सब कुछ बुमराह !
क्रिकेट आपली कुस कधी बदलेल हे सांगता येत नाही. विशेषत: भारतीय संघाबाबत. काही दिवसांपूर्वी भारतीय संघ किवीविऊद्ध सर्व काही गमावून बसला होता. महाभारतात पांडव जसे कौरवाविऊद्ध द्युतात सर्वस्व गमावून बसले होते अगदी तसे. काल-परवा न्यूझीलंडने दिलेला व्हाईटवॉश माझ्या फार जिव्हारी लागला होता. परंतु सर्व काही गमावल्यानंतर सुद्धा ऑस्ट्रेलियातील ड्रॉप इन पिचवरील कामगिरी निश्चितच कौतुकास्पद!
हा सामना सुरू होण्यापूर्वी गजाभाऊंनी मला गुगली टाकली होती. त्यांनी मला विचारलं, कुठल्या देशाविऊद्ध कसोटी क्रिकेट बघणं आवडतं? मी क्षणाचाही विलंब न करता लगेच उत्तर दिलं की प्रथम ऑस्ट्रेलिया नंतर पाकिस्तान. भारत विऊद्ध पाकिस्तानमध्ये आपल्या भावना गुंतलेल्या असतात. परंतु ऑस्ट्रेलियाविऊद्ध तसं नाहीये. त्यांच्याविऊद्धची टशन काही वेगळीच असते. त्यातच त्यांच्या गोलंदाजांना फलंदाज जायबंदी होणं कधीही आवडतं. त्यातच परदेशी खेळाडू आल्यानंतर बाऊन्सरवर चेंडूमार्फत मार देणे हे नित्याचे झाले आहे. त्यांचं स्लेजिंग, वर्तमानपत्रातून टिकाटिप्पणी या सर्व गोष्टी आपसूकच आल्यात. त्यातच त्यांचे रडीचे डाव प्रसिद्ध आहेतच. आठवते ना, बऱ्याच वर्षांपूर्वी तीन चॅपेल बंधूपैकी एकाने टाकलेला तो अंडरआर्म चेंडू. माझ्या मते क्रिकेट विश्वातील तो खरा काळा दिवस होता. असो. टी-20 च्या अभूतपूर्व यशानंतर न्यूझीलंडने भारतीय संघाला आपल्याच भूमीत गदागदा हलवलं होतं. नव्हे, अब्रूची लक्तरेच वेशीवर टांगली होती. परंतु या अपयशानंतर पहिल्या कसोटीत पहिल्या डावात कच खाल्ल्यानंतर, बुमराह, विराट वगळता टी-20 स्पेशालिस्ट फलंदाजांच्या जीवावर भारतीय संघाने मिळवलेला विजय हा निश्चितच अवर्णनीय.
सामना सुरू होण्याअगोदर आणि टॉस जिंकल्यानंतर धाडसीपणा काय असतो ते तुम्ही बुमराहला विचारा. सामना सुरू होण्याअगोदर अश्विन आणि रवींद्र जडेजा चक्क प्लेईंग इलेव्हनमध्ये नव्हते. ही दोन्ही मंडळी, ना आजारी होती ना दुखापतग्रस्त. अशी गोष्ट करणे म्हणजे दिग्गज उमेदवाराला एखाद्या मतदारसंघात विधानसभेमध्ये एबी फॉर्म न देण्यासारखंच होतं. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियासारख्या देशात ढगाळ वातावरण असून सुद्धा प्रथम फलंदाजी स्वीकारणं हे एक प्रकारे धाडसच होतं. त्यातच रोहित शर्मा कौटुंबिक कारणामुळे पहिल्या कसोटीला मुकला होता. या सर्व गोष्टी अंगावर घेऊन जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटीत मिळवलेला विजय हा चार चाँद लावणारा होता. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये मागील दहा वर्षात भारतीय संघाने बराच दबदबा निर्माण केला आहे. आणि हा दबदबा जसप्रीत बुमराहने निरंतर कायम ठेवला, तोही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय बुमराहच्या अंगाशी येणार असं वाटत असताना बुमराहचा पहिल्या डावातील भेदक मारा कमालीचा यशस्वी ठरला. दुसऱ्या डावात त्याचीच री त्याने ओढली. दुसऱ्या डावात मात्र खेळपट्टी ऑस्ट्रेलियासाठी सावत्र आईसारखी वागली. पहिल्या डावातील चूक यशस्वी जयस्वालने दुसऱ्या डावात केली नाही हे विशेष. खेळपट्टीवर नांगर टाकणे हा कसोटीतील वाक्प्रचार हा कधीच बेदखल झालाय. परंतु कसोटीत पाय रोवून एकेरी दुहेरी धावा घेत सोबत चौकार षटकारांची आतषबाजी कशी करावी, हे जयस्वालने काल-परवा दाखवून दिले. तेही कांगाऊंकडे असणाऱ्या दिग्गज गोलंदाजांसमोर. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रे आणि त्यांची प्रसारमाध्यमे त्यांच्या भूमीत विराट कोहलीचा धसका घेतात. कांगारूत माझा दबदबा का आहे, हे विराटने पुन्हा एकदा दाखवून दिलं. भारतीय संघ फिरकीसमोर अतिशय उत्तम खेळतो हा जो माझा भ्रम होता, त्या भ्रमाला मागच्या महिन्यात तडा गेला होता. परंतु ऑस्ट्रेलियात तसं काही घडलं नाही. सध्याच्या घडीला सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या नाथन लायनविऊद्ध भारतीय फलंदाजांनी केलेली कामगिरी निश्चितच कांकणभर सरस होती.
न्यूझीलंडविऊद्ध सपाटून मार खाल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियात जाऊन पहिल्याच कसोटीत भारतीय संघाची कामगिरी निश्चितच दृष्ट लागण्यासारखी. ऑस्ट्रेलियाविऊद्ध अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मिळवलेला तो विजय, हनुमा विहारीने वाचवलेला तो सामना आणि आता बुमराहच्या नेतृत्वाखाली मिळवलेला सनसनाटी विजय या सर्व गोष्टी दीर्घकालीन आनंद देणाऱ्या आहेत एवढं मात्र निश्चित. आज माझा वाढदिवस त्यातच भारतीय संघाने माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मिळवलेला विजय ही माझ्यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्लेषकाला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचकासाठी निश्चितच पर्वणी! सुख म्हणजे नक्की काय असतं, याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर आलं. पुन्हा एकदा भारतीय संघाचा अभिनंदन !
-विजय बागायतकर