हायकमांडने घेतलेला निर्णय सर्वांना मानावा लागणार
भाजपाध्यक्षांच्या भेटीनंतर आमदार भालचंद्र जारकीहोळींचे प्रतिपादन
बेळगाव : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बदलासंबंधी पक्षाच्या हायकमांडकडून जो निर्णय होणार आहे, तो सर्वांनाच मान्य करावा लागणार आहे, असे आरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना पक्षाचे हित व संघटन या पार्श्वभूमीवर हायकमांडने कोणताही निर्णय घेतला तरी हा निर्णय मान्य करावा लागणार आहे. वैयक्तिक अभिप्राय, मतभेद बाजूला सारून पक्षाच्या विकासासाठी काम करावे लागणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या कर्नाटक दौऱ्यामुळे नेते-कार्यकर्त्यांत नवा उत्साह संचारला असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस सरकारने तीन वर्षे पूर्ण केल्याबद्दल या काळात त्यांनी काय केले आहे हे जनतेला चांगलेच माहिती आहे. निवडणुकीत लोकच त्यांना उत्तर देतील, असेही भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले.
मतभेद विसरून एकत्रपणे काम करा
अध्यक्ष वयाने लहान असले तरी त्यांनी केलेले एक तासाचे भाषण प्रभावी होते. कोणाला कोणता संदेश द्यायला हवा, हे त्यांनी स्पष्टपणे दिले आहे. पक्षाच्या हितासाठी ते उत्तम घडामोडी ठरले आहे. 2028 च्या निवडणुकीत भाजप सत्तेवर आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकीने काम करावे, असा सल्ला राष्ट्रीय अध्यक्षांनी दिला आहे. छोटेमोठे मतभेद विसरून एकत्रपणे काम केल्यास पक्ष आणि कार्यकर्त्यांनाही त्याच लाभ मिळणार आहे. हे सांगतानाच हायकमांडच्या निर्णयाचा प्रत्येकाने आदर करावा, असा सल्ला आमदार रमेश जारकीहोळी यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.