सर्व ब्रह्मव्याप्तच आहे
भगवंत म्हणाले, ज्याचा नाश होत नाही त्याला ब्रह्म म्हणतात. ते अध्यात्माच्या माध्यमातून प्रत्ययाला येते. ब्रह्मापासून भूतमात्रादी चराचर पदार्थांची उत्पत्ती करणारा सृष्टिव्यापार चालतो त्याला कर्म म्हणतात. विश्वातील सर्व सजीव व निर्जीव वस्तूना अधिभूत म्हणतात. अधिदैव म्हणजे त्या वस्तूतील आत्मा होय, त्याला जीव असे म्हणतात. हा देह हेच माझे अस्तित्व आहे ह्या गैरसमजुतीतून तो सुखदु:खाचे भोग भोगतो.
सध्या अभ्यासत असलेल्या
अधि-भूत विनाशी जे जीवत्व अधि-दैवत । अधि-यज्ञ असे मी चि ह्या देही यज्ञ-पूत जो ।। 4 ।।
ह्या श्लोकाचे विवरण करताना माउलींनी भगवंतांचे मनोगत व्यक्त केले. भगवंतांनी सांगितले की, खरं म्हणजे पंचमहाभूतांच्या सहाय्याने निर्माण झालेली शरीरे (अधिभूते) आणि त्यांना चालवणारा जीवात्मा (आधिदैव) हेही मीच होय पण त्यावेळी मी शुद्ध स्वरुपात नसतो. ज्याप्रमाणे अस्सल सोन्याचे दागिने करताना त्याला हवा तसा आकार देण्यासाठी ते थोडेसे कठीण व्हावे म्हणून त्यात तांबे मिसळतात त्यामुळे त्याचा कस अस्सल सोन्यापेक्षा कमी असतो. तांबे मिसळलेल्या सोन्याला हिणकस असे म्हणतात. खरं तर हिणकस सोन्यात जरी तांबे मिसळलेले असले तरी त्यातील अस्सल सोने त्या तांब्याबरोबर एकरूप होत नाही तरीही त्याला हिणकस म्हंटले जाते. त्याप्रमाणे जोपर्यंत अधिभूत, आधिदैव म्हणजे देह आणि आत्मा अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत तोपर्यंत ते माझ्यापेक्षा वेगळे आहेत असे समजले जाते. अर्थात ही केवळ समजूत आहे कारण अविद्या नष्ट झाली की, द्वैतभाव संपल्याने ब्रह्म, विश्वातील वस्तू, त्यातील जीव एकमेकात मिसळून एकरूप होतात असे म्हणावे तर ते मुळात वेगवेगळे नसून वेगळे आहेत असे वाटत असते. सर्वच ब्रह्मव्याप्त असल्याने ते त्यापेक्षा वेगळे होऊच शकत नाहीत. उदाहरणार्थ एक केसांचा गुंडाळा आहे व त्यावर स्फटिकाची शिळा ठेवली तर वरून डोळ्याने पाहिली असता तिला तडे गेले असल्यासारखे दिसते पण केस त्या स्फटिक-शिळेपासून बाजूला काढले, तर ती एकसंध दिसते. मग तिला गेलेले तडे खरे असतात का? तर नाही, ती मुळात अखंडच होती परंतु केसांच्या संगतीने फुटलेली वाटत होती. ते केस दूर केल्यावर पुन्हा ती मूळची अखंड होती तशीच आहे. त्याप्रमाणे अहंकार गेला तर मुळात असलेले ऐक्य लक्षात येते. मी अधियज्ञ तो अहंकार घालवण्याचे काम करतो. ह्या अधियज्ञाबद्दल सविस्तर सांगताना माउली म्हणतात, जीवाला तू म्हणजे हे शरीर नव्हेस ह्याची जाणीव करून देण्यासाठी भगवंतांनी चौथ्या अध्यायात निरनिराळ्या यज्ञांची माहिती देत सांगितलं, ज्याप्रमाणे यज्ञामध्ये आहुती देऊन यज्ञ पूर्ण करतात त्याप्रमाणे जीवनाच्या यज्ञात मनाला भुरळ पडून निरनिराळ्या विषयांचा उपभोग घ्यायला भाग पाडणाऱ्या ज्ञानेंद्रियांचा अग्नी म्हणून उपयोग करावा.