For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपसाठी परीक्षा तर काँग्रेससाठी सत्त्वपरीक्षा

06:38 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपसाठी परीक्षा तर काँग्रेससाठी सत्त्वपरीक्षा
Advertisement

निवडणूक एकतर्फी झालीच नाही. निवडणूक प्रचार मात्र एकतर्फीच झाला. एकीकडे पैशांचा प्रभाव तर दुसरीकडे पैशांचा अभाव. हेच एकतर्फी प्रचाराचे कारण असावे. उत्तरेत राजकारणात अनेक पावसाळे पाहिलेले अनुभवी उमेदवार तर दक्षिणेत राजकारणात आत्ताच कुठे प्रवेश करणारे अननुभवी उमेदवार. धर्म आणि ज्ञाती समाजांचा धुमाकूळ अतीच झाला. मठाधीशही मागे राहिले नाहीत. भाजपने गोव्यातील निवडणुकीला बरेच महत्त्व दिले. काँग्रेसने मात्र गोव्याकडे गांभिर्याने पाहिले नाही. काँग्रेसचे महाराष्ट्रवादी अॅड. रमाकांत खलप हरले तर त्यांची ही शेवटची निवडणूक ठरेल आणि श्रीपाद नाईक जिंकले तरी शेवटची निवडणूक. दक्षिण गोव्यातून नौसैनिक लोकसभेत पोहोचतो की उद्योगपतींची अर्धांगिनी इतिहास घडविते हे पाहण्याची उत्सुकता साऱ्यांनाच लागलेली आहे. ही निवडणूक भाजपसाठी परीक्षा आहे तर काँग्रेससाठी मात्र सत्त्वपरीक्षाच आहे.....

Advertisement

आजकाल राजकीय पक्ष जिंकण्याची हमी एवढेच पाहतात. एखाद्या औद्योगिक घराण्यातील सून गोव्याच्या लोकसभा निवडणुकीत उतरेल, असे दीड महिन्यापूर्वी कुणाला वाटले नव्हते मात्र अप्रूप घडले. देशात भाजप सत्तेत आल्यापासून काँग्रेस पक्षाने उद्योगपतींच्या नावाने शंख सुरू केलेला आहे. विशिष्ट उद्योगपतींचा देशातील नागरिकांनी तिरस्कारच करावा, असेच त्यांना वाटते. अदानी, अंबानीविरुद्धचा द्वेष मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा दिसला नाही. गोव्यातही अनेक उद्योगपती आहेत मात्र जनसामान्यांच्या मनात किंवा राजकीय नेत्यांमध्येही त्यांच्याबद्दल द्वेष नाही, आदरच आहे परंतु पल्लवी श्रीनिवास धेंपे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि भाजपविरोधी राजकीय पक्षांना दुधात मिठाचा खडा पडल्यासारखे वाटू लागले. त्यांच्या संपत्तीचा पंचनामा सुरू झाला. कुठे कुठे आणि किती किती संपत्ती आहे,

Advertisement

याचाच प्रचार अधिक होऊ लागला. देशातल्या अनेक नेत्यांच्या नातवंडांकडेसुद्धा उत्पन्नाचे कुठलेच साधन नसताना शेकडो कोटींची संपत्ती असल्याचे आपण ऐकतो, वाचतो. ते खरेतर आश्चर्य. पल्लवी धेंपेकडे संपत्ती असणे यात आश्चर्य नाही.

पूर्ण महिना आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघाला. शेवटी महिन्याभराच्या प्रचारानंतर एकदाचे मतदानही झाले. उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांनी जीव ओतून प्रचार केला. भाजपच्या तुलनेत काँग्रेस प्रचारात मागे पडला. काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर करण्यास बराच विलंब केला. त्यामुळे निवडणूक एकतर्फी होणार, असे वाटू लागले होते मात्र निवडणूक एकतर्फी झाली नाही. शेवटी काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपची चिंता वाढवलीच. खरेतर माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप हे बलाढ्या उमेदवार. मागची पंचवीस वर्षे ते काँग्रेसमध्ये आहेत मात्र मागच्या चार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला खलपांची पात्रता समजली नाही. खलप प्रत्येक निवडणुकीत तिकीटाची प्रतीक्षा करीत राहिले. शेवटी 2024 मध्ये काँग्रेसचा नाईलाज झाला आणि खलप उमेदवारीसाठी पात्र ठरले. काँग्रेसने खलपांच्या पाठीवर हात ठेवला आणि लढ म्हटले. खलपांसाठी काँग्रेसने यापेक्षा वेगळे काही केले असेल, असे वाटत नाही. भाई खलप हरले तर त्यांची ही शेवटची निवडणूक असेल. श्रीपादभाऊंनी आधीच सांगून ठेवलंय, भाजप पुढच्या निवडणुकीत तरुण उमेदवार देईल. त्यामुळे श्रीपादभाऊ जिंकले तरी त्यांची ही शेवटचीच निवडणूक असेल.

गोव्याच्या दोन्ही मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली. विधानसभा निवडणुकीत रिव्होल्युशनरी गोवन्सने पहिल्याच पदार्पणात दहा टक्के मते काढून काँग्रेसला धक्का दिला होता. राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकीत आरजीला फारसे महत्त्व नसले तरी यंदाही काँग्रेस आणि भाजपला आरजीचा थोडा-फार फटका बसेल. ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांनी काँग्रेसला प्रचारात नावापुरती साथ दिली मात्र मते खेचण्यासाठी किती साथ मिळाली, हे निकालानंतरच कळेल. यंदाच्या निवडणुकीत 75.20 टक्के एवढे मतदान झाले. त्यात दक्षिण गोव्यासाठी 73.90 टक्के एवढे तर उत्तर गोव्यासाठी 76.54 एवढे मतदान झाले. दहा वर्षांपूर्वी गोव्यात 77 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मागच्या निवडणुकीत 74.72 टक्के मतदान झाले होते. यंदा मतांचा टक्का वाढला आहे. मतदारांचा कौल सीलबंद आहे. निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली आहे. गोव्यातील काँग्रेससाठी तर ही सत्त्व परीक्षाच आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री देखील येऊन गेले. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी मात्र पाठ फिरविली. शशी थरूर जरूर आले आणि काही ठिकाणी छोट्या सभाही घेतल्या मात्र त्यांची इंग्रजी मतदारांच्या डोक्यावरूनच गेली असेल, हे निश्चित.

भाजपला वेठीस धरण्यास काँग्रेसकडे म्हादई आणि महागाईशिवाय विशेष मुद्दे नव्हतेच. कोळसा आणि रेल्वे दुपदरीकरण दक्षिण गोव्यात चर्चेला आले मात्र कोळसा आणि रेल्वे दुपदरीकरण ही काँग्रेसचीच देणगी, हे जनतेला माहीत नाही, असे नाही. भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात फारसा प्रभाव पाडू शकला नाही. खाणींचा मुद्दा आता विस्मृतीत जाऊ लागला आहे. दुहेरी नागरिकत्त्वाचा मुद्दा विरोधकांना महागात पडला. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी संविधानाचा केलेला अपमान बराच गाजला. जिंकून  येण्यापूर्वीच अंतरंग दाखविण्याची गरज नव्हती. ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ असेच म्हणता येईल. या उमेदवाराच्या नौदलातील सेवेचेही नको तितके भांडवल इंडिया आघाडीने या निवडणुकीत केले. मंत्री विश्वजित राणे यांनीही धमाल उडवली. ते  संघांशी समर्पित झाले. काँग्रेसमध्ये असतानाही प्रतापसिंह राणे यांनी श्रीपाद नाईक यांनाच पाठिंबा दिला होता, अशी स्पष्ट कबुली देऊन मंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या वडिलांची गद्दारीच चव्हाट्यावर आणली. बिच्चारे काँग्रेस नेते तरीही गप्पच राहिले.

ही तिसरी लोकसभा निवडणूक जी नरेंद्र मोदींच्या प्रतिमेभोवतीच फिरत आहे. गोव्यात वेगळी परिस्थिती नाही. भाजपच्या मतदारांना स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्दे महत्त्वाचे वाटतात, ही वस्तुस्थिती आहे. जातीपातीच्या नेत्यांनी राजकारणात उघडपणे गोंधळ घालण्याची गरज नव्हती. एसटी, ओबीसी, भंडारी, वैश्य, दैवज्ञ व इतर नावांनी पाठिंब्याच्या वल्गना झाल्या. जे यापूर्वी कधी झाले नव्हते. हे नेते आपल्या ज्ञाती बांधवांना गृहीत धरण्याची चूक करतात. कुंडईच्या मठाधीशांनी रामराज्यासाठी मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले. पर्तगाळला तर यंदा हक्काचाच उमेदवार मिळाला. त्यामुळे हिंदूंच्या या संतांची भूमिका लपून राहिली नाही. मतदारांना राजकीय सल्ले देण्याची ख्रिश्चन चर्चची तर परंपराच आहे.

अनिलकुमार शिंदे

Advertisement
Tags :

.