For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आभासी जगातील घटना आपोआपच निरर्थक ठरतात

06:22 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
आभासी जगातील घटना आपोआपच निरर्थक ठरतात
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

पूर्वकर्मानुसार ह्याजन्मी कर्मे माणसाच्या वाट्याला येतात. जर ती करण्याचे टाळले तर सध्याचा जन्म वाया जाऊन पुढल्या जन्माची आपोआपच जुळणी होते. म्हणून निरपेक्ष कर्म करून कर्मयोग साधावा असं बाप्पा सांगतात. कर्मयोगामुळे चित्तशुद्धी साधलेल्या साधकास ब्रह्म सर्वत्र भरून राहिलेले आहे ह्याचा साक्षात्कार होतो. हे सर्व चराचर विश्व ब्रह्मव्याप्त आहे परंतु माणसाच्या मनात असलेल्या आपपर भावाने त्याला सर्वत्र ब्रह्माची प्रचीती येत नाही.

बाप्पा हे ब्रह्माचं सगुण रूप असल्याने सजीव निर्जीव सृष्टी ही बाप्पांचीच निर्मिती आहे. बाप्पा आपल्या सर्वांचे कुटुंबप्रमुख आहेत. म्हणून बाप्पा म्हणतात सगळ्यांच्यात माझं बीज पहायला शिका म्हणजे तुमच्यातील आपपर भाव आपोआप कमी होईल. मनुष्याने त्याच्या मनातील सुख-दु:ख, क्रोध, हर्ष, भीती या भाव भावनांचे ठिकाणीही समान असावे. त्यासाठी आत्मस्वरूपात स्थिर होऊन शरीर भोगत असलेल्या सुखदु:खांकडे अलिप्तपणे पहायला शिकलं पाहिजे.

Advertisement

बाप्पा पुढं म्हणाले. तुझी खरी ओळख आत्मा अशी आहे. हे तुझे आत्मस्वरूप हे माझेच रूप असून तुला प्राप्त झालेले शरीर हे तुझे तात्पुरते रूप आहे. हा जन्म संपला की, तुला प्राप्त झालेले सध्याचे शरीर नष्ट होईल परंतु तुझे आत्मस्वरूप हे कधीही नष्ट होत नाही. त्यामुळे सुखदु:ख प्रसंगी तू त्यापासून अलिप्त रहा. ही बाब सर्वांच्या लक्षात यावी म्हणून वरील मुद्यावर बाप्पा पुढील श्लोकात जोर देत आहेत.

रोगाप्तौ चैव भोगाप्तौ जये वा विजये पि च ।

श्रियो योगे च योगे च लाभालाभे मृतावपि ।। 43 ।।

अर्थ- रोग असो अथवा भोग, जय अथवा पराजय, ऐश्वर्य किंवा दारिद्र्य, नफा वा तोटा अथवा प्रियजनांचा मृत्यु या सर्व ठिकाणी समान दृष्टि असावी.

विवरण-बाप्पा म्हणाले, माणसाची खरी ओळख आत्मा अशी असली तरी हा आत्मा एकदा शरीरात शिरला की आपले आत्मस्वरूप विसरतो आणि प्राप्त झालेल्या शरीराला स्वत:ची ओळख समजतो. साहजिकच शरीराला जे सुखाचे वाटेल ते त्याला प्रिय वाटू लागते. त्यातून आनंद घ्यायची वृत्ती वाढीस लागते. त्याउलट शरीराला काही आजार झाला की तो हळवा होतो. त्यातील वेदनातून त्याला दु:ख होते.

अशाप्रकारे आत्मा शरीराशी एकरूप झाल्याने त्याला सुख, दु:खाची भावना होते. तसेच वैयक्तिक आयुष्यातील जय पराजय, श्रीमंती अथवा गरिबी, व्यवहारातला नफा तोटा, प्रियजनांचा मृत्यू ह्या गोष्टीमुळे त्याचे मन हेलकावू लागते. तो सदैव आनंदाच्या शोधात असतो परंतु वर वर्णन केलेल्या सर्व गोष्टी ह्या तात्पुरत्या असल्याने त्यातील एखाद्या गोष्टीतून त्याला आनंद मिळाला तरी तो कायम टिकणारा नसतो. म्हणून बाप्पा सांगतात, आपले आत्मस्वरूप हे सध्याच्या शरीरापेक्षा वेगळे आहे हे लक्षात घेऊन त्यातील भवभावनांमध्ये माणसाने गुंतून राहू नये. आपले कर्तव्य करून त्यापासून स्वत:ला अल्पित करावे शरीराला जे काही होईल ते प्रारब्धानुसार होत असते हे लक्षात घेऊन आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींकडे ह्याच्याशी आपला काही संबंध नाही हा दृष्टीकोन ठेवून विचलित होऊ नये.

हे शक्य झाल्यास सुखदु:खाच्या प्रसंगाकडे समान दृष्टीने पाहता येईल. हे लिहायला सोपे असले तरी प्रत्यक्ष अंमलात आणायला तसे कठीण जाते. म्हणून बाप्पांनी सांगितल्याप्रमाणे हे सर्व विश्व ब्रह्मव्याप्त आहे ह्याची खुणगाठ मनाशी बांधावी असे केल्याने हे लक्षात येते की जर हे विश्व ब्रह्मव्याप्त आहे तर समोर दिसणाऱ्या जगाचे अस्तित्व शून्य होते. समोरचे जग हा एक आभास आहे ही खात्री झाली की, त्यातील घटना आपोआपच निरर्थक ठरतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.