For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईश्वरी अस्तित्वामुळे प्रत्येक गोष्ट उठून दिसत असते

06:25 AM Jan 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
ईश्वरी अस्तित्वामुळे प्रत्येक गोष्ट उठून दिसत असते
Advertisement

अध्याय सहावा

Advertisement

बाप्पा म्हणाले, आपल्याला ईश्वरीतत्व समजावे असे वाटणाऱ्या लाख साधकापैकी एखाद्यालाच ईश्वरी तत्व समजते. असं घडायचं कारण म्हणजे जरी साधक निरपेक्षतेने वाट्याला आलेले कर्म करत असला तरी ते आपल्या हातून अधिक व्हावं, जलद व्हावं अशा इच्छेने तो काही वेगळे प्रयत्न करू पाहतो. ह्यात त्याचा हेतू चांगला असला तरी ईश्वराला शरण गेल्यावर झालेल्या दैवी प्रेरणेच्या पलीकडे त्याने काही करावयाचे नाही ह्याचा त्याला विसर पडतो. त्यामुळे त्याच्या हातून अकर्म घडू लागते. दुसरे कारण म्हणजे स्वधर्माचे आचरण करत असताना त्याला अचानक समोर दिसणाऱ्या विषयांचे आकर्षण वाटू लागते. त्यामुळे तो स्वधर्मापासून दूर जाऊन विकर्म म्हणजे करू नये ते कर्म करू लागतो. एखाद्या भाग्यवान साधकाला ईश्वरी तत्व समजलं असण्याची खुण म्हणजे, ज्याला ईश्वरी तत्व समजलंय त्याला जगात सर्वत्र ईश्वरच भरून राहिला आहे असं सतत जाणवत असतं. स्वत:सकट त्याच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती, वस्तू या सर्व ईश्वरस्वरूप आहेत असं तो मानत असतो. त्यामुळे त्याच्या मनात कुणाबद्दल भेदभाव मुळीच नसतो किंवा त्याला कुणाची भीतीही वाटत नाही. थोडक्यात विश्वात ईश्वराशिवाय काहीच नाही अशी त्याची पक्की खात्री झालेली असते. ही स्थिती येण्यासाठी ईश्वराची अनन्य भक्ती करणं हे एकमेव साधन आहे. त्यासाठी सतत त्याची आठवण ठेवणं आवश्यक आहे. आपल्या घरातील लोकांची, प्रिय व्यक्तीची काही ना काही कारणांनी आपल्याला सतत आठवण येत असते. त्या आठवणीत आपण रमत असतो. तसंच ईश्वरही आपल्याला जवळचा वाटला पाहिजे. तो आपल्याच कुटूंबातील एक आहे हा विचार मनात रुजवून ईश्वराच्या अवतारातील प्रसंग आठवत रहावेत, त्यात रमावं म्हणजे ईश्वर आपल्याबरोबर आहे याची खात्री वाटत राहते.

आता पुढील श्लोकातून, ईश्वरी अस्तित्व कुठं आणि कसं जाणवतं ते बाप्पा सांगत आहेत.

Advertisement

क्षितौ सुगन्धरूपेण तेजोरूपेण चाग्निषु ।

प्रभारूपेण पूष्ण्यब्जे रसरूपेण चाप्सु च ।। 9।।

धीतपोबलिनां चाहं धीस्तपोबलमेव च ।

त्रिविधेषु विकारेषु मदुत्पन्नेष्वहं स्थितऽ ।। 10।।त

अर्थ- पृथ्वीमध्ये सुगंधरूपाने, अग्नीमध्ये तेजरूपाने, सूर्यामध्ये प्रभारूपाने, उदक व चंद्र यांचेमध्ये रसरूपाने, बुद्धिवानांमधील बुद्धि, तपस्व्यांमधील तप, बलवानांमधील बल, अशा तऱ्हेने माझ्यापासून उत्पन्न झालेल्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही विकारांचे ठिकाणी मी स्थित आहे.

विवरण- दोन्ही श्लोक वाचले की लक्षात येतं की, प्रत्येक गोष्टीत जे जे म्हणून वैशिष्ट्या असतं तिथं ईश्वरी अस्तित्व उपस्थित असतं. ईश्वरी अस्तित्वामुळे प्रत्येक गोष्टीला एक झळाळी प्राप्त होते. त्या वस्तूकडे बघितलं की, माणसाच्या तोंडून लगेच कौतुकाचे उद्गार निघतात कारण त्या त्या वस्तुतील वैशिष्ट्या ईश्वरी तत्वापासून तयार झालेलं असतं. पृथ्वीतला जो पवित्र गंध आहे तो ईश्वरी अंश आहे, अग्नितील तेज, सर्व प्राणीमात्रात जीवनशक्ती, तपस्वी लोकांचे तप सामर्थ्य हे गुण ईश्वरी अंशाचे निदर्शक आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांची गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द ही वैशिष्ट्यो आहेत. ही सर्व वैशिष्ट्यो त्या त्या महाभूतातील ईश्वरी अस्तित्व दर्शवतात. प्रत्यक्षात ईश्वरी अस्तित्व नजरेला पडत नसतं पण वरील वैशिष्ट्यांमुळे पंचमहाभूतांपासून तयार झालेला प्रत्येक पदार्थ गंध, रस रूप, स्पर्श आणि शब्द यापैकी कोणतं ना कोणतं किमान एकतरी वैशिष्ट्या बाळगून असतो. तसंच प्राणिमात्रांमध्ये जे गुण असतात तेही त्यांच्यामध्ये असलेल्या ईश्वरी अंशामुळेच असतात. बुद्धिमान, तपस्वी, बलवान यांच्यामधील बुद्धी, तप व बल ह्या ईश्वरी अस्तित्वाच्याच खुणा आहेत.

क्रमश:

Advertisement
Tags :

.