For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनंत चतुर्दशी दिवशीच परीक्षा : विद्यार्थ्यांचा हिरमोड

07:22 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनंत चतुर्दशी दिवशीच परीक्षा   विद्यार्थ्यांचा हिरमोड
Advertisement

पेपर पुढे ढकलण्याची पालकांची मागणी : जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज

Advertisement

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सहामाही परीक्षा बुधवार दि. 23 पासून सुरू होणार आहे. परंतु अनंत चतुर्दशीदिवशीच पहिली ते दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बेळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत कमी असते. त्यामुळे शुक्रवारी असलेले पेपर पुढे ढकलण्याची मागणी पालकांमधून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात येत आहे.

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून गुरुवार दि. 17 रोजी सहामाही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. यामध्ये पहिली ते पाचवीच्या 23 ते 28 दरम्यान परीक्षा होणार आहेत. सहावी ते आठवीच्या 23 ते 30 दरम्यान परीक्षा होणार आहेत. तर नववीच्या 23 ते 30 दरम्यान परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दसऱ्याच्या सुटीपूर्वी परीक्षा संपवण्यासाठी या पद्धतीने वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

पहिली ते पाचवीचा गणित, सहावी ते आठवीचा गणित व नववीचा तृतीय भाषा पेपर शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणेशमूर्तीच्या विसर्जनाऐवजी परीक्षा देण्यासाठी शाळांमध्ये उपस्थित राहावे लागणार आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी अनंत चतुर्दशीदिवशी अनुपस्थित असतात. त्यामुळे परीक्षेलाही किती विद्यार्थी उपस्थित राहतील, याची चिंता शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.

वेळापत्रकात बदलाचा जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना अधिकार

शुक्रवार दि. 25 रोजी अनंत चतुर्दशी असून त्या दिवशी घरोघरी असलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन होते. इतकेच नाही तर सायंकाळनंतर बेळगावमध्ये मोठी विसर्जन मिरवणूक काढली जाते. परंतु त्याच दिवशी परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येणार आहेत. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना वेळापत्रकात बदल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे 25 रोजी होणाऱ्या परीक्षा 1 ऑक्टोबर रोजी घेतल्यास विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

Advertisement

.