संताचे सहज बोलणेसुध्दा हितोपदेश असतो
अध्याय पाचवा
भगवंत म्हणाले, मी कर्ता आहे ह्या अहंकारामुळे केलेल्या कर्मात माणसाचा जीव अडकतो पण कर्मयोगी ते टाळत असल्याने, त्याला अत्यंत श्रेष्ठ अशी शांती प्राप्त होते. जो कर्मयोगाचे आचरण करत नाही तो फळाच्या अपेक्षेने कर्म करत असल्याने बंधनात अडकतो. सर्व कर्मांचा मनाने संन्यास केलेला जितेंद्रिय देहवान् पुरुष नवद्वाराच्या देहरूपी नगरात सर्व करूनही त्यापासून अलिप्त असल्याने आनंदाने रहात असतो. संन्यास म्हणजे कर्माचा त्याग अशी सर्वसामान्य माणसाची समजूत असते. प्रत्यक्षात कर्माचा संन्यास म्हणजे फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे सर्व कर्मे करून आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाने त्याविषयी उदासीन राहणे. सर्व कर्मांचा मनाने संन्यास केलेला संयमी पुरुष नवद्वाराच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न केल्याच्या वा कुणाकडून करून न घेतल्याच्या आविर्भावात आनंदाने रहात असतो ह्या अर्थाचा
मनाने सगळी कर्मे सोडुनी संयमी सुखे । नव-द्वार-पुरी राहे करी ना करवी हि ना ।। 13 ।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, संयमी पुरुष फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या खात्रीने त्याविषयी उदासीन राहतो.
असा मनुष्य स्वत:ला कर्ता समजत नसल्याने त्याला कर्माच्या श्रेयाची अपेक्षा नसते, त्यामुळे त्याचे कुणी कौतुक केल्यास त्याच्याबद्दल प्रेम अथवा त्याची कुणी दाखल न घेतल्यास त्याच्याबद्दल राग, द्वेष, मत्सर असे काही त्याला वाटत नाही. तो जिकडे पाहतो, तिकडची सृष्टी सुखमय होते आणि त्याचे सहज बोलणे म्हणजे हितोपदेशच असतो त्यामुळे ते बोधवाक्यच ठरते. देहानुसार वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फळांचा त्याग करणारा असल्याने कर्मे करूनही काहीच करत नाही.
करायचं थोडं आणि सांगायचं फार असा सामान्य माणसाचा स्वभाव असतो. त्याउलट कर्मयोगी कर्म उत्तम प्रकारे पार पडतो परंतु त्याला केलेल्या कर्माबद्दल कुणी आपलं कौतुक करावं असं वाटत नाही. आपण कर्ते नाही ह्या खात्रीमुळे त्याला आपण काही केलंय असं वाटत नसल्याने स्वस्थ बसून राहतो. ह्याला माउली मनाने कर्माचा संन्यास घेणे असे म्हणतात. स्वत: कर्ता नाही ही खात्री आणि त्यामुळे केलेल्या कर्माच्या श्रेयाची अपेक्षा नसल्याने त्याला कुणाबद्दल राग, द्वेष, मत्सर असे काहीच वाटत नाही.
आपण दिवसभरात अनेक कर्मे करतो. अगदी साध्या साध्या कामाचीसुद्धा लोकांनी प्रशंसा करावी, आपले कौतुक करावे अशी आपली अपेक्षा असते. ते झाले तर ते करणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम वाटते, जो कौतुक करणार नाही त्याचा राग येतो, तो आपल्यापेक्षा कामात सरस असला तर त्याचा द्वेष वाटू लागतो, त्याचा आपण मत्सरही करू लागतो. हे सगळे आपल्या मनाचे विकार असतात आणि ते आपली मन:शांती घालवण्यास कारणीभूत ठरतात. हे आपण लक्षात ठेउयात आणि केलेल्या कामाचे श्रेय मिळण्याची अपेक्षा न करता स्वस्थ राहण्यास शिकुयात.
माउली पुढं सांगतात, अशा माणसाची नजर जिकडे पडेल तिकडे आनंदीआनंद पसरतो आणि तो जे सांगेल तो महाबोध होतो. नऊ छिद्रांच्या देहामध्ये रहात असूनही तो देह त्याला स्वत:चा वाटत नसतो. जी गोष्ट स्वत:ची नसते त्या गोष्टीबद्दल माणसाला आपलेपणा वाटत नाही. जो देह आपला वाटत नाही त्या देहाने कर्म केले तरी त्याबद्दल तो बेफिकीर असल्याने त्याला फळाची अपेक्षा नसते.