For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनात चुकून जरी विषयाचे स्मरण जरी झाले तरी अनर्थ ओढवतो

06:55 AM Nov 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
मनात चुकून जरी विषयाचे  स्मरण जरी झाले तरी अनर्थ ओढवतो
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, कर्मयोगी साधकाने सर्व इंद्रियांना वश करून मन माझ्यात स्थिर करावे परंतु विषय त्याला तसे करून देत नाहीत म्हणून अंत:करणापासून विषयांबद्दल वाटणारी ओढ किंवा आसक्ती सोडली की, त्या विषयांच्या उपभोगांची इच्छा कमी होते. ह्याप्रमाणे इंद्रियांचे दमन झाले की, ती आपल्या स्वाधीन होऊन आपण ज्या विषयांची इच्छा करू त्याच विषयांची माहिती आपल्याला पुरवतात. योगनिष्ठ होण्यातच आपले भले आहे हे ज्याला समजलेले असते. त्याचे अंत:करण विषयसुखांना भुलत नाही. योगनिष्ठाचे अंत:करण आत्मज्ञानाने परिपूर्ण भरलेले असते, त्यामुळे तो मला कधीच विसरत नाही. त्यासाठी निरिच्छ होणे अगत्याचे आहे. साधकाने वरवर विषयाचा त्याग केलेला असेल पण मनात जर विषयाची थोडीशीही लालसा असेल, तर मात्र त्याला संसाराची बंधने जखडून ठेवतात. त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकता चुकत नाही. म्हणून विषयाची किंचितही अभिलाषा नसावी. ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब जरी घेतला, तरी तो सर्व शरीरात पसरून जीवन नष्ट करायला पुरेसा होतो त्याप्रमाणे पूर्वी घेतलेल्या विषयसुखाच्या अनुभवामुळे विषयांतून सुख मिळते असा विचार क्षणभर जरी मनात आला तर तो अंत:करणातील चांगले काय, वाईट काय हे ठरवणाऱ्या विवेकाचा घात करतो.

विवेकाचा घात कसा होतो ते भगवंत पुढील श्लोकातून समजावून सांगत आहेत. ते म्हणतात, विषयाचा विचार मनात आला की, त्या विषयाचा उपभोग घेण्याची इच्छा निर्माण होते. तिच्या आड येणाऱ्याचा राग येतो. राग आला की, माणसाचे मन भरकटते, त्याला त्याच्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो. त्यामुळे त्याचे पतन होऊन त्याचा आत्मनाश होतो.

Advertisement

विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला । संगांतूनि फुटे काम क्रोध कामात ठेविला ।।62।।

क्रोधातूनि जडे मोह मोहाने स्मृति लोपली । स्मृति लोपे बुद्धि-नाश म्हणजे आत्म-नाश चि ।।63।।

विषय माणसाला कसे छळत असतात त्याबद्दल सांगताना माऊली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, सामान्य माणूस विषयोपभोगाच्या इच्छेला सहजी बळी पडतो. ज्याने विषयांपासून मुक्ती मिळवली आहे, त्याला त्यांची नुसती आठवण जरी झाली तरी पुरेसे आहे. लागलीच त्याची ज्ञानेंद्रिये त्याला त्या विषयाचे आकर्षण दाखवू लागतात. त्यामुळे त्याच्या मनात विषयाबद्दल ओढ उत्पन्न होऊन त्याचा आनंद घ्यावा असे वाटू लागते. इच्छा पूर्ण होत नाही असे दिसले की, त्याच्या आड येणाऱ्याचा राग येतो, त्यातूनच अविचाराचा भ्रम निर्माण होतो. अविचाराचा जोर सोसाट्याच्या वाऱ्यासारखा असतो. त्या तडाख्यात माणसाला त्याच्या आत्मस्वरूपाचा विसर पडतो, मी म्हणजे हा देह असे वाटून देहाभिमान उफाळून येतो.

अर्जुन सज्ञान होता परंतु युद्धाला समोर उभ्या असलेल्या आप्तांच्याबद्दलचा मोहाचा विचार त्याच्या मनात आला आणि आपण आत्मस्वरूप आहोत हे तो विसरला. स्मृती नष्ट झालेल्या अर्जुनाला भगवंत तू मूर्ख आहेस असे म्हणतात. ते पाहून आपल्याला आश्चर्य वाटते पण आपल्यालाही आत्मस्वरूपाचा विसर नित्य पडत असल्याने संसारातील गोष्टींचा मोह सदैव होत असतो. म्हणजेच अर्जुनासारखा मुर्खपणा आपण नेहमीच करत असतो. त्या मूर्खपणाच्या कैफात आपण काय काय करत असतो, हे समर्थांनी दासबोधातील मूर्खलक्षणे समासात सविस्तर सांगितले आहे. ते वाचून आपण हसतो आणि असा कसा हा वागतोय असे वाटते. मूळ स्वरूप विसरलेल्या अर्जुनाला भगवंत मूर्ख म्हणाले पण वेळोवेळी आपणही मुर्खासारखे वागत असतो. त्याबद्दल भगवंत आपल्याला काय काय म्हणत असतील ते तेच जाणोत.

क्रमश:

Advertisement
Tags :

.