For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत जगात सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे

10:11 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत जगात सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे
Advertisement

डॉ. उदय निरगुडकर यांचे प्रतिपादन : भारत हा सोलार एनर्जी देश म्हणून ओळखला जाईल

Advertisement

बेळगाव : टाटासारखी खासगी कंपनी आकाशात सॅटलाईट सोडते, यावरून देशामध्ये किती बदल झाला आहे, हे दिसून येत आहे. 17 व्या शतकात भारताचा जगाच्या बाजारपेठेत 25 टक्के सहभाग होता. तोच 1947 साली 4.5 टक्के झाला. कारण इंग्रजांनी भारतातील पैसा आणि संपत्ती संपूर्णपणे लुटली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 30 ते 35 वर्षे ही पूर्ण वाया गेली. मात्र, आता देश बदलत आहे. त्याला प्रत्येकाने हातभार लावणे गरजेचे आहे. यासाठी अस्सल भारतीय वस्तू किंवा तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणे महत्त्वाचे आहे. 2047 सालापर्यंत आपला देश जगात सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान  देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. लोकमान्य ग्रंथालय, वरेरकर नाट्या संघ, वाङ्मय चर्चा मंडळ आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिर येथे व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी ते ‘भारत @ 2047’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी अविनाश पोतदार होते. ते म्हणाले, अवकाशात एकूण 2 हजार 500 उपग्रह आहेत. त्यामध्ये 125 भारतीयांनी बनविलेले उपग्रह आहेत. नासाच्या तोडीस तोड इस्रो आज काम करत आहे. तंत्रज्ञानामध्ये मोठे बदल घडत आहेत. सध्या सुरू असलेल्या युद्धाचेदेखील थेट प्रक्षेपण केले जाते. यावरून तंत्रज्ञानामध्ये किती बदल झाला आहे, हे समजून येत आहे. तंत्रज्ञानामुळे काही जणांचे रोजगार गेले तरी काही जणांना नव्याने रोजगार उपलब्ध झाले आहेत. आता सोलार एनर्जीकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. देशामध्ये यासाठी अनुदान दिले जात आहे. त्यामुळे पर्यावरण दूषित न करता सोलारचा वापर अधिक होणार आहे. 2047 मध्ये भारत हा सोलार एनर्जी देश म्हणून ओळखला जाईल, असेही त्यांनी सांगितले. आता तुम्हाला जी वीज दिली जात आहे ती आणखी 10 वर्षांनंतर 50 टक्के तुम्हालाच उत्पादित करावी लागणार आहे. यासाठी सरकार योजना आखत आहे, असेही ते म्हणाले.

लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो पाया रचला त्यातूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले. लोकमान्य  टिळकांनी तरुणांना इंग्रजांच्या सैन्यामध्ये सामील होण्याचा सल्ला दिला. कारण त्यांचीच शस्त्रs एक दिवस त्यांच्यावरच चालविणे गरजेचे होते. त्यानंतर काही वर्षांतरच नाविक दलाने बंड पुकारले आणि तेथूनच स्वातंत्र्य लढ्याला खरी सुरुवात झाली, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  सध्या भारताची आर्थिक परिस्थिती मजबूत होत आहे. आज महिलाही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मंगळयान तसेच चांद्रयान सोडण्याच्या मोहिमेमध्ये 70 टक्के महिलांचाच सहभाग आहे. त्यामुळे देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. ज्ञानेश्वरांनी 12 व्या शतकामध्येच पसायदान संपूर्ण जगाला दिले. त्या पसायदानावरच आज संपूर्ण जग वाटचाल करत आहे. त्यामुळे सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देवून वाटचाल केली पाहिजे. कोरोना काळात संपूर्ण जगाला भारताने लस दिली. महत्त्वाचे म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीला मोफत लस दिली आहे. हे जे कार्य आहे ते वाखाणण्याजोगे आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर एका शेतकऱ्याच्या मुलाने ‘आमचा नाद नाही करायचा’ असा फलकावर उल्लेख केला होता. तो किस्सा सांगून आपला तरुण असे आज लिहीत आहे, त्यावरून भारत बदलत आहे, हे स्पष्ट दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी जगदीश कुंटे यांनी प्रास्ताविक केले. अनंत लाड यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला. अनिल पाटणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुनीता पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. स्वरुपा इनामदार यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.