For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

खोदलेली पणजी बनली ‘रिस्कच रिस्क’!

10:47 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
खोदलेली पणजी बनली ‘रिस्कच रिस्क’

राजधानीतील 19 रस्त्यांवर खोदकाम : वाहने हाकण्यात असतो मोठा धोका,जिथे जाईल तिथे पार्किंगची अडचण,बहुतांश व्यावसायिकांना मोठा फटका,मार्केटातील दुकानांवर फिरकेना कोणी,आर्थिक उलाढालीवर होतोय मोठा परिणाम,कुठुनही आलात तरी पणजीत कोंडीच कोंडी

Advertisement

पणजी : काही वर्षांपूर्वी राजधानी पणजीत येताना शहराचे देखणे ऊप दृष्टीस पडत होते. परंतु आता स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमुळे पणजी शहर बकाल बनल्याचे पहावयास मिळत असून अत्यंत धोकादायक बनले आहे. जिथे जाईल तिथे धोका संभवतो. शहरात 19 रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरु असल्याने नागरिकांना पणजीत येताना सावधानता बाळगावी लागत आहे. रस्त्यांची वाताहत झाल्याने सर्वत्रच जोखीम पत्करून वाट शोधावी लागत आहे. एका बाजूने वाहने चालवायला जागा मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूने वाहने पार्क करायलाही मिळत नाही. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी पणजीत येताना विचार करूनच यावे, अशी सद्य:स्थिती आहे. संपूर्ण शहरात पार्किंगचा बोजवारा उडालेला मुख्य शहर, मळा, सांत इनेज, ताळगाव अशा सर्वच भागांमध्ये खोदकाम सुरु असल्याने पार्किंगचा बोजवारा उडालेला आहे. वाहनांना जागा मिळेल तेथून वाट काढावी लागते. शहरातील नेमके कोणते रस्ते वाहतुकीसाठी योग्य आहेत, याचा थांगपत्ता लागत नाही. राजधानातील महत्त्वपूर्ण असलेले मार्केटमधील व्यवसायही थंडावले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांवर कपाळावर हात मारण्याची वेळ आलेली आहे. मार्केटातील व अनेक रस्त्याच्या बाजूकडील कपड्यांची, फळांची, खाद्यपदार्थांची दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने  त्याचा परिणाम व्यावसायिकांच्या आर्थिक उलाढालीवर झालेला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेली कामे कधी पूर्ण होणार याचा निश्चित कालावधी जाहीर केलेला असला तरी तोपर्यंत कामे होतील की नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणखी किती दिवस हा त्रास सहन करावा, असा सवाल पणजीवासीय विचारू लागले आहेत. पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर यांनी या कामांवर संशय व्यक्त करून कामाचे ऑडिट पूर्ण केल्यानंतर ते काम सुरू करावे, अशी भूमिका घेतली आहे. याचे कारण म्हणजे लोकांमध्ये आता उद्रेक होत आहे. सध्या शिमगोत्सवासारखे उत्सवी वातावरण असल्याने तसेच पर्यटन हंगाम सुरू झाला असला तरी पणजी शहराची वाताहत झाल्याने त्याचा जबरदस्त फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

लोकांना न पटणारी उत्तरे

Advertisement

स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ संजित रॉड्रिग्ज हे नियोजनबद्धरित्या काम सुरू असल्याचे सांगत असले तरी लोकांना ते न पटण्यासारखे वाटत आहे. याचे कारण म्हणजे डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पुन्हा पुन्हा खोदकाम सुरू करण्यात येत आहे. पणजी पोलिस ठाण्याच्या मुख्यालयासमोर ख•ा पडल्याने रस्ता खचला आहे. अशीच परिस्थिती शहरातील बहुतांश रस्त्यांची बनली आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती हाताबाहेर जात आहे.

Advertisement

येणारा पावसाळा वाढवतो धाकधूक

जसा जसा पावसाळा तोंडावर येतो, तशी पणजीवासीयांची धाकधूक वाढते. यंदा तर ती अधिकच वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत सुरू असलेली विविध कामे आणि ही वेळेत पूर्णत्वास यावीत याकडे प्रशासनाकडून होत असलेली डोळेझाक हेच आहे. शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था बकाल झाली असून, त्यामुळे वाहनचालकांना वेठीस धरले जात आहे. सुरू असलेली कामे सद्य:स्थितीत अर्धवट असल्याने नेमकी ती कधी पूर्णत्वास येणार हे ठोसपणे एकही अधिकारी व कंत्राटदार सांगण्याचे धारिष्ट्या दाखवत नाही. यावरूनच नियोजनशून्य कारभारामुळे पणजीवासीयांसाठी यंदाचा पावसाळा हा अधिकच त्रासांचा ठरणार आहे.

पावसाळ्यात काय होणार..?

थोड्याच दिवसांवर मान्सून येऊन ठेपला आहे. अशातच राजधानीत सुरू असलेली बहुतांश कामे खोळंबलेली आहेत. मिळेल त्या ठिकाणी खोदकामे केलेली आहेत. ही कामे जागेवर येण्यासाठी आवश्यक गती नाही, अगदी संथस्वऊपात सुरू आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ पणजीवासीयांना जोखीम पत्करूनच घालवावा लागणार आहे. दरवर्षी पणजी शहरातील अनेक भागात पाणी साचते, अनेक घरात तुंबते, फुटपाथवरही गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते. अशा परिस्थिती यंदा काय होणार? अशी चिंता पणजीवासियांना लागून राहिली आहे.

वाहतूक कोंडी बनली नित्याचीच

पर्वरीहून पणजी शहरात येताना मांडवी पुलावर दिवसातील अनेकवेळा वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. रायबंरहून पणजीत येतानाही परिस्थिती वेगळी नाहीय. महामार्गावरुन आले तरीही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागतेच. पणजीत आल्यानंतर नेमके कुठले रस्ते सुरक्षित आहेत याचा थांगपत्ता नाही. बहुतांश रस्ते खोदल्याने आपण नेमके कोणत्या रस्त्याने जावे, याबाबत लोकांसाठी दिशादर्शक फलकही उभारलेले नाहीत. वाहने पार्किंग करण्यासही वाव नाही. त्यामुळे लोकांना स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामामुळे वेठीस धरण्याचाच प्रकार सध्या पणजीत सुरू आहे.

Advertisement
Tags :
×

.