For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची घटना प्रत्येक नागरिकाने समजून घ्यावी

11:49 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताची घटना प्रत्येक नागरिकाने समजून घ्यावी
Advertisement

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे काणकोणातील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात उद्गार

Advertisement

काणकोण : 75 वा भारतीय प्रजासत्ताकदिन साजरा करत असताना आपल्या देशाने विकासाच्या क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी घेतलेली असून संविधानाची खरीखुरी माहिती प्रत्येक नागरिकाने समजून घ्यायला हवी. गोवा मुक्तीनंतर सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने या ठिकाणी अनेक विकासाच्या योजना आखल्या. त्यांचे कौतुक करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याची साधनसुविधा, उद्योग, कृषी, शिक्षण या क्षेत्रांत भरीव कामगिरी झालेली आहे. अर्थव्यवस्थेला उंचावतानाच गोव्यातील गरिबीचा स्तर हळूहळू कमी व्हायला लागला आहे, असे प्रतिपादन वीजमंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांनी केले.

काणकोणच्या प्रशासकीय इमारतीजवळ आयोजित प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात ध्वजारोहण केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून ढवळीकर बोलत होते. यावेळी त्यांचे उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर, पोलीस अधीक्षक टिकमसिंह शर्मा, काणकोणचे मामलेदार मनोज कोरगावकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी स्वागत केले, तर पोलीस उपनिरीक्षक स्वराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दिलेली मानवंदना त्यांनी स्वीकारली. ढवळीकर यांनी आपल्या भाषणात काणकोणची वीज समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असून लवकरच गुळे ते बाळ्ळीपर्यंतच्या चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या देखील 100 टक्के दूर होणार आहे. यंदा अयोध्येत जो श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तो शुभशकुन असून 2024 साली या ठिकाणी खूपच चांगल्या गोष्टी घडणार आहेत, असे ते म्हणाले.

Advertisement

यावेळी काणकोणचे जवाहर नवोदय विद्यालय, श्री कात्यायणी बाणेश्वर विद्यालय, सेंट तेरेझा विद्यालय, श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. तर मोखर्ड येथील लोकविश्वास प्रतिष्ठानची दिव्यांग मुलांची शाळा,  श्रीस्थळ अंगणवाडी, जवाहर नवोदय विद्यालय, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, काणकोणचे बालभवन आणि श्री बलराम निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्फूर्तिगीते, समृह नृत्ये सादर केली. व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी नार्वेकर, अधीक्षक शर्मा, मामलेदार कोरगावकर, काणकोणचे गटविकास अधिकारी सावियो कार्वाल्हो, विभागीय कृषी अधिकारी नागेश कोमरपंत, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत गावकर, नगरसेविका सारा देसाई, अमिता पागी, नारसिस्को फर्नांडिस, गंधेश मडगावकर, लक्ष्मण पागी आणि अन्य उपस्थित होते. सूत्रसंचालन शिरीष पै यांनी केले. काणकोण पालिकेजवळ नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी अश्विनी भगत, ज्येष्ठ नागरिक, माजी नगरसेवक उपस्थित होते. चार रस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यायलाजवळ संस्थेचे अध्यक्ष शांबा देसाई यांनी ध्वजारोहण केले. यावेळी कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षक उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

श्रद्धानंद विद्यालय

पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयातील प्रजासत्ताकदिन समारंभाला विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा वेर्णा येथील आग्नेल पॉलिटेक्निकचे प्रपाठक रामनाथ प्रभू बाम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय खेळांत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सीता गोसावी आणि प्रज्ञा गोसावी यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी कवायती, नृत्ये त्याचप्रमाणे दोरीवरील मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. मुख्याध्यापिका सीमा प्रभुगावकर यांनी स्वागत केले. प्रमोद कामत यांचेही यावेळी भाषण झाले. तन्वी नाईक यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रेमानंद पागी यांनी आभार मानले. प्रजासत्ताक दिनानिमित्त तालुक्यातील सर्व पंचायतींच्या खास ग्रामसभा घेण्यात आल्या.

Advertisement
Tags :

.