सर्वकाही क्षेम आहे!
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे उद्गार
पणजी : प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक हे दिल्ली दौऱ्यावरून गोव्यात परतले आहेत. सर्वकाही क्षेम आहे, असे ते म्हणाले. राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. सर्वकाही सुरळीत चालेल. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही ते म्हणाले. मंगळवारी नवी दिल्लीला गेलेल्या प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नाईक यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि गोव्यातील एकंदरीत परिस्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा केली, याबाबत विचारले असता नाईक त्याबाबतचा कोणताही तपशील देण्यास नकार दिला. आपण पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री बी. एल. संतोष यांचीही भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केल्याचे ते म्हणाले. भाजपच्या अन्य अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी देखील विविध विषयांवर चर्चा केल्याचे ते म्हणाले. आपण अध्यक्षपदी आल्यानंतर आतापर्यंत जी काही कामे केली त्याबाबतचा अहवालही पक्षश्रेष्ठींना सादर केला. पंतप्रधानांनी आपले कौतुक केले, असे ते म्हणाले. आपला दिल्ली दौरा आटोपून गोव्यात परतल्यानंतर दैनिक तऊण भारतशी बोलताना दामू नाईक यांनी दिल्ली दौरा यशस्वी झाल्याचे सांगितले. गोव्यात परतल्यानंतर दामू नाईक कळंगटकडे रवाना झाले. तेथे त्यांनी महिला मेळाव्याला संबोधित केले.