राज्यात निर्भया अदयापही असुरक्षित !
विद्येचे माहेरघर असलेल्या सुस्ंकृत पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोतील बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचारामुळे अवघे राज्य ढवळुन निघाले आहे. ही घटना ताजी असतानाच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा भर जत्रेत काही टवाळखोरांनी छेड काढल्याच्या प्रकारामुळे महिला सुरक्षिततेचे पूर्ण वाभाडे निघाले आहेत. या घटनामुळे राज्यातील निष्पाप निर्भया अद्यापही असुरक्षित असल्याचे वास्तव समोर आले आहे.
.स्वारगेट बस डेपोत बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराने संपुर्ण राज्य हळहळले. तरुणीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत दत्ता गाडे या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. मात्र पुणे पोलिसांनी सतर्क नागरिकांच्या मदतीने नराधमाच्या मुसक्या आवळल्या. ही घटना ताजी असतानाच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना घडल्याने, अक्षरश: राज्यात लोकप्र]ितनिधींच्या मुली देखील सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. जर लोकप्रतिनिधींच्या मुलीच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या मुलींचे काय ? असा प्रश्न साहजीकच निर्माण झाला आहे. वास्तविक पाहिले तर अशा नराधमांना नागरिकांच्या समोर भर चौकात शिक्षा दिली पाहिजे. असा विचार एक गट करीत आहे. जर गल्फ देशामध्ये अशा प्रकारची शिक्षा आहे तर आपल्याकडे का नाही ? असा विचार जनसामान्यांच्या मनात येणे साहजीकच आहे. जेणेकरुन अशा प्रकारचे कृत्य करण्याची हिंमत त्यांच्यात होणार नाही. अन्यथा सरळ एन्काऊंटर नावाचे अस्त्र बाहेर काढावे. मात्र हे अस्त्र देखील बाहेर काढण्यासाठी पोलीस धजाविणार नाहीत. का तर न्यायालयाचा बडगा, मानवी आयोग यांचा ससेमिरा कोण पाठी लावून घेणार. त्यातच नोकरीला हात गमावून बसण्याची वेळ येणार. हे सध्या अक्षय शिंदे एन्काउंटरवरुन दिसुन येत आहे. यामुळे अशा नराधमांची हिंमत वाढत चालली आहे. एकंदरीत काय तर राज्यात निर्भया या अद्यापही असुरक्षिततच आहेत.
स्वारगेट बस डेपो अत्याचार आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची भर जत्रेत छेड काढल्याने अशा विकृतांची किती हिंमत वाढली आहे. हे दिसून येते. अशा विकृतांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने यावर विचारविमर्श करणे आवश्यक आहे. कारण अशा घटना घडल्यानंतर देखील पीडित मुलगी आणि त्यांच्या कुटुंबियाना वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत रहावे लागत आहे. न्याय मिळता, मिळता निम्मे अधिक वर्षे त्यामध्येच जातात. पण न्याय काही मिळत नाही. सध्या अशीच अवस्था देशातील बलात्कार पीडित कुटुंबीयाची आहे.
अजुनही या कुटुंबीयांना त्यांच्या पीडित मुलीच्या आक्रोशाने झोप येत नाही. न्यायालय आणि पोलीस ठाण्याच्या पायऱ्या तरी किती झिजवाव्या असा प्रश्न पीडित कुटुंबीयांना पडला आहे. यामुळे अक्षय शिंदे प्रकरणात ठाणे पोलिसांनी आत्मरक्षणासाठी का होईना जे केले ते योग्यच केले असा म्हणणारा समाजातील एक घटक आहे. तसेच यापूर्वी हैद्राबाद पोलिसांनी जे केले ते योग्यच केले असा सुर अनेक पीडित कुटुंबियांचा आहे. एका बाजूने पाहिले तर त्यांचेही म्हणणे रास्त आहे. कारण जिच्यावर अन्याय, अत्याचार होतो, ती देखील कोणाची मुलगी, बहिण असते. मात्र अन्याय करणाऱ्या विकृतांना त्यावेळेस त्याचे काही एक भान नसते. अंगात सैतान संचारल्यासारखे लचके तोडण्याचे काम हे नराधम करतात. यामुळे यांना ठाणे पोलीस तसेच हैद्राबाद पोलिसांनी जी शिक्षा दिली ती योग्यच असल्याचे जनमत देशात तयार झाले आहे. मात्र कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी जर हे जाणुन-बुजून केले असेल तर ते नक्कीच भुषणावह नसल्याचे मत अनेक जाणकांराचे आहे. ते काही अर्थी बरोबर पण आहे. मात्र यामुळे देशातील किंवा राज्यातील कित्येक निर्भयांना न्याय मिळणार आहे का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
राज्यातील अहमदनगर जिह्यातील कोपर्डी येथे 13 जुलै 2016 साली एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अनन्वयीत अत्याचार करीत तीन नराधामांनी तिची हत्या केली. कोपर्डी येथील अत्याचार हत्येप्रकरणाने संपूर्ण देश हादऊन निघाला. तर संपूर्ण राज्यभरात या चिमुरडीला न्याय देण्यासाठी एकच आंदोलन सुऊ झाले. पुढे या आंदोलनाने वणव्याचे रौद्रऊप धारण करीत संपूर्ण राज्य व्यापले. यातील पकडल्या गेलेल्या तीन नराधामांना नगरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. काय दोष होता त्या चिमुरडीचा. त्यांनी त्या चिमुरडीच्या आयुष्याची होळी केली. तिच्या कुटुंबियाची मानसिकता काय असेल? याचा जराही विचार येणार नाही.
राजधानी दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 रोजी घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चौघांची फाशीची शिक्षा कायम ठेवून सर्वोच्च न्यायालयाने देशवासीयांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ केला. मात्र अनेकदा न्यायसंस्थेची प्रक्रिया ही वेळखाऊ असल्याने, गुन्हा करण्यास हे नराधम खुलेआम धजावत आहेत. तर काही काही संघटनांनी निर्भया प्रकरणातील आरोपींना मिळालेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात राजधानीत निदर्शनेही केली. यामुळे अशा प्रकारचे गुन्हे करण्यास विकृतांची मजल जात आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरण ताजे आहे तोच, देशाच्या आर्थिक राजधानीत एका छायाचित्रकार तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडल्याने, संपूर्ण देशांत आगडोंब उसळला. यातील माथेफिरुंना पोलिसांनी अटक देखील केली. तर यामध्ये एक आरोपी अल्पवयीन असल्याने, त्याला कमी शिक्षा देत सोडून दिले. मात्र आज तोच अल्पवयीन आरोपी सराईत गुन्हेगारी टोळी चालवित आहे. बलात्काराच्या गुह्यातून बाहेर आल्यानंतर त्याने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
जर या गुन्हेगारांची नांगी ठाणे पोलीस तसेच हैद्रबाद पोलिसांनी ठेचली तशी वेळीच ठेचली असती तर शहरातील एक गुन्हेगारी टोळी लयास गेली असती असे जनमत तयार होत आहे. यामुळे देशातील जनमताचा देखील आदर व्हायला पाहिजे. कारण अशा अनेक निर्भया आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत जोपर्यंत याना न्याय मिळत नाही तोपर्यंत राज्यातील निर्भया या असुरक्षिततच असणार हे मात्र नक्की.
अमोल राऊत