महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुष्काळातही राजकारणाचे कारंजे!

06:30 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पावसाअभावी कर्नाटकात भूजल पातळी खालावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 236 तालुक्यांपैकी 215 तालुक्यात पाण्याचा स्रोत आटला आहे. नद्या, तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. पाण्याचा वापर मात्र वाढला आहे. त्यामुळेच भूजल पातळी खालावली आहे. 236 तालुक्यातील एकूण 1 हजार 787 कूपनलिकांच्या पाहणीतून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. राज्यातील नद्यांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा योग्य वापर केला तरच उन्हाळ्यात पाणीटंचाईतून थोड्या प्रमाणात तरी मार्ग काढणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांनीही जादा पाणी लागेल, अशी पिके घेऊ नयेत, असे आवाहन सरकारी यंत्रणेने केले आहे. प्रत्येक महिन्यात 1 हजार 784 कूपनलिकांची पाहणी करून भूजल पातळीचा अंदाज घेतला जातो. यंदाची परिस्थिती ठीक नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अर्थसंकल्पाच्या तयारीत आहेत. 16 फेब्रुवारी रोजी 15 व्या वेळी ते अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यामुळे आतापासूनच वेगवेगळ्या खात्यांच्या प्रमुखांची बैठक घेऊन आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी हाती घेतले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लगेच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचे बजेटही लोकप्रिय असेच असणार आहे. दुसरीकडे तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी लोकसभेसाठी उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काँग्रेस व भाजपचे उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. कर्नाटकात भाजपची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेस हायकमांडने व्यूहरचना सुरू केली आहे. निवडणुकीच्या आधी महामंडळांवर नियुक्त्या करण्याची तयारी काँग्रेस नेत्यांनी केली होती. हायकमांडची या यादीला परवानगीही मिळाली होती. ऐनवेळी हायकमांडने यादीत बदल केल्यामुळे ही यादी रोखून धरण्यात आली आहे.

Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार या दोन्ही नेत्यांच्या संमतीने तयार करण्यात आलेल्या यादीत ऐनवेळेला तीन नावात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याच हायकमांडविरुद्ध या दोन्ही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच की काय, कर्नाटकाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला हे बेंगळूरला धावून आले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची त्यांनी मनधरणी केली असली तरी अंतिम टप्प्यात यादी रोखल्यामुळे यादीत स्थान मिळविलेल्या आमदारांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे माजी मंत्री रमेश जारकीहोळी व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्ष थंड होईल, याची लक्षणे दिसून येत नाहीत. रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या कारखान्याने अपेक्स बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही म्हणून रमेश जारकीहोळी व त्यांच्या संचालकांवर एफआयआर दाखल करून हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे माजी मंत्री पार भडकले आहेत.

डी. के. शिवकुमार हे कोतवाल रामचंद्रचे शिष्य आहेत. सिद्धरामय्या यांच्याकडे सत्ता मिळाली आहे. म्हणून बरे झाले. नहून आमच्या उताऱ्यावरही या नेत्यांनी आपली नावे चढविली असती. सिद्धरामय्या चांगले नेते आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. त्यांच्यासोबत आपण काम केले आहे. शिवकुमार यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे सिद्धरामय्याही पूर्वीसारखे राहिले नाहीत. कोतवाल रामचंद्र हा बेंगळूरमधला गुंड; डी. के. शिवकुमार हे त्याचे शिष्य. ते उपमुख्यमंत्री झाल्यापासून सिद्धरामय्या व्यवस्थित काम करत नाहीत, असे सांगत रमेश जारकीहोळी यांनी डी. के. शिवकुमार यांची कुलंगडी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील राजकारणात डी. के. शिवकुमार यांच्या हस्तक्षेपामुळे गेल्या सरकारमध्ये सुरू झालेल्या या संघर्षाने अनेक सत्तानाट्यो घडविली. यापुढेही याच संघर्षातून कर्नाटकाच्या राजकारणात बऱ्याच काही उलथापालथी होणार, अशी अटकळ आहे. स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी भाजपबरोबर घरोबा करणाऱ्या निजद नेत्यांची भाजप नेत्यांशी पहिली बैठक झाली. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत आगामी लोकसभा, विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसंबंधी चर्चा झाली आहे.

भाजप व निजद या दोन्ही पक्षांत जागावाटप व्हायचे आहे. अयोध्येतील कार्यक्रमानंतर जागावाटपासंबंधी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले आहे. जर दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले तर काँग्रेसला रोखता येणे शक्य आहे, असे कुमारस्वामी यांना वाटते. त्यामुळेच त्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. यापूर्वी भाजपशी त्यांनी केलेली मैत्री म्हणजे असंगाशी संग असे त्याचे वर्णन केले जात होते. आता माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचाही या युतीला होकार नव्हता. आता युतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी देवेगौडा यांनी कधीच आपला उजवा हात वर केला आहे. या युतीमागे अस्तित्व टिकविणे हाच प्रमुख उद्देश आहे. राजकीय कारणासाठी वेगवेगळे मुद्दे मांडत कर्नाटकात काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप व निजद हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची किती निकड आहे, हे ठासून सांगितले जात असले तरी खरे कारण अस्तित्व टिकविणे, हेच आहे, हे लपून राहिले नाही. या युतीमुळे गेल्या निवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेसच्या मदतीने तर आणखी काही ठिकाणी भाजपच्या मदतीने निजदशी श•t मारलेल्या अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अयोध्येत रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य राममय बनले होते. बालरामाची मूर्ती घडविणारे अरुण योगीराज हे म्हैसूरचे. मूर्तीसाठी वापरण्यात आलेला काळा पाषाणही कर्नाटकातूनच निवडण्यात आला होता. म्हैसूर तालुक्यातील हारुहळ्ळी हे गाव मूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या पाषाणामुळे जगभरात ठळक चर्चेत आले. ज्या शेतवाडीतून पाषाण काढण्यात आला, त्या ठिकाणाच्या दर्शनासाठी रामभक्त जाऊ लागले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणीही राम मंदिर उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. मूर्तीकार अरुण योगीराज हे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर बुधवारी कर्नाटकात परतले आहेत. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बालरामाच्या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला पाषाण जिथून काढण्यात आला, त्या ठिकाणावर येऊन रामभक्त नतमस्तक होऊ लागले आहेत. त्या जागेला स्पर्श करून आशीर्वाद घेत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी कर्नाटकात

शाळा-कॉलेजना सुटी देण्याची मागणी भाजपने केली होती. काँग्रेसने त्या दिवशी सुटी जाहीर केली नाही. मात्र, कर्नाटकातील धर्मादाय खात्याच्या अखत्यारितील प्रमुख मंदिरात त्या दिवशी विशेष पूजा करण्यात आल्या. सिद्धरामय्या यांच्या नावात राम आहे. शिवकुमार यांच्या नावात शिव आहे. देवभक्ती आम्हाला भाजपकडून शिकायची आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेस नेते परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपने सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article