For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्मज्ञानी देहात जरी असला तरी, चैतन्यरूप असता

06:06 AM Feb 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
आत्मज्ञानी देहात जरी असला तरी  चैतन्यरूप असता
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत अर्जुनाला म्हणाले, आत्मज्ञानी माणसाला कोणतीच फलवासना नसल्याने तो नेहमीच तृप्त असतो. तो जरी कर्मात गढून गेलेला असला तरी आपण काही करतोय अशी त्याला जाणीव नसते. तो शरीराविषयी उदास आणि फळाबद्दल निरिच्छ असल्याने कायम आनंदात असतो. त्याला आपण कर्म करत आहोत असे दिसत असले तरी ते ईश्वर आपल्याकडून करवून घेत आहे हे माहीत असल्याने तो स्वत:ला कर्ता मानत नाही. आत्मज्ञानी वरून सामान्य मनुष्यासारखा दिसतो परंतु आतून परब्रम्हाशी एकरूप झालेला असतो. त्याने सर्व इच्छांचा त्याग केलेला असल्याने केलेल्या कर्माचा दोष त्याला लागत नाही. त्याने केलेले कर्म ईश्वरी प्रेरणेने केलेले असलेने त्यात चांगले, वाईट असा फरक करता येत नाही. जे मिळेल त्यात तो संतुष्ट असल्याने त्याला कुणाविषयी मत्सर वाटत नाही. कर्माचे फल मिळो अथवा न मिळो त्याला सर्व सारखेच असते.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, आत्मज्ञानी माणसाची इंद्रिये त्याच्या ताब्यात असतात. त्यामुळे त्याला कोणत्या इच्छा होत नाहीत की, कुठल्याही वस्तूंचा साठा करून ठेवावा असे वाटत नाही. त्यामुळे त्याचे शरीर जरी कर्म करत असेल तरी ती त्याची इच्छा नसल्याने त्याला त्याचा दोष लागत नाही. केलेल्या कर्माचे ईश्वरी इच्छेनुसार जे फळ मिळेल ते तो आनंदाने स्वीकारत असल्याने त्याच्या मनात कोणतीही कटुता नसते किंवा तो कुणाचा मत्सर करत नाही. कर्माचे फळ मिळो अथवा न मिळो त्याला सर्व सारखेच असते.

Advertisement

संयमी सोडुनी सर्व इच्छेसह परिग्रह । शरीरे चि करी कर्म दोष त्यास न लागतो ।। 21 ।।

मिळे ते चि करी गोड न जाणे द्वंद्व मत्सर । फळो जळो जया एक करूनि हि न बांधिला ।। 22 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, आत्मज्ञानी माणसाने स्वभावातल्या अहंकाराचा आणि आशा, अपेक्षांचा बळी दिलेला असल्याने त्याची परमानंद घेण्याची ओढ नेहमी वाढतीच असते. त्यामुळे तो परमानंदाचा अधिकाधिक स्वाद चाखत असतो. त्याच्या संसारिक गोष्टीतील रुची संपलेली असल्याने जे काही मिळेल, त्यातच तो संतुष्ट असतो. त्याला स्वत:मधील व इतरांच्यातल्या ईश्वरी अस्तित्वाची जाणीव होत असल्याने त्याला आपले व परके असा भेद जाणवत नाही. थोडक्यात त्याची विचारसरणी ईश्वरासारखी झालेली असते. त्यामुळे त्याला सर्व माणसे त्याचीच रूपे आहेत असे वाटते. हे विश्व ज्याला आपल्याहून वेगळे दिसत नाही, त्याला कर्म ते कसले व त्याची बाधा ती काय होणार? मत्सर, हेवेदावे ह्या गोष्टी आपला आणि परका ह्या भेदातून निर्माण होतात. ज्या द्वैतापासून हा मत्सर उत्पन्न होतो ते द्वैत त्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नसल्याने तो निर्मत्सर असतो. तो सर्व प्रकारे मुक्त असल्याने कर्म करीत असताही कर्मरहित व गुणयुक्त असूनही गुणातीत असतो.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, सर्वातून मुक्त झालेल्या माणसाच्या क्रिया त्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानात विलीन झालेल्या असतात. त्यामुळे तो सहज म्हणून जी जी कर्मे करतो ती त्याच्यातच जिरून जातात.

ज्ञानात बैसली वृत्ति संग सोडूनि मोकळा । यज्ञार्थ करितो कर्म जाय सर्व जिरूनि ते ।। 23 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, आत्मज्ञानी देहात जरी असला तरी, चैतन्यरूप असतो. परब्रह्माच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येते. त्याने जरी कर्तव्यकर्मेकर्मे केली तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.