हिंदवाडीत ड्रेनेज कामासाठी खोदकाम; वाहनधारकांना समस्या
लवकरात लवकर काम संपवून मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करा
बेळगाव : हिंदवाडी येथील मुख्य रस्त्यावर ड्रेनेज पाईपलाईनच्या नावाखाली खोदकाम करण्यात आले आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून काम हाती घेण्यात आले आहे. जेसीबीच्या साहाय्याने कॉक्रीट फोडण्यात येत असून त्याठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन घालण्यात येणार आहे. यामुळे एकेरी वाहतूक करण्यात येत असून याचा काहीसा परिणाम वाहनधारकांवर होत आहे. यासाठी लवकरात लवकर काम संपवून मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याची मागणी रहिवाशी व वाहनधारकांतून होत आहे. मुख्य रस्त्यावर डेनेज पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू करण्यात आले असून त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून सदर काम राबविण्यात येत असून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील काँक्रीट फोडून नवीन डेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यामुळे सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामुळे रोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडी, पर्यायी मार्गांचा वापर आणि प्रवासासाठी वाढलेला वेळ अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर शाळा महाविद्यालये असल्याने या परिसर नेहमी गर्दीने फुलून गेलेला असतो. सकाळी शाळा-कॉलेज व कार्यालयीन वेळेत तसेच सायंकाळच्या गर्दीच्या काळात वाहतूक संथगतीने सुरू असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाने काम जलदगतीने पूर्ण करून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.