प्रत्येक अग्निवीराला पेन्शनची नोकरी देऊ
प्रचारसभेत अमित शाह यांचे आश्वासन : काँग्रेसवर साधला निशाणा
वृत्तसंस्था/ रेवाडी
हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीवरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार वाक्युद्ध सुरु आहे. एकीकडे काँग्रेस आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजपची कोंडी करू पाहत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी रेवाडी येथे प्रचारसभा घेत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेस पक्ष मतपेढीच्या आमिषापोटी तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. काँग्रेसच्या काळात हरियाणात हथिनीपासून थानसेरपर्यंत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राहुल गांधी हे अमेरिकेत जाऊन आरक्षण हटविणार असल्याचे बोलत आहेत. तर दुसरीकडे भाजपने आरक्षणातील क्रीमी लेयरला वाढविले असल्याचा दावा शाह यांनी केला.
प्रत्येक अग्निवीराला पेन्शन असलेली नोकरी दिली जाणार आहे. काँग्रेस पक्ष सैन्याचा सन्मान करत नाही. काँग्रेसने सैन्यप्रमुखाला गुंड संबोधिले होते. हरियाणात काँग्रेस सरकार असताना कट, कशिमन आणि करप्शनचाच बोलबाला होता. डीलर, दलाल आणि जावयांचा शब्द अंतिम ठरत होता. तर भाजप सरकारमध्ये डीलर अन् दलाल संपविण्यात आले तर जावयाची लुडबूड होण्याचा प्रश्नच नव्हता असे म्हणत शाह यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
राहुल गांधी यांना कुठल्यातरी एनजीओने एमएसपीबद्दल बोलत राहिल्यास मते मिळतील असे सांगितले आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांना खरीप अन् रबी पिके कोणती हेच माहित नाही. काँग्रेसने एमएसपीच्या नावावर शेतकऱ्यांशी खोटं बोलणे बंद करावे. हरियाणातील भाजप सरकार शेतकऱ्यांकडून 24 पिके एमएसपीवर खरेदी करत आहे. देशातील अन्य कुठले राज्य सरकार एमएसपीवर 24 पिकांची खरेदी करत आहे हे काँग्रेस नेत्याने सांगावे असे आव्हान शाह यांनी दिले आहे.
कर्नाटक आणि तेलंगणात काँग्रेसचे सरकार आहे, तेथे एमएसपीवर किती पिकांची खरेदी केली जाते हे राहुल गांधी यांनी जाहीर करावे. भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या सरकारला शेतकरी 2 रुपयांच्या भरपाईचे सरकार म्हणायचे. कारण त्यांच्या शासनकाळात पिकहानीसाठी 2 रुपयांचा चेक पाठविला जात होता अशी टीका शाह यांनी केली आहे.