For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईश्वर समोर उभा असला तरी लोक त्याला ओळखत नाहीत

06:22 AM Feb 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
ईश्वर समोर उभा असला तरी लोक त्याला ओळखत नाहीत
Advertisement

अध्याय सहावा

Advertisement

ईश्वराची भक्ती करून त्याचे तत्व जाणून घेण्यात माणसाची परिस्थिती कधीही आड येत नाही. ईश्वराकडून काहीतरी मिळवण्यापासून सुरू झालेली ईश्वर भक्तीची वाटचाल मला इतर काहीही नको फक्त तूच हवास इथपर्यंत कसकशी होत राहते ते आपण बघितलं. ईश्वरी तत्व जाणण्याची इच्छा असणारे फार कमी आणि त्यातील एखादाच शेवटपर्यंत पोहोचून ते तत्व जाणू शकतो. असा एखादा दुर्मिळ सोडला तर बाकी सर्व किरकोळ मालाची ग्रिहाईकं असतात. कारण त्यांना फक्त प्रापंचिक जीवन महत्त्वाचं वाटत असल्याने त्यांच्या दृष्टीने ते जीवन सुखावह होईल याच गोष्टी त्यांना ईश्वराकडून हव्या असतात. अर्थात एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत त्याप्रमाणे प्रापंचिक गोष्टींची हाव आणि ईश्वरी तत्व समजून घेण्याची इच्छा एकत्र नांदू शकत नाहीत. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, जगातला मान, लौकिक, पैसा, विषय इत्यादि काही नको असे वाटत असेल तर  ‘भगवंत मला हवा आहे’ असे म्हणण्यात अर्थ आहे. अर्थात ईश्वर सर्वांनाच जाणून असतो पण त्याला जाणण्याची इच्छा मात्र क्वचित एखाद्याला असते. ह्याचे कारण उघड आहे आणि बाप्पांनी ते मागील श्लोकात सांगितलेले आहे. तरीही लोकांनी ते लक्षात ठेवावं म्हणून बाप्पा पुढील श्लोकात असं सांगतात की, बहुतेकजण मोहमायेच्या पडद्यामुळे ईश्वरापासून अलग झालेले असल्याने त्याना पडद्यामागे उभा असलेला ईश्वर दिसू शकत नाही.

अव्यत्तं व्यक्तिमापन्नं न विदुऽ काममोहिताऽ ।

Advertisement

नाहं प्रकाशतां यामि अज्ञानां पापकर्मणाम् ।। 15 ।।

अर्थ-अव्यक्त असून व्यक्त स्वरूप प्राप्त झालेल्या मला कामादि शत्रूंनी मोहित झालेले लोक जाणत नाहीत. अज्ञ व पापकर्मी मनुष्यांना माझे ज्ञान होत नाही.

विवरण-भक्तांचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांचा नाश करण्यासाठी ईश्वराने अवतार घेतलेले आहेत. श्रीगणेश हेही ईश्वराचा सगुण रूपातला अवतार होत. रामकृष्णादि ईश्वरी अवतार पूर्वी होऊन गेले आहेत. त्यावेळी आपल्यासमोर ईश्वर अवतार घेऊन वावरत आहेत हेच बहुतेकांना समजले नव्हते किंवा स्वत:चे अस्तित्व सर्वोच्च मानत असल्याने त्यांनी राम कृष्णांना तुच्छ मानले. भगवंतांनी भगवद्गीतेत ही खंत बोलून दाखवली आहे. नवव्या अध्यायात ते म्हणतात,

मज मानव रूपात तुच्छत्वे मूढ देखती । नेणुनी थोरले रूप जे माझे विश्वचालक ।

बाप्पा ही वस्तुस्थिती उलगडून सांगत आहेत. ते म्हणतात, असं होण्याचं कारण म्हणजे बहुतेक लोकांच्यावर मायेचं वेष्टण असल्याने त्यांच्यावर षड्रिपुंची सत्ता चालत असते. त्यामुळे त्यांना स्वत:पुढे इतर कुणाची मातब्बरीच वाटत नाही. साकार रूपात प्रत्यक्ष ईश्वर त्यांच्यापुढे उभा आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. कित्येकवेळा रामकृष्णांना लोकांनी हिणवलेसुद्धा आहे. त्यांचा वेळोवेळी अपमान केला आहे.

सांगायची आणखी एक गोष्ट म्हणजे लोकांना ईश्वराची पूर्वी होऊन गेलेली सगुण रूपातील अवतारकार्ये व त्या अवतारातील सगुण रूपंच श्रेष्ठ वाटते. त्यामुळे ईश्वर समोर असूनसुद्धा ते त्याच्या दर्शनाला पारखे होतात. सामान्य लोकांच्या डोळ्यात ईश्वर दिसण्याची कुवत नसते. ज्यांना ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली असते अशा क्वचित आढळणाऱ्या महात्म्यांखेरीज इतरांना ईश्वरी अस्तित्व जाणवत नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ईश्वराचे निर्गुण अस्तित्व नगण्य असते कारण त्यांना फक्त सगुण मूर्तीच वंद्य असते. म्हणजे गम्मत पहा, जेव्हा सगुण रूपात प्रत्यक्ष वावरत असतो. तेव्हा ते ईश्वराला ओळखू शकत नाहीत. एव्हढेच नव्हे तर त्याला तुच्छ लेखतात. त्याचवेळी दगड, मातीच्या मूर्तीला मात्र भजतात, तिची भक्ती करतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.