जुने बेळगाव-धामणे रस्त्यावर खोदाई केल्याने वाहनधारकांना त्रास
धामणे : जुनेबेळगाव ते धामणे रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने खोदाई करून हा रहदारीचा रस्ता गेल्या 12 ते 15 दिवसांपासून बंद केल्याने धामणे व जुने बेळगाव येथील वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बळ्ळारी नाल्याच्या शेजारुन ड्रेनेजची पाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आले असून ही पाईप घालण्यासाठी जुनेबेळगाव ते धामणेला जाणाऱ्या रस्त्याची खोदाई करण्यात येवून 12 ते 15 दिवस झाले. परंतु या रस्त्याची खोदाई करून काम बंद ठेवण्यात आल्याने या रस्त्याने ये-जा करणाऱ्या चारचाकी ट्रॅक्टर आणि मोठी वाहने रस्त्याची खोदाई केल्यापासून या वाहनांची या रस्त्याने रहदारी बंद झाली आहे. त्यामुळे जुनेबेळगाव पुणा-बेंगळूर रोडला जायचे झाल्यास धामणे वडगाव रस्त्याने दोन कि.मी. अंतर लांब पल्ला होत आहे. त्याचप्रमाणे जुनेबेळगाव येथील शेतकऱ्यांची शेती बळ्ळारी नाल्याच्या पलिकडे जास्त प्रमाणात असल्याने हा रस्ता खोदाई करून ठेवल्याने शेतकऱ्यांनासुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर येथे पाईप लवकर घालण्यात येत नसेल तर रस्त्यांची खोदाई का करण्यात आली, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून आणि वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.