For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रत्येक गड-किल्ला महाराजांचे प्रेरणास्थान

10:54 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रत्येक गड किल्ला महाराजांचे प्रेरणास्थान
Advertisement

आरएसएसचे अखिल भारतीय प्रमुख अनिल ओक यांचे प्रतिपादन : महाराजांचा 350 वा राज्याभिषेक

Advertisement

बेळगाव : देशामध्ये अनेक राजे-महाराजे होऊन गेले आहेत. प्रत्येक राजा आपल्यापरीने श्रेष्ठ होता. तरीही त्या सर्वांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व राज्याभिषेक दरवर्षी मोठ्या थाटात साजरा केला जातो. यामागे त्यांचे प्रशासन व संघर्ष कारणीभूत आहे. त्यांचा प्रत्येक गड-किल्ला हा प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहव्यवस्थापक प्रमुख अनिल ओक यांनी केले. मराठा मंदिर, सरस्वती वाचनालय आणि जनकल्याण ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गोवावेस, रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय वाल्मिकी सनातन धर्मसभेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालयोगी उमेशनाथजी महाराज (उज्जैन) यांचे सानिध्य लाभले होते. प्रमुख वक्ते म्हणून अनिल ओक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्नाटक उत्तर प्रांत रवींद्र उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हते, ते जागतिक स्तरावरील योद्धे होते. जगामध्ये आजही त्यांच्या युद्धनितीवर अभ्यास केला जातो. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही शिवाजी महाराजांना जागतिक योद्धा म्हणून संबोधले आहे. त्यांच्यासह जागतिक स्तरावरील अनेक इतिहासकारांनी त्यांच्या युद्धकौशल्यांचा व प्रशासनाचा अभ्यास करून जगासमोर इतिहास मांडला आहे. समुद्रात किल्ले बांधून स्वराज्य संरक्षणासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. यामुळेच त्यांना भारतीय नौसेनेचा जनक म्हणून ओळखले जाते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील संघर्षावर महत्त्वपूर्ण माहिती दिली. महाराजांची युद्धनिती, तत्कालिन घटना, प्रसंग सादर केले.

यावेळी वक्ते रवींद्र म्हणाले, आपल्या देशावर परकियांनी अनेकवेळा आक्रमणे करून संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ज्या-ज्या वेळी धर्मावर संकट आले आहे, त्या-त्या वेळी ईश्वर रूपात अशा थोर योद्ध्यांनी संस्कृतीचे, समाजाचे, धर्माचे संरक्षण केले आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण करून देशाची अखंडता राखण्याची दूरदृष्टी शिवाजी महाराजांची होती. एक उत्तम प्रशासक, प्रजेचा काळजीवाहू राजा, सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्रित करून स्वराज्याचे तोरण बांधणारा एकमेवाद्वितीय शिवाजी राजा आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी उज्जैनचे उमेशनाथजी महाराज यांनी बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी निरंतर संघर्ष करून धर्म व राष्ट्र निर्माण करण्याचे कार्य केले आहे. त्यांचे योगदान अतुलनीय आहे. सध्याच्या आधुनिक युगात तरुण पिढी या घटनांपासून दूर होत चालली आहे. सनातन धर्म ही भारताची परंपरा आहे. मात्र, सध्याची पिढी पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जात आहे. सनातन धर्म टिकविण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीपासून दूर राहिले पाहिजे. आपली संस्कृती, धर्म टिकविण्यासाठी सर्वांनी सनातनचा अवलंब केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष अरविंदराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्यासह महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.