कुडाळ - मालवण मतदारसंघात २७९ मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन रवाना
कुडाळ / प्रतिनिधी
कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यासाठी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या मार्गदर्शनाखाली २७९ केंद्रावर प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवारी सकाळी कुडाळ तहसील कार्यालयाजवळ उभारण्यात आलेल्या मंडपातून या सर्व २७९ केंद्रांवर मतदान पथके ईव्हीएम मशीन व साहित्यासह रवाना झाली.यावेळी संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण होईल असे निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी सांगितले . दरम्यान विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिपूर्ण आढावा घेतला. दरम्यान या मतदारसंघात २ लाख १७ हजार १८६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार वैभव विजय नाईक (रा. बिजलीनगर कणकवली) - महायुतीकडून शिवसेनेचे निलेश नारायण राणे (रा.वरवडे कणकवली) -महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अनंतराज नंदकिशोर पाटकर (रा.हुमरमळा अणाव) - बहुजन समाज पार्टी कडून रविंद्र हरिश्चंद्र कसालकर (रा.कसाल) , रासप कडुन उज्वला विजय येळाविकर (रा. उद्यमनगर कुडाळ) - हे पाच उमेदवार आपले भवितव्य उदया अजमावणार असून ते उद्या बुधवारी भवितव्य मशीन मध्ये बंद होणार आहे म तदार संघातील २,१७, १८६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत
बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी २४ जीप व ४३ एसटी बस मधून कर्मचारी आपल्या साहित्यासह कुडाळ विधानसभा मतदारसंघात त्या-त्या केंद्रांवर मार्गस्थ झाले.तसेच झोनल अधिकाऱ्यांच्या ४५ जीप सुद्धा केंद्रांवर मार्गस्थ झाल्या.या मतदान प्रक्रियेसाठी महसूल विभागासह सह १ हजार २३२ कर्मचारी सहभागी झाले आहेत. कुडाळ विधानसभा मतदार संघात २७९ केंद्रावर प्रत्येकी २ पोलीस म्हणजेच २७९ केंद्रावर ५५८ पोलिस कर्मचारी सज्ज राहणार आहेत. १ ते १२२ केंद्रं मालवण तालुक्यात येत असून १२३ ते २७९ ही केंद्र कुडाळ तालुक्या अंतर्गत येत आहेत.कुडाळ विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख १७ हजार १८६ मतदार असून ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख ७ हजार ९६४ तर महिला मतदारांची संख्या १ लाख ९ हजार २२१ तर इतर १ मतदार आहे. कुडाळ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी मतदान केंद्रावर मार्गस्थ होण्यापूर्वी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा झाल्टे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व कर्मचारी एसटी बसने आपापल्या केंद्रांवर जाण्यासाठी रवाना झाले. कुडाळ तहसील नजिक उभारण्यात आलेल्या मंडपात कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य वाटप सुरू होते.यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी भेट देऊन परिपूर्ण आढावा घेतला.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेस रावले,सहाय्यक निवडणूक । निर्णय अधिकारी विरसिंह वसावे,वर्षा झाल्टे, शीतल जाधव,कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम आदी उपस्थित होते.
चोख पोलीस बंदोबस्त तैनात
कुडाळ मालवण मतदार संघात निवडणूक शांततेल पार पडावी यासाठी कुडाळ व मालवण दोन्ही तालुक्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.