बसस्थानकासमोर जीवनप्राधिकरणाकडून खोदकाम
सातारा :
करंजे भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने बसस्थानकासमोर असलेल्या महसुल भवनाच्या कोपऱ्यावर खोदकामाला गुरुवारी सकाळी सुरुवात केली. ही खोदाई करण्याची परवानगी बांधकाम विभागाकडून घेण्यात आली का?, खोदकाम केल्यानंतर बिघाड झालेली समस्या सापडली काय हे काही समजू शकले नाही. दुपारपर्यंत हे काम सुरु होते. त्यामुळे करंजे भागात पाण्याची टंचाई होणार आहे.
जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करंजे भागाला पाणी पुरवठा करण्यात येतो. त्याची एक जलवाहिनी पोवई नाका मार्गे बसस्टॅण्डमार्गे तशीच करंजे भागात नेण्यात आली आहे. त्याच पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याचा संशय म्हणून स्टॅण्डच्या समोर असलेल्या महसूल भवनाच्या कोपऱ्यात सकाळपासून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरु होते. दुपारी 2 वाजेपर्यंत हे काम सुरु होते. त्यामुळे याची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता जंगम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच अभियंता पल्लवी मोटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे या कामाची माहिती मिळू शकली नाही. मात्र, या कामामुळे करंजे परिसराला पाण्याची टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.