For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत वाहनांसाठी सम-विषम फॉर्म्युला

06:15 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत वाहनांसाठी सम विषम फॉर्म्युला
Advertisement

प्रदूषण कमी करण्याचा उद्देश : लवकरच वेळापत्रक जारी करणार

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेची खराब स्थिती लक्षात घेत दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी पत्रकार परिषदेत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. दिल्लीत प्रदूषण नियंत्रणासाठी अनेक नवीन नियम लागू केले जात आहेत. गेल्या आठवड्यापासून वेगवेगळे निर्बंध लावले जात असतानाच आता वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत आठवड्यातून काही दिवस फक्त सम नंबर प्लेट असलेली वाहने रस्त्यावर चालवता येतील आणि उरलेल्या दिवसांत विषम नंबर प्लेट असलेली वाहने चालवता येतील. त्यासाठी एक-दोन दिवसात वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे मात्र, या एका आठवड्यामध्ये त्याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर ती पुढे सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय सरकार घेणार आहे.

Advertisement

नोव्हेंबर सुरू होताच दिल्लीतील हवेची गुणवत्ता धुक्मयामुळे खालावत चालली आहे. आकाशात धुराचे लोट पसरले असून श्वास घेणे कठीण होत आहे. शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना आरोग्याशी संबंधित तक्रारींचा सामना करावा लागत आहे. घसादुखी, डोळ्यात जळजळ आदींसोबतच श्वसनाचे गंभीर आजारही होत आहेत. शहरातील प्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मान्य केले आहे. तापमानात सातत्याने होणारी घसरण आणि वाऱ्याचा अतिशय मंद वेग हे याचे मुख्य कारण आहे. सोमवारी शहरातील एक्यूआय 436 वर पोहोचला होता. या धोकादायक स्थितीमुळे पुढील काही दिवस निर्बंध आणखी कडक केले जाणार आहेत.

ग्राप-4 अंमलबजावणी सुरू

दिल्लीत अत्यावश्यक सेवांचे ट्रक आणि सीएनजी, इलेक्ट्रिक वाहने वगळता सर्व ट्रकच्या प्रवेशावर बंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच आता दिल्लीत सर्व बांधकाम आणि पाडकामांवर पूर्ण बंदी असेल. शहरात सोमवारपासून ‘ग्राप-4’ची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

प्राथमिक शाळाही 10 नोव्हेंबरपर्यंत बंद

खराब हवेमुळे पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. यासोबतच इयत्ता 6वी ते 9वी आणि इयत्ता 11वी पर्यंतच्या मुलांच्या शाळाही 10 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. चालू आठवड्यात फक्त दहावी आणि बारावीच्या मुलांसाठीच शाळा खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.