रमणही हटविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. कपिलेश्वर जुन्या तलावात वर्षानुवर्षे शहर व उपनगरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून सदर तलावात गटारीतील सांडपाणी झिरपत आहे. त्यामुळे तलावातील पाणी दूषित बनत असून तलावाचे पावित्र्यही धोक्यात आले आहे. त्यातच मकर संक्रांतीदिवशी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यावेळीही गटारीतील सांडपाणी तलावात शिरल्याने दुर्गंधी पसरली होती. याबाबत तरुण भारतमधून सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या दुर्लक्षपणाबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर गटारी बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे.