For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजही वाचनाची आवड असल्याचे सिद्ध

01:19 PM Feb 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजही वाचनाची आवड असल्याचे सिद्ध
Advertisement

गोवा पुस्तक महोत्सवाला भरघोस प्रतिसाद: देशभरातील साहित्यिक, वाचकांचा महासंगम

Advertisement

पणजी : कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून चालू असलेल्या गोवा पुस्तक महोत्सवाचा दिमाखात व उत्साही वातावरणात समारोप झाला. गोव्यासह देशाच्या विविध भागातून या महोत्सवात अनेक साहित्यिक व पुस्तकप्रेमींनी सहभाग घेतला. त्यामुळे त्याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले. गोव्यात झालेला हा पहिलाच पुस्तक महोत्सव कमालीचा यशस्वी झाला असून त्यास भरघोस प्रतिसाद मिळाल्याने आयोजक खूश झाले.

केंद्र सरकारचे शिक्षण मंत्रालय, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, गोवा सरकार, लोकमान्य कल्चरल फाऊंडेशन, समर्थ युवा या सर्वांच्या सहभागाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचा आनंद सर्व स्तरांतील लोकांनी घेतला. शाळकरी मुलांनी तर या महोत्सवाचा खरा आनंद लुटला. त्यांनी आपल्या मनातील अनेक प्रश्न उपस्थित करून जास्तीतजास्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. विविध क्षेत्रातील मान्यवर, विचारवंतांनी महोत्सवात हजेरी लावून लोकांसमोर आपले विचार मांडले आणि ते ऐकण्यासाठी श्रोतेही मोठ्या संख्येने जमले हे विशेष.

Advertisement

पुस्तकांची आवड असल्याचे अधोरेखित

मृणाल कुलकर्णी, अविका गोर, शुभांशु शुक्ला. सचिन पिळगावकर व इतर मान्यवरांनी आपल्या संवादातून महोत्सवाचा दर्जा वाढविला आणि एक चांगली उंची गाठली. त्याशिवाय विविध स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रम, इतर उपक्रम यामुळे महोत्सव चांगला रंगल्याचे दिसून आले. पुस्तके वाचण्यासाठी आणि त्यांची खरेदी -विक्री यासाठी बरीच गर्दी झाल्याचे दिसून आले. पुस्तकांबाबत जनतेमध्ये आजही आवड, प्रेम असल्याचे या महोत्सवातून अधोरेखित झाले.

महोत्सवामुळे गोव्याच्या नावाची चर्चा

महोत्सवाला प्रतिसाद कितपत मिळेल अशी शंका होती. परंतु, ती पहिल्याच दिवशी मिटली आणि भरघोस प्रतिसाद मिळाला. पालक, शिक्षक, शाळकरी, मुलांनी उदंड प्रतिसाद दिला आणि तो सातत्याने वाढत गेल्याचे दिसून आले. महोत्सवात विविध प्रकाशन व इतर संस्थांचे 200 पेक्षा अधिक स्टॉल होते. तेथे मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी-विक्री झाल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली. या महोत्सवामुळे गोव्याचे नाव पुस्तके विचारवंतांच्या क्षेत्रात बरेच गाजल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Tags :

.