Kolhapur Crime | उसाच्या फडात शिरताच पोलिसांचेही डोळे पांढरे झाले! शिरोळ तालुक्यातील 'त्या' शेतातील ७ फुटी गुपित अखेर उघड
उसामध्ये लपवून गांजाची लागवड
आलास - आलास ता. शिरोळ येथे घराच्या पाठीमागील गट क्रमांक ५४ मधील उसाच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार कुरुंदवाड पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला. या प्रकरणी रमेश चंद्रकांत आलासे (वय ६८, रा. आलास, ता. शिरोळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदरचे झाड७ फूट उंचीचे होते, यापूर्वी ही अशीच झाडांची लावण करून विक्री केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलिसांना खबऱ्यामार्फत आलास गावातील उसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार सहाय्यक पोलीसनिरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासणीदरम्यान उसाच्या पिकामध्ये लपवून ठेवलेली गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून सुमारे पाच किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली.घटनास्थळी पंचनामा सुरू पोलिसांकडून असतानाच चाकू-सुरीला धार लावण्याचा व्यवसाय करणारा एक फिरस्ती व्यक्ती तेथे गांजा खरेदी करण्यासाठी आल्याचे समोर आले.
संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर त्याची नोंद करून त्याला सोडून देण्यात आले. या घटनेमुळे संबंधित ठिकाणी गांजाची विक्री होत असल्याच्या संशयाला अधिक बळ मिळाले आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी ज्ञानदेव सानप, विवेक कराडे, अविनाश भोसले आदी पथकात होते.