33 टक्के मिळाले तरी उत्तीर्ण!
शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांची माहिती : यंदापासून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियम लागू
प्रतिनिधी/ बेंगळूर
यापुढे दहावी आणि बारावी परीक्षेत 33 टक्के गुण मिळाले तरी उत्तीर्ण म्हणून गृहीत धरले जाणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हा नियम लागू होणार असल्याचे शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले. 2025-26 सालापासून नियमाची अंमलबजावणी होणार असून यंदा परीक्षेला हजर होणाऱ्या रिपीटर्स, ब:हिस्थ विद्यार्थ्यांनाही हा नियम लागू असणार आहे, असेही ते म्हणाले.
बेंगळूरमध्ये बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दहावी वार्षिक परीक्षेत 625 पैकी 206 गुण मिळाले तरी विद्यार्थी उत्तीर्ण ठरणार आहेत. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 600 पैकी 198 गुण पुरेसे आहेत. अंतर्गत गुण आणि वार्षिक परीक्षेतील गुण मिळून 33 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.
परीक्षा व्यवस्थेत सुधारणा म्हणून 3 परीक्षा व्यवस्था जारी करण्यात आली आहे. परीक्षा पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठी वेब कास्टिंग केले जात आहे. याआधीच्या परीक्षाही उत्तम पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. वेब कास्टिंग केल्यामुळे कमी निकाल लागला. पण शिक्षकांनी जबाबदारी घेऊन काम सुरू केले. विशेष वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने तयार करून घेतले. त्यामुळे उत्तम निकाल आला आहे, असेही ते म्हणाले.
आता परीक्षा व्यवस्थेत आणखी एका सुधारणा म्हणून 33 टक्के गुण मिळाल्यास विद्यार्थ्याला उत्तीर्ण ठरविले जाईल. दहावीत 625 पैकी 206 गुण मिळाले तर किंवा संबंधित विषयात किमान 30 गुण मिळायला हवे. अंतर्गत आणि परीक्षा मूल्यमापनातून एकूण 33 टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण म्हणून घोषित केले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.