प्रत्येक माणसात सत्व, रज, तम हे तिन्ही गुण असतात
अध्याय नववा
क्षेत्रज्ञाची वैशिष्ट्यो आपण जाणून घेतली. सर्वगुणसंपन्न क्षेत्रज्ञाने प्रकृती आणि पुरुषाच्या माध्यमातून सृष्टीनिर्मिती केलेली आहे. ह्याबद्दल अधिक माहिती देणारा एतदेव परं ब्रह्म ज्ञेयमात्मा परोऽव्यय । गुणान्प्रकृतिजान्भुत्ते पुरुषऽ प्रकृतेऽ परऽ ।। 30 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार परब्रह्म अनादि आहे त्याप्रमाणे प्रकृती आणि परमात्म्याचा अंश असलेला पुरुष किंवा जीवात्मा हेही अनादि आहेत. प्रकृती सत्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या प्रभावात असते तर पुरुष संपूर्णपणे गुणरहीत असून निर्विकार आहे. प्रकृती जड आणि पुरुष चैतन्यपूर्ण आहे. तो प्रकृतीला व्यापून राहतो आणि प्रकृती त्याची महाशक्ती होय. तिच्या स्वभावाला अनुसरून पुरुष जीवदशेला येतो. म्हणून सर्वसामान्य माणसाचा मी कर्ता आहे असा समज होतो.
ह्याबाबत एक उदाहरण देतो. पाण्यामध्ये सूर्य प्रतिबिंबित झाला आणि ते पाणी हालू लागले, म्हणजे त्यातील सूर्यच हालतोय असे दिसते. प्रत्यक्षात सूर्य हालत नसतो, त्याप्रमाणे पुरुष अकर्ता असतानाही प्रकृतीच्या अहंकार ह्या गुणामुळे तो कर्ता असल्याप्रमाणे दिसतो. स्वप्नात भिकारी झालेला राजा अन्नासाठी भीक मागतो. कारण स्वप्नात त्याला आपण राजा आहोत याची जाणीव नसते. त्याप्रमाणेच जीवालाही आपण कर्ता आहोत असे वाटत असते. त्यावेळी स्वत:चे स्वरूप त्याच्या ध्यानात येत नाही. ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेमध्ये राजा भिकाऱ्याप्रमाणे सर्व कृती करतो, त्याप्रमाणे खरोखर अविद्येमुळे जीव कर्मकर्ता झाला आहे. त्यामुळे त्याला सुखदु:खाचा अनुभव येतो. प्रकृतीच्या त्रिगुणांशी संबंध आल्यामुळे याला उच्च, मध्यम अथवा निकृष्ट गती प्राप्त होऊन याचा शुभ अथवा अशुभ योनीत जन्म होतो. अशा प्रकारे अनेक योनीत जन्म घेऊन झाल्यावर त्याला मनुष्ययोनीत जन्म मिळतो आणि त्याला स्वत:चा उध्दार करून घ्यायची संधी मिळते. त्यासाठी माणसाने सत्व गुणाची वाढ करावी जो सत्वगुणाची वाढ करतो त्याचे ज्ञान वाढते आणि त्याचा स्वभाव क्षमाशील होतो असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
गुणैस्त्रिभिरियं देहे बध्नाति पुरुषं दृढम् ।
यदा प्रकाशऽ शान्तिश्च वृद्धे सत्त्वं तदाधिकम् ।। 31 ।।
अर्थ- प्रकृती म्हणजे माया, तीन गुणांनी पुरुषाला किंवा जीवाला देहाचे ठिकाणी बांधून ठेवते. जेव्हा ज्ञान आणि क्षमा यांची वृद्धि झालेली असते तेव्हा सत्त्वगुण अधिक असतो.
विवरण- प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या नादी लागून जीवात्मा त्रिगुणांचा उपभोग घेत असतो. स्वत:ला कर्ता समजू लागतो. देह म्हणजेच मी असे त्याला वाटू लागते. त्यामुळे स्वत:च्या आत्मस्वरूपाला तो विसरतो. असे सर्व योनीत घडते अपवाद फक्त मनुष्य योनीचा आहे. या योनीत चांगले काय, वाईट काय हे कळण्याइतकी प्रगत बुद्धी ईश्वराने दिलेली असते. त्यामुळे मनुष्य जन्मातच माणसाला स्वत:चा उध्दार करून घेणे शक्य आहे. जो मनुष्य ईश्वरभक्ती करून, स्वत:ला ईश्वराला समर्पित करतो विकारांना ओळखून त्यांच्या स्वाधीन न होता, त्यांना स्वत:च्या ताब्यात ठेवतो तो सत्वगुणी होतो त्याला शांती प्राप्त होते.
प्रत्येक माणसात सत्व, रज, तम हे तिन्ही गुण असतात आणि ते आवश्यकही आहेत परंतु मनुष्यस्वत:ला कर्ता समजतो त्यामुळे धन, परिवार, परिस्थिती या सर्वांवर आपले नियंत्रण असावे असे त्याला वाटू लागते. प्रत्येक गोष्टीतील यशापयशाला तो स्वत:ला जबाबदार धरतो. प्रत्येक गोष्टीत यश मिळालंच पाहिजे या विचारांनी स्वार्थ साधायला जाऊन त्रिगुणांच्या कचाट्यात सापडतो. त्यामुळे तो कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही.
क्रमश: