For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वांच्या दोऱ्या क्षेत्रज्ञाच्या हातात असतात

06:11 AM May 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
सर्वांच्या दोऱ्या क्षेत्रज्ञाच्या हातात असतात
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

यदनादीन्द्रियैर्हीनं गुणभुग्गुणवर्जितम् । अव्यत्तं सदसद्भिन्नमिन्द्रियार्थावभासकम्  ।।27 ।। विश्वभृच्चाखिलव्यापि त्वेकं नानेव भासते । बाह्याभ्यन्तरतऽ पूर्णमसंगं तमसऽ परम् ।।28।। दुर्ज्ञेयं चातिसूक्ष्मत्वाद्दीप्तानामपि भासकम् । ज्ञेयमेतादृशं विद्धि ज्ञानगम्यं पुरातनम् ।। 29 ।। हे श्लोक आपण अभ्यासत आहोत.

आपला देह हे जर क्षेत्र समजले तर ते चालवणारा क्षेत्रज्ञ आत्म्याच्या रुपात आपल्या शरीरात वास करून असतो. तसेच ब्रह्मांडाचा पसारा हे क्षेत्र असून तो चालवणाऱ्या परमेश्वराला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. आत्मा आणि परमेश्वर हे दोन्हीही क्षेत्रज्ञ असल्याने उभयतांची वैशिष्ट्यो एकच आहेत. वरील श्लोकातून आपण क्षेत्रज्ञाची वैशिष्ट्यो समजून घेत आहोत. तो अनादि आणि इंद्रियरहित असतो हे आपण समजून घेतले. क्षेत्रज्ञ गुणरहीत असतो. तो गुणांच्या पलीकडे असल्याने गुणांशी त्याचा संबंध नसतो पण मानवी स्वभावातील गुणांचा तो उपभोग घेत असतो. क्षेत्रज्ञ अव्यक्त असतो म्हणजे तो डोळ्यांना दिसत नाही पण त्याच्या कार्याची जाणीव तो करून देत असतो. क्षेत्रज्ञाचे पुढील वैशिष्ट्या म्हणजे तो सत म्हणजे नजरेला दिसणाऱ्या वस्तूंचा निर्माता आहे तसेच असत म्हणजे नजरेला न दिसणाऱ्या वस्तूंचाही निर्माता आहे. तरीही तो त्याहून भिन्न म्हणजे वेगळा आहे.

Advertisement

क्षेत्राला म्हणजे समस्त देहधारी जीवांना जाणणारा क्षेत्रज्ञ व्यक्त स्वरूपात नसल्याने तो हात, पाय, कान, नाक, डोळे आदि इंद्रिये नसलेला असला तरी सर्वांना जाणून घेण्याची विलक्षण क्षमता त्याच्याठायी असते म्हणून त्याला भक्ताची हाक ऐकू जाते. तो निरंतर सर्वांना पहात असतो. जीभ नसली तरी भक्ताने दाखवलेल्या नैवेद्य चाखून पाहतो. वाणी नसली तरी भक्ताचे गुणवर्णन करताना मागे हटत नाही. पायरहीत असूनही भक्ताची हाक ऐकताच धावत येतो. ह्यालाच इंद्रियरहीत असलेल्या क्षेत्रज्ञाचे इंद्रियांना प्रकाशित करणे असे म्हणतात.

क्षेत्रज्ञ हा सर्वव्यापक आहे. ज्याप्रमाणे बालकाच्या लीला पाहून आईवडील प्रसन्न होतात. त्याप्रमाणे क्षेत्रज्ञही भक्ताच्या भक्तीला भुलून त्याच्यावर प्रसन्न होतो. पुढे बाप्पा सांगतात की, क्षेत्रज्ञ हा विश्वव्यापक असून विश्वचालकही आहे. तो एकच असून अनेक रूपात प्रकट होत असतो. समजा एखादा मोठा कारखाना आहे त्यामध्ये ज्या वस्तूची निर्मिती होते त्या संपूर्ण व्यवस्थेवर त्या कारखान्याच्या व्यवस्थापनाचे संपूर्ण नियंत्रण असते. कुणाला कामावर घ्यायचं, कुणाला काढून टाकायचं, कुणी कुठलं काम करायचं, कुणाला कुठलं काम द्यायचं, रोज किती वस्तू तयार करायच्या, त्या कुठे साठवायच्या, त्यांची विक्री कशी करायची आणि नफ्याचं प्रमाण किती ठेवायचं हे सगळं त्या कारखान्याचे व्यवस्थापन ठरवत असतं.

थोडक्यात संपूर्ण कारखान्यावर व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीची छाप पडलेली असते. तिथे अनेक कामगार काम करत असले तरी ते व्यवस्थापनाच्या निर्देशाप्रमाणे काम करत असतात. त्यांनी कोणत्याही प्रकारे स्वत:चं डोकं चालवायचं नसतं. व्यवस्थापनाची ध्येयधोरणे यशस्वीपणे राबवण्यातच त्यांचं हित असतं.

जे कामगार ही बाब लक्षात घेऊन काम करत राहतात त्यांची व्यवस्थापनाकडून कदर केली जाते व स्वत:चं डोकं वापरून व्यवस्थापनाच्या ध्येयधोरणाविरुद्ध काम करतात त्यांना शिक्षा भोगावी लागते. कारखाना सुव्यवस्थित चालण्यासाठी व्यवस्थापकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्याप्रमाणे संपूर्ण विश्वाची निर्मिती क्षेत्रज्ञ करतो. त्याचं पालनपोषण करतो आणि शेवटी संहारही करतो. सर्वांच्या दोऱ्या त्याच्या हातात असतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.