नेपाळमध्ये एव्हरेस्ट घोटाळ्याचा भांडाफोड
अन्नात बेकिंग सोडा मिसळून करायचे आजारी : हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करवून मोठी कारवाई
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टशी निगडित एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. काही शेर्पा आणि ट्रेकिंगशी निगडित लोक मिळून अन्नात बेकिंग सोडा किंवा एक औषध मिसळून पर्यटकांना आजारी पाडून महाग हेलिकॉप्टर रेस्क्यूद्वारे कोट्यावधींचा विमा घोटाळा करत होते. नेपाळ पोलिसांनी याप्रकरणी 32 जणांवर गुन्हे नोंदविले आहेत. आरोपींमध्ये ट्रेकिंग कंपनीचे मालक, हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि रुग्णालयाशी संबंधित लोक सामील आहेत.
नेपाळच्या उंच पर्वतीय भागांमध्ये हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करणे अनेकदा लोकांचा जीव वाचविण्याची आवश्यक पद्धत असते. तेथे ऑक्सिजनची पातळी कमी असते आणि हवामान अचानक खराब होऊ शकते, याचमुळे आजारी किंवा अडकून पडलेल्या ट्रेकरला लवकर काठमांडू येथे पोहोचविणे आवश्यक असते. परंतु याच व्यवस्थेला गैरफायदाही उचलला जात आहे. स्पष्ट माहितीचा अभाव आणि योग्य देखरेख नसल्याने येथे एक मोठा विमा घोटाळा झाला आहे.
काही शेर्पा, ट्रेकिंग कंपन्यांसोबत मिळून पर्यटकांच्या जेवणात बेकिंग सोडा मिसळत होते. यामुळे पर्यटकांना तीव्र पोटदुखी, उलटी अन् अन्य समस्या व्हायच्या. हा प्रकार उंचीवर होणारा आजार (अल्टीट्यूड सिकनेस)सारखा वाटतो. काही प्रकरणांमध्ये पर्यटकांना डायमॉक्स (उंचीवरील आजारासाठी दिले जाणारे औषध)सोबत अधिक पाणी मिसळून अशी लक्षणे निर्माण केली जात होती, ज्यामुळे स्थिती गंभीर असल्याचे वाटायचे असे चौकशीतून समोर आले आहे.
आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांकडून वसूली
पर्यटक आजारी पडल्यावर त्यांना महागड्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करविण्यासाठी दबाव निर्माण केला जात होता. यानंतर बनावट वैद्यकीय अहवाल आणि फ्लाइट दस्तऐवज निर्माण करत आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांकडून रक्कम वसूल केली जात होती. नेपाळ चार्टर सर्व्हिस, एव्हरेस्ट एक्सपीरियन्स अँड असिस्टेंस आणि माउंटेन रेस्क्यू यासारख्या कंपन्या या घोटाळ्यात मुख्य स्वरुपात सामील आहेत.
सत्य शोधून काढणे अवघड
रेस्क्यूदरम्यान एकाच हेलिकॉप्टरमध्ये अनेक लोकांना बसविले जाते, परंतु प्रत्येक व्यक्तीच्या नावाने वेगवेगळे बिल विमा कंपनीला पाठविले जाते, प्रत्येकासाठी वेगवेगळे उ•ाण झाल्याचे दाखविले जात होते. 4 हजार डॉलर्सच्या उ•ाणाला 12 हजार डॉलर्सचा क्लेम केला जात होता. याकरता बनावट फ्लाइट नोंदी तसेच रुग्णालयातही बनावट कागदपत्रे तयार केली जात होती. वरिष्ठ डॉक्टरच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करत अहवाल तयार केला जायचा. काही प्रकरणांमध्ये बनावट नोंदी करत पर्यटकांना रुग्णालयात भरती दाखविण्यात आले होते. दुर्गम पर्वतीय क्षेत्रात नेमके काय घडले हे तपासणे आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांसाठी अत्यंत अवघड होते.
3 मोठ्या कंपन्यांच्या 6 अधिकाऱ्यांना अटक
या पूर्ण घोटाळ्यात शेर्पा, हेलिकॉप्टर कंपन्या, ट्रेकिंग एजेन्सी आणि रुग्णालये मिळून रक्कम वाटून घेत होते. याप्रकरणी तपासणी जानेवारीत सुरू झाला होता, यादरम्यान 3 मोठ्या रेस्क्यू कंपन्यांच्या 6 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
-या घोटाळ्याद्वारे सुमारे 19.69 दशलक्ष डॉलर्स (जवळपास 188 कोटी रुपये)ची फसवणूक करण्यात आली.
-एका कंपनीने 1,248 रेस्क्यूपैकी 171 बनावट दाखविले आणि 10 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम प्राप्त केल्याचा आरोप आहे.
-दुसऱ्या कंपनीने 471 पैकी 75 बनावट रेस्क्यू दाखवून सुमारे 8 दशलक्ष डॉलर्स कमाविले आहेत.
-याप्रकरणी सरकारी पक्षाने एकूण 11.3 दशलक्ष डॉलर्सच्या (सुमारे 107 कोटी रुपये) दंडाची मागणी केली आहे.