योग्यावर दु:खाचा डोंगर जरी कोसळला तरी तो डगमगत नाही
भगवंत म्हणाले, मी योगाभ्यास सोपा आहे असं म्हणतोय कारण माझ्या सांगण्याप्रमाणे तो केला तर इंद्रियांना आळा बसण्यासाठी वेगळे काही करावे लागणार नाही. स्वत:च्या प्रयत्नाने इंद्रियांना ताब्यात ठेवीन असे कुणी म्हणू लागला तर ते अशक्य आहे कारण त्याची इंद्रिये त्याला तसे करून देत नाहीत उलट ती उसळी मारून बंड करतात आणि त्यांना हवे ते करायला भाग पाडतात.
योगाभ्यासामुळे इंद्रियांचा निग्रह साध्य झाला की, चित्त विषयांच्या चिंतनातून मुक्त होऊन आत्मस्वरूपाचे चिंतन करू लागते. ते माझ्याशी एकाग्र झाल्यामुळे विषय त्याला आवडेनासे होतात. योग्याला त्याच्या आत्मस्वरूपाची भेट घडते व तो संतुष्ट होतो. संतुष्ट झालेल्या योग्याला आता विषयातून मिळणाऱ्या सुखाची अपूर्वाई वाटत नाही. स्वस्वरूपाची ओळख त्यातून मिळणारे सुख सर्वोत्कृष्ट असते आणि ते केवळ आत्मबुद्धीने प्राप्त होते. हे सुख भोगत असताना योगी आपल्या स्वरूपापासून ढळत नाही. ह्या अर्थाचा
भोगूनि इंद्रियातीत बुद्धि-गम्य महा-सुख । न ढळे चि कधी जेथ तत्त्वापासूनि लेश हि ।। 21 ।।
हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार योगसाधना पूर्ण झाली असताना योग्याचे चित्त विषयांच्या चिंतनातून मुक्त होऊन आत्मस्वरूपाचे चिंतन करू लागते. चिंतन करता करता त्याला ते सुख मी आहे अशी जाणीव त्याला होऊ लागते. ह्याला ब्राह्मीस्थिती असे म्हणतात. ती एकदा प्राप्त झाली की, आयुष्याच्या शेवटी ब्रह्मनिर्वाण साधून देते. अशी जाणीव झालेले चित्त सुखाच्या साम्राज्यावर आरूढ होते आणि आत्म्याशी समरस झाल्यामुळे चित्ताचे कार्य संपल्याने त्याचा चिंतन करण्याचा गुणधर्म नाहीसा होतो. ह्या सर्वोत्कृष्ठ सुखाची कल्पना इंद्रिये करू शकत नाहीत कारण त्या सुखाच्या वैशिष्ट्यांचे आकलन होणे इंद्रियांच्या कुवतीच्या बाहेरचे असते.
भगवंत पुढील श्लोकात म्हणतात हे सुख सर्वोत्कृष्ठ असल्याने, ते प्राप्त झालेल्या योग्यावर दु:खाचा डोंगर जरी कोसळला तरी तो डगमगत नाही.
जया लाभापुढे लाभ दुसरा तुच्छ लेखितो। न चळे जेथ राहूनि दु:ख-भारे हि
दाटला ।। 22 ।।
हे परब्रह्म प्राप्तीचे सुख एव्हढे मोठे असते की, त्या तुलनेत मोठ्यातमोठे दु:खसुद्धा किरकोळ वाटू लागते म्हणून माउली श्लोकाच्या विवरणात म्हणतात, मेरू पर्वत सगळ्यात अवाढव्य आणि उत्तुंग मानला जातो त्या मेरू पर्वतापेक्षा मोठ्या दु:खाच्या डोंगर त्याच्यावर कोसळला तरी त्याचे चित्त दडपत नाही अथवा शस्त्राने त्याचा देह तोडला किंवा अग्नीमध्ये पडला तरी त्याचे चित्त निरतिशय सुखात लीन झाल्यामुळे त्याला त्याचे काहीच वाटत नाही. माणसाचे त्याच्या देहावर फार प्रेम असते म्हणून त्याचे चित्त नेहमी देहसुखाचाच विचार करत असते. आपला देह कायम आहे तसाच राहिला पाहिजे, असे त्याला वाटत असते पण त्याने जर ब्रह्मसुखाची चव चाखली तर तो पुन्हा देहाकडे ढुंकूनही पहात नाही. म्हणून माउली म्हणतात, एकदा चित्त आत्मस्वरुपात लीन झाले की मग ते देहाची पर्वा करत नाही. ते स्वत:च अलौकिक सुखाचे रूप झाल्याने त्याला देहाचा विसर पडतो. देहाला प्रारब्धावर सोडून ते आत्मचिंतनात मग्न झालेले असते. देहाचे काय व्हायचे असेल ते होवो, त्याचे तो बघून घेईल कारण मी म्हणजे देह नव्हे हा विचार आता दृढ झालेला असतो.
क्रमश:
