For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निज्जर हत्या प्रकरणात न्यूझीलंडला हवेत पुरावे

06:22 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
निज्जर हत्या प्रकरणात न्यूझीलंडला हवेत पुरावे
Advertisement

जागतिक पोलिसगिरीतील पंचचक्षूंना कॅनडातील निज्जर हत्याकांड प्रकरणात भारताचा हात असल्याचे पुरावेच सापडत नाहीत. या पंचचक्षूपैकी एक असलेल्या न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विन्स्टन पिटर यांनी पुराव्याशिवाय खटला उभाच राहू शकत नाही, असे सांगून कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारत सरकार विरोधातील दावाच पत्रकारांसमोर खोडून काढला. न्यूझीलंडच्या या युक्तिवादामुळे कॅनडाचे पितळ उघडे पडले.

Advertisement

गेल्यावर्षी जून महिन्यात भारताला हवा असलेला दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांची हत्या करण्यात आली. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सूरे शहरातील एका गुरुद्वारातून बाहेर पडत असतानाच अज्ञात हल्लेखोराने निज्जर याची हत्या केली. भारत सरकारने फरार दहशतवादी म्हणून त्याच्यावर 10 लाख रुपयांचे इनाम घोषित केले होते. हरदीपसिंग निज्जर हे खलिस्तानी टायगर फोर्सचे प्रमुख होते. त्यांनी 2007 साली कॅनडाचे नागरिकत्व मिळविले होते.

पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालील कॅनडीयन सरकार खलिस्तानी चळवळीला सक्रिय पाठिंबा देत असून पंजाबमधील बहुतांश खलिस्तानी नेत्यांनी आपले बस्तान कॅनडामध्ये हलविले आहे. अशा या खलिस्तानी नेत्यांना कॅनडा सरकारचे पाठबळ असतानाही निज्जर याची हत्या झाल्याने ट्रुडो यांचा जळफळाट झाला होता. खलिस्तान्यांच्या जबर दबावापुढे झुकत अखेर पंतप्रधान जस्टीन यांनी निज्जर हत्याकांडात भारतीय एजंटांचा हात असल्याचा आरोप सप्टेंबर 2023 रोजी केला.

Advertisement

संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेवेळीच कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारत सरकारवर आरोप केल्याने दोन्ही देशांच्या संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. भारत सरकारने या आरोपांना पुष्टी देणारे पुरावे सादर करावेत, असे स्पष्ट शब्दात

कॅनडाच्या राजदूतांना दम भरला होता. मात्र या हत्याकांडाच्या प्रकरणात सखोल चौकशी करणाऱ्या रॉयल कॅनडियन माऊंटेड पोलिसांना अजूनही निज्जर यांच्या हत्याऱ्याला पकडता आलेले नाही. तसेच भारताचा प्रत्यक्ष संबंध असलेले पुरावेही गोळा करता आलेले नाहीत. भारत सरकारचा हात असल्याचा आरोप करताना पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी फाय आयच्या गुप्तचर माहितीनुसार आपल्याला माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता.

फाय आय तथा पंचचक्षू अर्थात अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या इंग्रजी मातृभाषा असलेल्या पाच देशांचा समुह असून त्यांच्या 20 गुप्तचर यंत्रणा जगभरातील गुप्त माहिती एकमेकांना पुरवतात.

या पाच देशांच्या समूहातील एक असलेल्या न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विन्स्टन पिटर यांनी आरोप केल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनंतरही सबळ पुरावे देता येत नसल्याने भारत विरोधातील आरोपात काही तथ्यच नसल्याचे त्यांनी दिल्लीत पत्रकारांसमोर बोलताना स्पष्ट केले. यावेळी बोलताना आपण नव्यानेच उपपंतप्रधान पदाचा ताबा घेतल्याने या प्रकरणात आपल्याला विशेष माहिती नसून मागील सरकारच्या काळात हा मुद्दा हाताळल्याने आपण त्यावर सरकारतर्फे बाजू मांडू शकत नसल्याचे सांगितले.

मात्र एक सक्रिय वकील या नात्याने पुराव्या अभावी कोणताही आरोप टिकू शकत नसल्याचे त्याचवेळी स्पष्ट केले. पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणेकडून बरीच माहिती प्राप्त होत असते, अर्थात त्याला सबळ पुरावा मिळाल्यानंतरच ती वैधानिक व विश्वसनीय माहिती ठरते, यावर त्यांनी भर दिला. कॅनडाचे पोलीस आजपर्यंत सबळ पुरावे मिळवू शकत नसल्याने पंतप्रधान जस्टीन यांची नाचक्की होत आहे.

पंचचक्षू गटातील एका सदस्याने कॅनडाचे वाभाडे काढल्याने कॅनडा सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारत सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने भारत विरोधात प्रतिक्रिया दिली होती. त्याला प्रत्यूत्तर म्हणून भारतीय विदेश मंत्रालयाने

कॅनडाप्रमाणेच अमेरिकेपाशी सबळ पुराव्यांची मागणी केल्यानंतर अमेरिकेने कॅनडाशी संपर्क साधला असता फाय आय तथा पंचचक्षूच्या माहितीच्या आधारे आपण गौप्यस्फोट केल्याचा खुलासा कॅनडियन पंतप्रधान कार्यालयाकडून केला असता अमेरिकेने या प्रकरणातून अंग काढून घेतले.

दुसऱ्या बाजूने ब्रिटिश सरकारने तेथील खलिस्तानी समर्थक संघटनांची 100 कोटी रुपयांची खाती गोठविली. भारताच्या फुटीरतावादी शक्तीच्या विरोधात भारत सरकारने कडक धोरण स्वीकारल्याने अमेरिका, ब्रिटनसहीत अनेक देशांनी खलिस्तानी चळवळीला बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे.

कॅनडातील खलिस्तानी समर्थकांचे प्रचंड दबावतंत्र सुरु असून त्याचाच परिपाक म्हणून पंतप्रधान जस्टीन यांनी दहशतवादी निज्जरच्या हत्येचे खापर भारत सरकारच्या गुप्तचर यंत्रणेच्या एजंटवर फोडले होते. आरोप केल्यानंतर तसे पुरावे सादर करण्याची मागणी कॅनडा सरकारकडे केली असता, तेथील पोलिसांना ते मिळविणे कठिण बनल्याने कॅनडाची इज्जत वेशीवर टांगली गेली. त्यात पंचचक्षू गटातील न्यूझीलंडच्या उपपंतप्रधानांनी बाप दाखव नाहीतर श्राद्ध वाढ, अशी भूमिका घेतल्याने कॅनडाची स्थिती आंतरराष्ट्रीय मंचावर केविलवाणी झालेली आहे.

- प्रशांत कामत

Advertisement
Tags :

.