कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उक्रांती आणि पूर्णत्व

06:47 AM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एकदा रत्नागिरीहून मालगुंड या कवी केशवसुतांच्या गावी जाताना समुद्रकिनारी एक वेगळे दृश्य दिसले. भर दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास तळपत्या उन्हात समुद्रकिनारी समुद्राकडे बघत एक गायींचा कळप उभा होता. या गायी तिथे कां गेल्या असाव्यात हा प्रश्न मनात उमटला. ना प्यायला पाणी न चारा.

Advertisement

वाळूत पाय रुतवून ध्यानस्थपणे समुद्राकडे बघणाऱ्या गायी मौनातून सागराचे चिंतन करत असतील का? पशुजातीमध्ये गाय ही सर्वात उक्रांत अवस्था आहे. गायीच्या जन्मानंतर मनुष्यजन्म प्राप्त होतो, असे म्हणतात. माणसाची दुसरी आई असणारी गाय समस्त मुक्या प्राण्यांची वाचा आहे. समुद्र हा सगुण साकार परमात्मा, तर पृथ्वी गोमातेचे रूप घेऊन साकार होते, असे म्हणतात. ही दोन पंचमहाभूते एकमेकांची आराधना करीत असावीत, असे वाटले.

Advertisement

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत, ‘जनावरांपैकी गायीला विशेष महत्त्व आहे. ती दूध देते, शेतीला बैल पुरवते, खतनिर्मिती करते हे सर्व ठीकच आहे; परंतु गायीमध्ये थोडी मानवी भावना आहे. इतर जनावरांमध्ये ती क्वचित आढळते. गायीवर आपण जे प्रेम करतो ते तिचे मन जाणते. भगवंताला देखील ती प्रिय आहे. ‘पशुंना प्रारब्ध, पूर्वकर्म असते का हो? गुजरातमधील श्रीक्षेत्र डाकोर येथे चहूकडे गायी दिसतात. त्या अतिशय देखण्या आहेत. काही पांढऱ्याशुभ्र, काही काळ्याभोर, तर काही विविध रंगांचे ठिपके ल्यालेल्या या गायींची शिंगे मोठी डौलदार असून त्या धष्टपुष्ट आहेत. त्यांचे दूध चवदार आणि पौष्टिक आहे.

हा श्रीकृष्णाजवळ असणाऱ्या गायींचा गोवंश तर नाही ना? ती भूमी श्रीकृष्णाचा पावन स्पर्श झालेली आहे आणि कान्हा म्हटले की मनुष्याच्या आधी गायींचा विचार मन करू लागते. या गायींना समृद्ध परंपरा ही नशिबाने लाभली की काय? तिथे जन्मलेल्या गायी भाग्यवान आहेत. मुबलक चारापाणी आणि रहिवाशांचे अलोट प्रेम त्यांना लाभले आहे. रमण महर्षींच्या आश्रमात एक गाय होती. तिचा पूर्वजन्म हा रमण महर्षींची सेवा करणाऱ्या एका म्हातारीचा होता. रमण महर्षी त्यांच्या साधनाकाळात एका गुहेत आठ-आठ दिवस समाधीत असत. त्यावेळी त्यांना त्यांच्या देहाचे भान नसे. तेव्हा एक म्हातारी बाई त्यांची मनोभावे सेवा करीत असे. रमण महर्षींची खूप सेवा करावी अशी तिची इच्छा होती; परंतु तिचा अंतकाळ जवळ आला होता. तिचा मृत्यू झाल्यावर ती रमणांच्या आश्रमात गाय म्हणून जन्माला आली. एकदा ही गाय आजारी पडली तेव्हा रमण महर्षींनी तिचे मुख मांडीवर घेऊन तिला तीर्थ पाजले. तिचा मृत्यू झाला तेव्हा तिचे माणसांसारखे क्रियाकर्म केले. ते म्हणाले, सेवा करण्याची इच्छा अपुरी राहिल्यामुळे ही म्हातारी परत आली होती. आता तिला मुक्ती मिळाली. संतांच्या सहवासात, स्पर्शात पशुंना मुक्ती देण्याचे सामर्थ्य असते. गायीला माणसांच्या आयुष्यात खूप महत्त्व असले तरी उपाशी, भुकेल्या उगीच इकडे तिकडे हिंडत उष्टे, खरकटे खाणाऱ्या, क्वचित खाटकाच्या हाती पडणाऱ्या गायी बघितल्या की वाटते पशुंना पूर्वकर्मानुसार जगणे लाभत असावे.

संत एकनाथ महाराजांनी काशीची गंगा वाळवंटातील तहानलेल्या, तडफडणाऱ्या गाढवाच्या तोंडात घातली तेव्हा प्राण जात असलेल्या त्या गाढवाला हुशारी आली आणि ते ताजेतवाने झाले. नाथांबरोबर असलेल्या भक्त आणि विद्वानांना ते काही आवडले नाही. तेव्हा नाथ महाराज हसून म्हणाले, ‘देव सर्वत्र आहे. देहाच्या बाजूने बघाल तर राजाचा देह आणि गाढवाचा देह सारखाच आहे. इंद्राचा आणि मुंगीचा देहही सारखाच आहे, याचा अर्थ नश्वर आहे. सगळ्या देहांचा नाश निश्चित आहे. देहाचा पडदा दूर केला की प्रत्येकामध्ये हरीचे दर्शन होते. प्रत्यक्ष नाथ महाराजांच्या हातून गंगा मुखात जाणे हे त्या गाढवाचे भाग्यच. त्याला पुढचा जन्म उक्रांत होणारा पुढे पुढे जाणाराच मिळाला असेल यात शंका नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातही अशीच गोष्ट आहे. कडक उन्हाळ्यात एक अशक्त, रोगी गाढव भर दुपारी महाराजांच्या मंदिरासमोर येऊन पडले. महाराजांना हे कळताच महाराज त्याच्याजवळ गेले. प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवू लागले. महाराजांनी गंगा मागवली आणि तिथे जमलेल्या सर्वांना मोठ्याने नाम घेण्यास सांगितले. तोंडात गंगा पडताच त्या गाढवाने एकवार महाराजांकडे बघितले आणि प्राण सोडले. महाराज म्हणाले, रामाने त्याचे कल्याण केले. पुढचा जन्म त्याला चांगला येईल. सगळे जीव इथून तिथून सारखेच. अंतकाळी मदत झाली तर जीवप्राणी उध्दरून जातात. मग ते गाढव असले म्हणून काय झाले?

श्री दत्तात्रेयांच्या रूपाचे वर्णन करताना संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘काखे झोळी पुढे श्वान’. दत्तप्रभूंजवळ श्वान आहेत. श्री दत्तक्षेत्रावर श्वान असतातच. श्वानांनाही कर्माने जन्म मिळत असावा. काही श्वान श्रीमंताघरी ऐश्वर्य भोगत असतात. श्री दत्त मंदिरात राजा नावाचा एक उमदा, तगडा श्वान आहे. रोज सकाळी तो शंखध्वनी करावा तसा आवाज काढतो. त्याच्या सभोवती असणाऱ्या भक्तांचे सद्विचार आणि सतत नामधून कानावर असल्यामुळे तो सात्विक वृत्तीचा आहे. शाकाहारी तर तो आहेच. पपई, केळी, पेढे तो आवडीने खातो. ओले खोबरे, सत्यनारायणाचा प्रसाद शिरा त्याला आवडतो. या राजाची पुढची इयत्ता कोणती असेल? भजनपूजन करणाऱ्या कुटुंबात तो माणूस म्हणून जन्माला येईल का? राजाचे कर्म चांगले असेल म्हणून तो देवापाशी आला; परंतु या जन्मी तो पराधीन आहे. माणसांवर अवलंबून आहे.

अध्यात्मशास्त्र सांगते की जिवाचा प्रवास हा पशुत्वाकडून मानवाकडे, नंतर महामानवाकडून देवत्वाकडे व देवत्वातून मोक्षाकडे होतो. प्रत्येक जीव हा उक्रांतीकडे जायला हवा. पशुपक्ष्यांच्या हातात चांगले कर्म करण्याची कुठलीही पात्रता नाही म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘पक्षी अजगर न करिती संचित, त्यासी अनंत प्रतिपाळी.’ मनुष्याशिवाय इतर योनीमध्ये मानवेतर सृष्टीचे पूर्वकर्म त्यांना उक्रांतीकडे नेत असावे.

मनात येते की काही साधारण नगण्य जीव मनुष्य सोडून एकदम संतांच्या जवळ कसे काय जातात? रमण महर्षींच्या एक अंतरंग शिष्या होत्या. त्यांचा विवाह ठरला तेव्हा त्या रमणांचा आशीर्वाद घेण्यासाठी आश्रमात आल्या तेव्हा रमण महर्षी डोंगरावर फिरायला गेले होते. ते पायथ्याशी येताच त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करावा म्हणून त्या पुढे झाल्या. तेव्हा रमण चटदिशी मागे झाले व त्यांनी दुरूनच आशीर्वाद दिला. तेवढ्यात असे झाले की रमण महर्षींच्या आश्रमातील एक कुत्री तिथे आली आणि सरळ त्यांच्या पायापाशी गेली. रमणांनी तिच्या पाठीवरून हात फिरवून म्हटले, ‘बरी आहेस ना ग?’ हे दृश्य पाहून त्या शिष्या रडू लागल्या व म्हणाल्या,  ‘भगवान, मी या कुत्रीपेक्षाही हीन आहे का? तुम्ही माझ्या पाठीवरून हात का नाही फिरवला? तेव्हा रमण महर्षी म्हणाले, ‘बाई, प्राण्यांना विकल्प नसतो म्हणून त्यांचे अंतकरण शुद्ध असते. माणसाचे तसे नसते.’

ही गोष्ट माणसाने ध्यानात ठेवली तर तो निश्चितच उक्रांतीकडे जाईल. इतर सृष्टी परतंत्र आहे. माणसाला प्रगल्भ मेंदू, हृदय आहे. चांगले कर्म करण्याची बुद्धी आहे. उक्रांतीतून पूर्णत्वाकडे जायचे असेल तर चैतन्यस्वरूपाशी आपल्या चित्ताची नाळ जोडून घ्यायला हवी. तरच हळूहळू विकासातून पूर्णत्व साधता येईल.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article