अहिल्याबाई होळकरांचे कार्य सर्वांना समजणे आवश्यक
कॅप्टन मीरा दवे : म्हापसा नववर्ष स्वागत समितीतर्फे सार्वजनिक गुढीपाडवा उत्साहात
म्हापसा : राजमाता तथा लोकमाता समाज सुधारक अहिल्याबाई होळकर यांना पते असो वा प्रजा असो त्यांच्यासाठी सर्व समान होते. आपल्या लहान मुलाला कपड्यात कंबरेला बांधून तलवार हाती घेत त्या राष्ट्रासाठी लढल्या. आम्ही त्यांची सदैव आठवण ठेवायला पाहिजे. समाजाची मातृत्व, नेतृत्व व कतृत्वाची शिकवण अहिल्याबाई होळकर यांनी आम्हाला दिली. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही राष्ट्रासाठी योगदान देणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्याचा इतिहास सर्वांना समजावून सांगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय सेनेच्या अधिकारी कॅप्टन मीरा सिद्धार्थ दवे यांनी म्हापसा येथे केले.
म्हापसा नववर्ष स्वागत समितीतर्फे येथील टॅक्सी स्थानकावर 22 वा गुढीपाडवा उत्सव कॅप्टन दवे यांच्याहस्ते सार्वजनिक गुढी उभारून साजरा केला. यंदाचे 300 वे वर्ष पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरे करीत असून त्यांच्या जीवन व कार्य याविषयी माहिती देताना मीरा दवे बोलत होत्या. व्यासपीठावर नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा हेमश्री गडेकर, सचिव स्मिता गवंडळकर, प्रतिनिधी क्रिमी कोरगावकर, रेश्मा मालवणकर, पुनम बुर्ये, प्रवीणा नार्वेकर, प्रज्ञा परमेकर, रचना शिरोडकर, संगीता सावंत, स्मिती गवंडळकर, दीपा हिरवे, भारती सुभेदार, कनश्री मुंज, अमिता कोरगावकर, साधना बर्वे, स्नेहा कारेकर, दिप्ती नाईक, प्रिती पार्सेकर, दिव्या च्यारी उपस्थित होत्या.
म्हापसा शहरात पारंपरिक वेशभूषा करून पहाटे शोभा यात्रा काढण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात शहर गजबजून गेले. गुढी उभारून व भारत मातेच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून गुढीपाडव्याच्या कार्यक्रमास सुऊवात झाली.आम्ही भारत मातेची पूजा करतो तेव्हा आम्हाला गर्व होतो कारण आम्ही भारतीय आहोत. चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडवा साजरा करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. गुढी विजय पताका आहे जी भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभुती, विकारांचा विजय आहे. आम्ही हा विचार घेऊन नववर्षाचा आरंभ करीत आहोत म्हणून आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला गर्व आहे, असे मीरा दवे म्हणाल्या.
अहिल्याबाइंना राष्ट्रसेवा करताना बऱ्याच कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत त्यांनी राष्ट्राचे प्रतिनिधीत्व उत्तम प्रकारे केले. सुख-दु:ख, जय-पराजय यावर ठाम रहावे लागते ते अहिल्याबाईने करून दाखविले. पती, सासरे, मुलगा यांचा मृत्यू झाला तेव्हा आजूबाजूच्या राजाची नजर त्यांच्या मालवा शहरावर पडली. पण त्यांची शक्ती व हातातील नेतृत्वमुळे त्यांनी महिला सेना तयार करून राष्ट्राच्या रक्षणासाठी युध्द केले. आपण अबला विधवा नारी नसल्याचे अहिल्याबाईंनी दाखवून दिले, असे दवे म्हणाल्या. म्हापशाचे आमदार तथा उपसभापती ज्योशुआ डिसोझा, खासदार सदानंद तानावडे कार्यक्रमास उपस्थित होते. नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा हेमश्री गडेकर यांनी स्वागत केले. लक्ष्मी भरणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रीती केरकर यांनी आभार मानले.
अहिल्याबाईंनी दिला सर्वांना समान न्याय
लोकमाता, पुण्यश्लोक अशा दोन उपमा आहिल्याबाई होळकर यांना देण्यात आल्या आहेत. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावापुढे पूर्णश्लोक लावले आहे कारण त्यांनी तसे काम केले आहे. त्यांनी आपल्या जीवनात राजमाता ते लोकमाता म्हटले आहे कारण त्या न्याय करताना समान न्याय देत होत्या. मग त्यात त्यांचे पती असो वा प्रजा त्यांच्यासाठी सर्व समान होते म्हणून त्यांना लोकमाता म्हटले. आम्ही त्यांच्या सारख्या राष्ट्राच्या सेवेत योगदान देणार, असे मीरा दवे म्हणाल्या.