बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 41 केंद्रांवर परीक्षा
बारावीची अंतिम परीक्षा आजपासून : केंद्रावर कडक बंदोबस्त
बेळगाव : बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक अखेर अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवार दि. 28 फेब्रुवारीपासून अंतिम परीक्षेला सुरुवात होत असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. विद्यार्थ्यांनी तणावाखाली न जाता अभ्यासपूर्व प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, असे आवाहन पदवीपूर्व शिक्षणा विभागासह प्राध्यापकांनी केली आहे. शनिवारपासून परीक्षा असल्याने शुक्रवारी परीक्षा केंद्रांवर क्रमांक घालण्याची धावपळ सुरू होती. पहिल्या दिवशी कन्नड विषयाचा पेपर घेतला जाणार आहे. बेळगाव शहरांसह तालुक्यात कन्नड विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असले तरी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील इतर परीक्षा केंद्रांवर संख्या अधिक असणार आहे.
कोठेही कॉपीचे प्रकार घडू नयेत, यासाठी कडक बंदोबस्त व नजर ठेवण्यात आली आहे. मागील काही वर्षात पेपर फुटीच्या घटना घडत असल्याने पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून 12 वीच्या परीक्षेबाबत कडक अंमलबजावणी केली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसविले असून त्याचे वेबकास्टिंग जिल्हा पंचायत कार्यालय, धारवाड येथील विभागीय कार्यालय, तसेच बेंगळूर येथील कार्यालयात होणार आहे. कोठेही कॉपीचे प्रकार दिसून आल्यास संबंधित महाविद्यालयाची मान्यता रद्द केली जाऊ शकते, असा इशाराही पदवीपूर्व विभागाने यापूर्वी दिला आहे. या वर्षीही परिवहन मंडळाच्यावतीने परीक्षार्थींना मोफत बसप्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
- 22411-एकूण विद्यार्थ्यांची संख्या
- 41-परीक्षा केंद्र